News Flash

फुलांच्या विश्वात : आकाशनिंब

रात्री शतपावली करायला घराबाहेर पडलो की माझी पावलं आपसूक आकाशनिंबाच्या झाडाकडे वळतात.

फुलांच्या विश्वात : आकाशनिंब

रात्री शतपावली करायला घराबाहेर पडलो की माझी पावलं आपसूक आकाशनिंबाच्या झाडाकडे वळतात. त्याचं कारण म्हणजे रात्री पडणारा त्याच्या सुगंधी फुलांचा सडा! ही फुले संध्याकाळी उमलतात नि रात्रीपासून पहाटेपर्यंत ती खाली पडत राहतात. या फुलांच्या मंद सुगंधाने दिवसभराचा ताण कुठल्या कुठे गायब होतो. काहीसा मोगऱ्याच्या फुलासारखाच या फुलांचा सुगंध असतो. पांढरीशुभ्र फुले, चार पाकळ्या, लांब दांडी.. झाडाच्या शेंडय़ावर ही फुले लागतात नि गळून पडतात.

रात्री / पहाटे झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असतो. एप्रिल ते जून आणि पुन्हा ऑक्टोबरपासून मार्चपर्यंत याला फुले येतात. या फुलांचा गुच्छ फार सुंदर दिसतो. खूप उंचावर असल्यामुळे फुले जमिनीच्या दिशेने झुकलेली असतात; तेव्हा ती काहीशी घंटेसारखी दिसतात. शेंडय़ाकडे झाड पूर्ण फुलांनी बहरून निघते.

पानांचा आकार काहीसा कडुनिंबाच्या पानासारखा असतो म्हणून कदाचित याला ‘आकाशनिंब’ म्हणत असावेत. फुलांना मोगऱ्यासारखा सुगंध येतो म्हणून काही ठिकाणी याला ‘आकाशमोगरा’ असेदेखील म्हणतात.

आकाशनिंबाचा मोठा वृक्ष होतो. हे आपलं भारतीय झाड – Millingtonia hortensis (मिलिन्गटोनिया होरटेनसिस) हे त्याचं शास्त्रीय नाव. बगीचा तसेच रस्त्याच्या दुतर्फा हे झाड लावलं जातं. सदाहरित प्रकारातील वृक्ष असल्यामुळे हा सावलीसाठी अत्यंत महत्त्वाचा वृक्ष. याच्या खोडावर असलेल्या सालीला तडे जातात. इंग्रजांनी याच्या खोडाचा वापर वाईनच्या बाटल्यांना बूच बनविण्यासाठी करून पाहिला; पण तो फार काही साध्य झाला नाही. पण तेव्हापासून या झाडाला ‘बुचाचे झाड’ अर्थात Indian cork tree असे पडले. आजही बरेच जण याला बुचाचे झाड याच नावाने ओळखतात.

बुचाच्या झाडाला चपटय़ा आणि लांब शेंगा येतात. भारतात फार कमी ठिकाणी या शेंगा पाहायला मिळतात. फुले मात्र सहज पाहायला मिळतात. लांब दांडा असल्यामुळे ही फुले एकमेकांमध्ये सागरवेणीसारखी गुंफून त्यांची वेणी तयार करतात. सध्या आकाशनिंबाच्या फुलांचा बहर सुरू आहे.

आकाशनिंबाची फुले आणि मुळे औषधात वापरली जातात. अन्नविषबाधा, ताप तसेच फुप्फुसांच्या विकारावर याच्या मुळांचा काढा दिला जातो. तर सुकलेली फुले अस्थमा या विकारावर वापरली जातात.

आकाशनिंबाला फारच कमी वेळा शेंगा धरतात. त्यामुळे बियांपासून रोपनिर्मिती करणे थोडे कठीणच. म्हणूनच की काय, निसर्गाने त्याला रोपनिर्मितीसाठी आणखी एक वरदान दिलं आहे. ते म्हणजे मुळांपासून नवीन रोपांची निर्मितीची क्षमता! खरंच, आकाशनिंबाच्या मुळांपासून त्याच्या नवीन रोपांची निर्मिती होते. आकाशनिंबाच्या मोठय़ा झाडापासून काही अंतरावर तुम्हाला त्याची मुळांपासून तयार झालेली अनेक छोटी छोटी रोपे दिसतील. ती खणून दुसरीकडे लावली की झालं काम. अतिशय साधा, दिसायला सुंदर नि सुगंधी असा हा आकाशनिंबाचा वृक्ष आपल्या सोसायटीच्या आवारात असायलाच हवा. तर काय बच्चे मंडळी, लागा कामाला..

भरत गोडांबे bharatgodambe@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2017 1:03 am

Web Title: indian cork tree
Next Stories
1 जीवचित्र : चित्रकथा- चित्रकथी
2 आर्ट कॉर्नर : टेट्रापॅकचा फ्लॉवरपॉट
3 बुद्धिबळ : आनंदनगरी
Just Now!
X