News Flash

डोळे उघडून बघा..

महक भरभर स्कूल बसमध्ये चढला आणि धावतच त्याने रोशनशेजारची जागा पकडली.

डोळे उघडून बघा..

महक भरभर स्कूल बसमध्ये चढला आणि धावतच त्याने रोशनशेजारची जागा पकडली. रोशनशेजारची जागा मिळाली म्हणून एकदम खूश झाली स्वारी. नेहमीप्रमाणे गप्पांना सुरुवात झाली. तुझा डबा, माझा डबा, काल मॉलमध्ये गेलो तेव्हा काय काय केलं, काल ग्राऊंडवर काय झालं, वगरे गप्पा झाल्या.. गाडी शाळेकडे वळली. शाळेतल्या गमतीजमतीवर पहिल्यांदा खुसुखुसु, मग खदाखदा हसूनही झालं आणि अचानक रोशन म्हणाला, ‘‘गणिताचा गृहपाठ किती होता ना रे काल?’’ हे ऐकलं आणि महकचं धाबं दणाणलं. गणिताचा गृहपाठ.. काल होता?.. मी पार विसरलोच.. मी तर काहीच केलं नाहीए.. बापरे.. बाईआता काय करतील?.. असे अनेक प्रश्न मनात. पण त्याने एक प्रश्नच विचारला रोशनला, ‘‘गणित आणि विज्ञान कशाला हवेत हे विषय? काय उपयोग त्यांचा?’’ विचारांच्या तंद्रीमुळे असेल किंवा शिक्षकांच्या भीतीने असेल, पण हा प्रश्न महकने जोरातच विचारला आणि त्याच वेळी बस थांबल्याने तो अजून थोडासा मोठा वाटला. सगळ्यांना तो प्रश्न ऐकू गेला. मागच्या सीटवर बसलेल्या राजेसरांनाही तो सहजगत्या ऐकू गेला. राजेसर त्यांच्या शाळेतले गणित-विज्ञानाचे शिक्षक. प्रश्न ऐकून ते गालातल्या गालात हसले, पण काही ऐकलं नाही असं दाखवत बसमधून उतरले. पाठोपाठ सारी मुलंही उतरली आणि वर्गात पोहोचताच बेल वाजली. सारे सभागृहाकडे धावले प्रार्थनेसाठी. आज प्रार्थनेची जबाबदारी आठवी ‘क’कडे होती. म्हणजे साळवी बाई काही तरी प्रबोधनपर बोलणार हे सगळ्यांना माहीत होतं. आठवी ‘क’च्या साळवी बाईम्हणजे रोशनच्या मते, पट..र..पट..र.. रोशन काय म्हणायचा ते आठवून महकला गालातल्या गालात हसूच आलं. तो म्हणायचा, ‘‘मला साळवी बाईंची पहिली दोन वाक्यंच ऐकू येतात. पुढे आपलं पट..र..पट..र.. असं ऐकू येतं.’’ हसू दाबतच महकने समोर पाहिलं तर आज साळवी बाईं ऐवजी राजेसर उभे.

घसा खाकरत सर म्हणाले, ‘‘मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, तुम्हाला माहीत असणारीच. ही गोष्ट आहे कबूतर नि मुंगीची. पाण्यात पडलेल्या मुंगीला वाचवण्यासाठी झाडावर बसलेलं कबूतर झाडाचं वाळलेलं पान टाकतं. त्या पानावर बसून मुंगी पाण्याबाहेर पडते. कबुतराच्या या उपकारांची परतफेड करण्यासाठी कबुतरावर नेम धरून झाडाआड बसलेल्या पारध्याच्या पायाला कडकडून चावते, त्यामुळे पारध्याचा नेम चुकतो. वाटलं ना, कितव्यांदा सांगतायत ही गोष्ट आम्हाला. लहानपणापासून शंभरदा तरी ऐकली ही गोष्ट आम्ही. त्यात काय विशेष? पण ‘काय विशेष’, त्याचाच विचार करायला तुम्हाला सांगावं म्हणून मी आज साळवी बाईंची परवानगीने इथे उभा आहे. तुम्ही असा विचार करा बरं, गोष्ट सांगताना किती बारकाईने विचार करावा लागतो. झाडाची फांदी तळ्याच्या पाण्यावर आलेली असणं. तळं नि फांदी यात कमी अंतर असणं, कबुतराच्या आजूबाजूला फुलं, फांद्या, काटक्या असताना त्याने वाळलेल्या पानाचीच निवड करणं, पान मुंगीच्या शेजारी पडण्यामागे कबुतराने केलेला वाऱ्याच्या दिशेचा विचार, मुंगीचं किनाऱ्यावर वाहत येणं, तिचं पारध्याच्या पायाला चावणं.. त्यामुळे पारध्याच्या बाणाची दिशा बदलणं, मुंगी चावल्यावर होणारी तात्पुरती इजा.. बघा, काही क्षणांपूर्वीपर्यंत तुम्हाला माहीत असलेल्या या गोष्टीकडेही तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि एकदम वेगळीच भासायला लागली. हा दृष्टिकोन आपल्याला देतं ते गणित आणि विज्ञान. हातात हात घालून येणारे हे विषय यासाठी शिकायचे असतात. तर आता एक करा पाहू, तुम्हाला माहीत असलेल्या, तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टींकडे आणि घटनांकडे असं बघायला शिका. म्हणजे चुकूनही तुम्ही- कशाला हवेत हे गणित नि विज्ञान विषय? काय त्यांचा उपयोग? असा प्रश्न विचारणार नाही.’’

महकच्या चेहऱ्याकडे पाहताच राजेसरांना अचूक समजलं की पारध्याचा बाण वाया गेला, पण त्यांचा बाण अचूक लागला होता.

मेघना जोशी joshimeghana.23@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2017 12:43 am

Web Title: inspirational story for children
Next Stories
1 जीवचित्र : लघुचित्रातील काळवीट!
2 फुलांच्या विश्वात : पारिजातक भरत
3 सेर सिवराज है..
Just Now!
X