18 January 2019

News Flash

वाचन ते अनुवाद

आमच्या शाळेत दरवर्षी एक अंक काढला जातो, ‘बालोत्सव’ असं त्याचं नाव

प्रत्येकाला काही ना काही छंद असतोच. माझा छंद आहे तो लेखनाचा आणि तो लागला तो वाचनातून. सुरुवातीला मी लहान लहान पुस्तकं वाचायचे. ती मला फार आवडायची. त्यातूनच वाचनाची गोडी निर्माण झाली. हळूहळू मी लेखनही करायला लागले. आमच्या शाळेत दरवर्षी एक अंक काढला जातो, ‘बालोत्सव’ असं त्याचं नाव. त्या अंकात पहिल्या वर्षी मी लेख लिहिला तेव्हा मी सहावीत होते. त्या लेखानं विश्वास निर्माण झाला. नंतर मी कविता लिहिली. असं करत करत माझी लेखणी वाढू लागली, चांगल्या प्रकारे उमटू लागली.

यंदा मी एक छान हिंदी पुस्तक वाचलं. पुस्तकाचं नाव होतं ‘सडाको’. हे एक जपानी मुलीचं नाव आहे आणि तिचीच ती गोष्ट आहे. ती गोष्ट मला खूप आवडली. काहीतरी वेगळं वाचायला मिळालं याचा आनंद झाला. मनात विचार आला, या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला तर! गोष्ट फार रंजक होती. या पुस्तकातून जपानी संस्कृतीची बरीच माहिती मिळाली. सडाको ही जपानी मुलगी, तिचा आवडता छंद म्हणजे धावणे. ती शाळेच्या संघात धावण्याच्या शर्यतीत सतत भाग घेत असे. पण एक दिवस हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बचा दुष्परिणाम तिच्यावर दिसायला लागतो. तिला रक्ताचा कॅन्सर होतो. त्यातच मग तिचा अंत होतो. नंतर तिची आठवण म्हणून एक स्मारक बांधलं जातं. अशी ही गोष्ट.. या गोष्टीचा अनुवाद मी या सुटीत केला आहे. यातून सुटीत काहीतरी वेगळं करण्याचा आनंद मिळाला हे नक्की!

– श्रमिका चाळके, ९ वी, श्रीमान दत्तात्रय कबनुरकर इंग्लिश मीडियम स्कूल, कोंडगाव, साखरपा.

वाचन, चर्चा आणि धम्माल..

एप्रिलच्या सुरुवातीस किंवा मार्चच्या शेवटाला मुलं उन्हाळ्याच्या सुटीसाठी आतुर झालेले असतात. एकदा सुटय़ा लागल्या की उन्हाळ्याच्या सुटीचे नियोजन सुरू होते. उन्हाळ्याच्या सुटीत हे-हे काम करायचे, हे-हे पुस्तक वाचून संपवायचे. आणि सुट्टय़ांमध्ये सर्वात मनमोहक गोष्ट म्हणजे गावाकडे जमणाऱ्या आमच्या परिवाराची मैफल.. सर्वानी एकत्र येऊन खेळायचे, गाणे म्हणायचे आणि शेवया, कुरडया, सोबत गावरान आंब्याचा गोड रस खायचा व नंतर मन तृप्त झाले की उन्हाचा शीण घालवण्यासाठी गावच्या नदीमध्ये मनसोक्त पोहायला जायचे. रात्रीच्या गर्द अंधारात आभाळाकडे पाहात चांदणे मोजायचे, सकाळी सूर्यनारायणाचे दर्शन होईल हा विचार मनात घेऊन रात्री गाढ  झोपायचे..

यावर्षी आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केला, तो म्हणजे आपण गावाला गेल्यावर आपले मामा, मामी, आजी, आजोबा आपल्याला कपडे, भेटवस्तू देतात; पण आम्ही त्यांना असे सांगितले की आम्हाला कपडे नको त्या पैशाची आम्हाला पुस्तके आणा!

मला प्रवीण दवणे यांनी ‘अजिंक्य मी!’  हे पुस्तक भेट दिले होते व ते पुस्तक मी वाचल्यानंतर मला पुस्तक वाचण्याची खूप आवड निर्माण झाली. त्या पुस्तकातल्या गोष्टींमधून मला प्रेरणा मिळाली व दररोज पुस्तक वाचून शेतात झाडावर चढून, दंगामस्ती करून, रात्री घराबाहेर असलेल्या झाडाखाली बसून वाचलेल्या पुस्तकाविषयी चर्चा करायची.. अशी ही उन्हाळ्यात केलेली धमाल- मज्जा कधीही न विसरणारी असते.

–  कृष्णा काकासाहेब लेंभे,  ९ वी , सोनामाता हायस्कूल, औरंगाबाद.

First Published on May 27, 2018 1:01 am

Web Title: interesting book for kids