संपदा वागळे

पालकसभेत मनूचे चाचणी परीक्षेचे पेपर्स पाहून तिची आई शाळेच्या बाहेर पडली खरी; पण घरी न जाता वाट फुटेल तिथे भरकटत राहिली. लाल पेनाच्या खुणांनी भरलेल्या मनूच्या उत्तरपत्रिका तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हत्या.

इंग्रजीत साध्या साध्या स्पेलिंग मिस्टेक्स, मराठीत ऱ्हस्व-दीर्घाचा बट्टय़ाबोळ आणि गणितं सोडवताना जडलेली घाई.. परिणाम ६० मुलांत साठावा नंबर. ‘अ’ वर्ग कसाबसा टिकला, हेच नशीब! डोळे भरून आल्याने समोरून येणारी तिची घट्ट मैत्रीण साक्षी तिला दिसलीच नाही. साक्षीने थांबून तिचा हात पकडला आणि विचारलं, ‘‘काय गं, कसली एवढी तंद्री लागलीय..? आणि हे काय डोळ्यात पाणी?.. एनी प्रॉब्लेम?’’

ते मायेचे शब्द ऐकताच राधाचा- म्हणजे मनूच्या आईचा बांध फुटला. जे घडलं ते सांगून ती म्हणाली, ‘‘तोंडी विचारशील तर सगळी उत्तरं आत्ताही घडाघडा म्हणून दाखवील ती; पण लिहिताना एवढय़ा चुका करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं बघ! आता मात्र तोंड दाखवायला जागाच उरली नाही.’’

‘‘अगं, तिसरीच्या परीक्षेचं काय एवढं मनावर घेतेस. मी तुला अशी कित्येक उदाहरणं दाखवीन.. झीरोतून हिरो बनलेली.’’

‘‘पुढचं पुढे. आताचं बघ. याच महिन्यात नात्यातल्या मंडळींचं एक गेट-टुगेदर ठरलंय. तिथे यांच्या त्यांच्या मुलांच्या यशाचं कोडकौतुक ऐकताना आमची मान खाली!’

‘‘परीक्षेतील गुण हे एकच परिमाण कसं लावतेस गं तू मुलीची योग्यता ठरवायला? किती गुणी आहे तुझी लेक. वयाच्या मानाने तिला केवढी तरी समज आहे, हे तूच सांगतेस ना! शेवटी आयुष्यात तेच महत्त्वाचं नाही का?’’ मैत्रिणीने खूप समजावलं तरीही मनूच्या आईचे मन थाऱ्यावर नव्हते.

‘‘आताच ही अवस्था; मग पुढे पुढे अभ्यास वाढत गेल्यावर कसं होईल या मुलीचं? त्यापेक्षा खेळात करिअर घडवण्याच्या दृष्टीने पावलं उचलावी का? नाही तरी अंगात मस्ती आहेच. ती तरी सार्थकी लागेल..’’ आईचं विचारमंथन सुरू झालं.

घरी आल्या आल्या वस्तुस्थिती सांगून आईने फर्मान सोडलं- ‘‘हे बघ मनू, जे झालं ते झालं. माझंही चुकलंच.. तुला सगळं येतंय या विचारात मी गाफील राहिले, आता आपण आपली चूक सुधारू या. उद्यापासून मी ऑफिसमधून घरी आले की आपण दोघीही एका जागी दोन तास बसून लिहिण्याचा सराव करायचा. कबूल?’’

मनूने मान हलवली. त्यानंतर रोजच संध्याकाळचं तुंबळ युद्ध सुरू झालं. बाबाने रात्रीच्या जेवणाची जबाबदारी घेऊन आपला वाटा उचलला. या शिस्तीत दहा-बारा दिवस गेले असतील- नसतील; मनूच्या वहीत बाईंचा निरोप- समक्ष येऊन भेटावे. मेलवरही तोच मेसेज. आईच्या छातीत धस्स झालं. या संदर्भात मनूला मात्र काहीच माहीत नव्हतं.

दुसऱ्या दिवशी अध्र्या दिवसाची रजा टाकून धडधडत्या अंत:करणाने मनूची आई शाळेत गेली. त्यावेळी मधली सुट्टी असल्याने सर्व शिक्षिका टीचर्स रूममध्ये होत्या. तिला बघताच एकच गलका झाला- ‘‘अभिनंदन! अभिनंदन!’’

मनूच्या आईला काही कळेचना.. तेवढय़ात मनूच्या वर्गशिक्षिका सुखदाबाई पुढे आल्या आणि म्हणाल्या, ‘‘मी सांगते तुम्हाला का बोलावलंय ते.. अलीकडेच झालेल्या आम्हा शिक्षकांच्या मीटिंगमध्ये हेडबाईंनी एक कल्पना मांडली की, आपण सध्या बघतोय की जीवनातली मूल्यंच हरवत चाललीयत. मुलांचं विश्वही ‘मी आणि माझं’ याभोवतीच फिरतंय.. त्यांना असं वागू नका, तसं वागा. हे नुसतं सांगून काही फरक पडणार नाही. माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला दिलेली शिकवण मुलांच्या आचरणात येण्यासाठी काहीतरी अ‍ॅक्शन प्लॅन हवा. माझ्या मते, आपण काही निकष ठरवून त्यात बसणाऱ्या सद्गुणी मुलाला किंवा मुलीला त्यांच्या पालकांसह एका विशेष पुरस्काराने गौरवू या. निकालाच्या दिवशीच एक मेळावा भरवून ही निवड का व कशी केली तेही सांगू. यातून इतरांना स्फूर्ती मिळू शकते..’’ बाईंची ही कल्पना सर्वानीच उचलून धरली आणि त्यानुसार ‘गुणवंत’ या पुरस्काराची प्राथमिक विभागातील पहिली मानकरी ठरलीय तुमची लेक- मुक्ता कुलकर्णी ऊर्फ मनू..’

या अनपेक्षित धक्क्याने मनूच्या आईला काय बोलावे तेच सुचेना. ते पाहून हेडबाई सांगू लागल्या, ‘‘आम्ही वर्गातील मुलांचा कौल आणि शिक्षकांचं मत दोन्हींचा विचार करून ही निवड केलीय. मी स्वत: तिला अनेकदा मैदानातील वाहता नळ बंद करताना आणि वॉटर बॅगमधील उरलेलं पाणी वाटेतल्या झाडांना घालताना, तसंच डब्यातील खाऊ रस्त्यावरच्या कुत्र्यांना देताना बघितलंय. माझ्या वर्गात कुणी पेन्सिल, पट्टी, रबर.. काही विसरलं की थेट मुक्ताकडेच विचारणा होते. ही मुलगी नुसती पेन्सिल देऊन गप्प बसणार नाही, तर आपला वेळ घालवून तिला टोक करून देणार. स्कूल बसने घरी जाताना कोण मिसिंग असेल तर उतरून वर्गात जाऊन शोध घेणार.. म्हणून तर वर्गात या विशेष पुरस्काराचा विषय काढताच मुलांनी ‘मुक्ता.. मुक्ता..’ असा जयघोष केला.’’ सुखदाबाईभरभरून बोलत होत्या.

त्यांना मध्येच तोडून सखू मावशींनी आपलं घोडं दामटलं. म्हणाल्या, ‘‘माझं बी ऐका.. मी वह्य़ांचा गठ्ठा पोटावर घेऊन चालताना दिसले की ही चिमुरडी हमखास धावत येणार आणि थोडं ओझं माझ्यापाशी द्या म्हणून मागे लागणार- काय बोलावं बाई या पोरीला!’’

ड्रॉइंग टीचर, पी. टी. टीचर सगळ्यांनीच या कौतुक पुराणाची री ओढली.

मनू गुणी मुलगी आहे हे आईला माहीत होतंच. पण आपल्या सोनपरीच्या वर्तणुकीचे असे जाहीर गोडवे ऐकताना तिच्या मनातलं शल्य कुठल्या कुठं वाहून गेलं. शाळेतून बाहेर पडताना या वेळेसही तिचे डोळे भरून आले होते. पण हे अश्रू होते आनंदाचे.. अभिमानाचे!

waglesampada@gmail.com