बालदोस्तांनो, आज मी तुम्हाला अशा पुस्तकाची गोष्ट सांगणार आहे ज्या पुस्तकाने मला लिहायची प्रेरणा दिली. पण खरं सांगू का, हे पुस्तक लहानांसाठी नाहीच मुळी. अगदी मोठय़ांनाही हे पुस्तक अवघडच वाटतं, मात्र या पुस्तकाने काही वर्षांपूर्वी माझ्या चिमुकल्या आयुष्यात असा नाटय़मय प्रवेश केला की हे पुस्तक देणारे माझे शाळेतले गुरुजी, या पुस्तकाच्या लेखिका आणि हे पुस्तक देखील आयुष्यभराकरिता माझ्या जिवाभावाचे झाले.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

सहावी-सातवीत होतो मी. आम्हाला इंग्रजी शिकवण्याकरिता केतन चिपळूणकर नावाचे गुरुजी शाळेत नव्यानेच रुजू झाले होते. तरुण, हसतमुख, आम्हा विद्यार्थ्यांपेक्षाही आज्ञाधारक वाटावेत असे हे गुरुजी पुस्तकांचे निस्सीम चाहते होते. त्यांच्या हातात नेहमी, अगदी वर्गावर येतानाही एखादं अभ्यासाव्यतिरिक्त वाचावं असं पुस्तक असे. शिवाय ते शाळाभर माझ्यासारख्या वाचनप्रिय किंवा माझ्या लहानपणी पुस्तकी किडा, चंपू वगैरे विशेषणांनी गाजलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वाचनालयातली पुस्तकं स्वत:च्या नावावर घेऊन वाचायला देत असत .

असंच एके दिवशी त्यांनी मला मधल्या सुट्टीत शिक्षकांच्या खोलीत बोलावून घेतलं. टेबलावर छोटेखानी पुस्तक होतं. माझ्या हातात पुस्तक देऊन म्हणाले, ‘‘हे पुस्तक वाच. छान आहे. तुला कळणार नाही, कंटाळा सुद्धा येईल कदाचित, नाही वाचावं वाटलं तर संपूर्ण न वाचताच परत दिलंस तरी चालेल.’’ पुस्तक चिमुकलं म्हणावं इतकं लहान होतं. तोपर्यंत मानकरकाकांच्या टॉनिकपासून आनंद साधलेंच्या इसापनीती, प्र. के. अत्र्यांच्या कुमार साहित्यापासून थेट बालप्रिय असणाऱ्या गोटय़ा, एक होता काव्‍‌र्हर ते थेट गो. नी. दांडेकर, सालिम अलीं, जिम कॉर्बेटपर्यंत लेखकांची मराठी-इंग्रजी पुस्तकं वाचणाऱ्या मला त्यांच्या बोलण्याचं आश्चर्यच वाटलं. थोडा अपमानही वाटला. इतकंसं तर हे पुस्तक आठवडय़ाभरात वाचतो की नाही ते पाहा, असं मनाशी म्हणतच मी ते पुस्तक गुरुजींकडून घेतलं.

शाळेतून घरी आल्याआल्या पुस्तक वाचायला सुरुवात केली तर पार गोंधळून गेलो. होतं मराठीतच, पण निम्मे शब्द, त्यांचे अर्थ, छटा उमगतच नव्हत्या. बरं पुस्तकाचा विषय देखील फारसा आवडला नाही. निसर्गाची वर्णनं होती. मला हे पुस्तक कळलंच नाही. म्हणजे त्यात काय वाचायचं ते उमगत नव्हतं तरी निसर्गाविषयी असल्याने मी नेटाने वाचत राहिलो. दोन-तीन दिवसांनी विषयात रस वाटला, पण ते पुस्तक आपल्याला झेपतच नाही असं वाटून मी ते गुरुजींना परत करून टाकलं. त्यांनी देखील काही न विचारता ते परत ठेवून घेतलं, मात्र एवढंच सांगितलं, ‘‘पुन्हा वाचावं वाटलं तर नक्की मागून घे!’’ मी बुचकळ्यात पडलो, मात्र गुरुजींची रजा घेऊन मी तो विषय विसरूनही गेलो.

त्या दरम्यानच केव्हातरी मी रुडयार्ड किपलिंग यांचं ‘द जंगल बुक’ हे पुस्तक वाचलं. त्यातल्या मोगलीच्या गोष्टीने, जंगलातल्या प्राण्यांच्या मैत्रीने मला भारावून टाकलं.  मात्र तेव्हाच वीज चमकावी तसं गुरुजींनी दिलेलं ते नावडलेलं पुस्तक डोक्यात आलं. एक-दोन दिवस त्या पुस्तकाच्या आठवणीने पार पिच्छाच पुरवला माझा; तेव्हा मी गुरुजींकडे ते पुस्तक पुन्हा एकदा देण्याची विचारणा करायला गेलो. आश्चर्य म्हणजे, त्यांनी ते पुस्तक त्यांच्या शाळेतल्या कपाटातच ठेवलं होतं. मला लागलीच ते पुन्हा मिळालं.

शाळेच्या मधल्या सुट्टीतच मी पुन्हा नव्याने ते पुस्तक वाचायला घेतलं. अचंबित करणारी गोष्ट म्हणजे, जे पुस्तक मला महिन्याभरापूर्वी अजिबात आवडलं देखील नव्हतं ते भारीच आवडायला लागलं. ‘द जंगल बुक’मधला निसर्ग, त्यातल्या गमतीजमती जंगलातल्या होत्या. तिथे दूर कुठेतरी त्या घडत होत्या. त्यांना पाहायचं, अनुभवायचं तर मला त्यांच्यापर्यंत जावं लागत होतं. मात्र या पुस्तकात वर्णन केलेला निसर्ग मला रोज माझ्या अवतीभवती दिसत होता. गुलमोहर फुलत होते. कदम्बाला चेंडूसारखी सुवासिक फुलं लगडत होती. घरासमोरच्या नारळीमागे सूर्य मावळत होता. रात्री चांदण्यांनी, द्वितीयेच्या चंद्रकोरीने आभाळ सजत होतं. पावसात बेडूक मंत्राळल्यागत ओरडत होते. वडाच्या झाडाला फळं धरत होती, त्यांना खायला पक्ष्यांची झुंबड उडत होती. घराजवळच्या खोटय़ा अशोकाच्या झाडांवर कावळ्याची घरटी नांदत होती. थोडय़ा अंतरावरच्या पिंपळावर हिरव्या चुटूक पोपटांची रोज सायंकाळी शाळा भरत होती. शाळेत जाता-येता, घराच्या खिडकीतून दिसणारा, दररोज सूर्यप्रकाशासोबत जागणारा आणि रात्री गुपचूप झोपणारा, प्रत्येक ऋतुसोबत बदलणारा, सजणारा, खेळणारा, खेळवणारा, आयुष्य साजरं करणारा निसर्ग या पुस्तकाच्या शब्दाशब्दांतून दिसत होता.

हे पुस्तक म्हणजे दुर्गाबाई भागवतांचं ऋतूचक्र. आजही या पुस्तकाचं गारुड माझ्यावर आहे. या पुस्तकात बाईंची निरीक्षणं आहेत. दीर्घ आजारपणाच्या काळात घराच्या एका खोलीत अडकलेल्या बाईंच्या मनाने खिडकीतून दिसणारी, दिवसा-मासागणिक बदलणारी झाडापानांची, शहरातल्या निसर्गाची स्पंदनं टिपली. बाईंनी या निरीक्षणांना अभ्यासपूर्ण साहित्यिक संदर्भाची जोड दिली. अतिशय नेटकी, तोलूनमापून लिहिलेली तरी ओघवती, सुरेख भाषा हे ऋतुचक्रच, खरं म्हणजे दुर्गाबाईंच्याच लेखनाचं वैशिष्टय़. एकदोनदा नाही, एकामागून एक असं कित्येक दिवस मी हे पुस्तक वाचलं. महिन्यांमध्ये विभागलेली प्रकरणं उलटसुलट, आलटूनपालटून वाचली. समाधान झाल्यावर गुरुजींना पुस्तक परत केलं आणि लागलीच आई-बाबांना सांगून ते पुस्तक माझ्याकरिता खरेदी केलं. या पुस्तकानंतर मी बाईंची लहान मुलांकरिता लिहिलेली पुस्तकं वाचली. बाईंनी छोटय़ा वाचकांकरिता खास जातक कथांचे सुंदर अनुवाद केले आहेत. बंगाली, दख्खन, डांग आदिवासींच्या लोककथांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. दुर्गु आजीच्या गोष्टी हा त्यांचा कथासंग्रह देखील वाचनीय आहे. मी बाईंची जवळजवळ सगळी पुस्तकं वाचून काढली. उत्तम लिखाण कसं असावं याचा एकेक नमुना म्हणजे बाईंचं पुस्तक. जसजसं वाचत गेलो तसतशा बाईंच्या साहित्यातले आणि त्यांच्या निग्रही, तत्त्ववादी, निर्भीड, तरी रसिक आणि आनंदी आयुष्याचे एकेक पैलू उलगडत गेले. मी बाईंचा चाहता झालो. मी दुर्गा भागवत नावाच्या एका वयस्कर लेखिकेला पत्रं लिहिली. त्यांना एकदा तरी प्रत्यक्ष पहावं अशी खूप इच्छा होती, तेव्हाच त्या वेळी नव्वदी पार केलेल्या आपल्या या दीपस्तंभ-व्यक्तीला त्रास होऊ  नये असंही मनोमन वाटत होतं. मी पदवीधर झालो त्या वर्षी बाई गेल्या. ऋतुचक्रानेच माझं सांत्वन केलं. नुकतेच बाईंशी आणि त्यांच्या साहित्याशी माझी ओळख करून देणारे चिपळूणकर गुरुजी गेले. त्यावेळी देखील परत ऋतुचक्राच्या पानापानांतूनच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

माझ्याकरिता दुर्गा भागवत म्हणजे ऋतुचक्र. व्यासपर्व. दुपानी. डूब.. अनेक पुस्तकं. मात्र एक खरं, दुर्गाबाई म्हणजे उत्तम आयुष्य, अभ्यासपूर्ण लिखाण आणि भारावून टाकणारी कल्पनाशक्ती. आजही जेव्हा मी लिहितो तेव्हा स्वत:ला विचारतो, ‘हे बाईंना आवडलं असतं का?’ माझ्या बालदोस्तांनो, बाईंचं कुठलंही पुस्तक वाचा. कुठूनही सुरुवात करा. माझी खात्री आहे, बाईंचे शब्द तुम्हाला त्यांच्या साहित्यविश्वात मार्गदर्शन करत राहतील. इतकंच नाही, बाईंचे शब्द नक्कीच तुमचं आयुष्य सुंदर करतील.

हे पुस्तक कुणासाठी? आपल्या आवतीभवतीच्या निसर्गावर आणि भाषेवर प्रेम करू पाहणाऱ्या सगळ्याच सानथोरांसाठी.

पुस्तक : ऋतुचक्र, लेखक : दुर्गा भागवत

प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन

ideas@ascharya.co.in (समाप्त)