14 December 2017

News Flash

मोठ्ठं होण्यातली मज्जा..

एका माकडाने त्याला (आता तो आंबा होता) तोडलं होतं. त्याने मिटक्या मारत त्याला खाऊन

फारूक एस. काझी | Updated: April 2, 2017 1:26 AM

आता खार- शेकरू- माकडं यांची झाडावर वर्दळ सुरू झाली.

तशी ही खूप जुनी गोष्ट..

एका जंगलात आंब्याचं एक झाड एकटंच होतं.

उन्हाळा आला तसं ते मोहोराने मोहरून गेलं. मोहोराचा वास साऱ्या जंगलभर पसरला.

मधमाश्या, फुलपाखरं, छोटी- छोटी पाखरं आता मोहोरावर तुटून पडली.

मधमाश्या व फुलपाखरांनी मोहोर फुलातून आपल्या सोंडेने रस शोषून घेतला.

भुंग्यांनी घुईऽऽऽघुईऽऽऽ असा आवाज करत झाडालाही बेजार करून सोडलं.

आंब्याचं झाड खूप खूश होतं. कारण त्याला पहिल्यांदा मोहोर आला होता.

पहिल्यांदा त्याच्या फांद्यांवर एवढी पाखरं जमली होती.

सगळ्या कीटकांची गुणगुण तो पहिल्यांदा ऐकत होता.

उन्हाळा वाढू लागला.

मोहोर सुकून गेला. गळून पडला.

झाड खूप दु:खी झालं. त्याचा सगळा आनंद गळून पडला.

इतक्यात त्याला कुजबुज ऐकू आली.

त्याने आपली पानं हलवून पाहिली. पण आवाज कुठून येतोय, हे काही कळेना.

काही वेळाने पुन्हा कुजबुज अन् हसू ऐकू आलं.

झाड गोंधळून गेलं. त्याने वारा नसताना सगळ्या फांद्या हलवून पाहिल्या.

तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ही कुजबुज आपल्याच फांद्यांतून येतेय.

त्याने एक फांदी डोळ्याजवळ आणली आणि पाहतो तर काय?

कालपर्यंत जिथं मोहोर होता, तिथं आता अगदी छोटय़ा छोटय़ा हिरव्या रंगांच्या गोल गोल कैऱ्या लटकत होत्या.

त्या  एकमेकींशी गप्पा मारत होत्या, हसत होत्या.

त्याच्या डोळ्यात चमक आली. ‘आपण मोहोर गळून पडला म्हणून उगीच रडत बसलो, त्याच्या जागी आता फळं येऊ लागलीत.’

झाड खूप खूश झालं.

उन्हाळा वाढू लागला तसा कैऱ्यांचा बहर वाढू लागला.

झाड कैऱ्यांनी नुसतं भरून गेलं.

आता खार- शेकरू- माकडं यांची झाडावर वर्दळ सुरू झाली. त्यांच्या शेपटय़ा अंगावर घासल्या की झाडाला गुदगुल्या व्हायच्या. तो खळाळून हसायचा. तेव्हा झाडातून सुंऽऽ सुंऽऽ असा आवाज यायचा.

झाडावर सगळ्यात वरच्या फांदीवर एक कैरी वाढली होती.

ती वरून सगळं जंगल पाहून घ्यायची. दूरची नदी, धूसर- धूसर डोंगर.. जमिनीला आकाश टेकलेलं, पाखरांचे थवेच्या थवे.. हे सगळं ती कैरी पाहायची. आनंदून जायची.

हळूहळू कैरी मोठी होऊ लागली.

तिचा हिरवा रंग जाऊन पिवळसर रंग येऊ लागला.

कैरीला कळेच ना काय होऊ लागलंय. पण तिला स्वत:चा वास खूप गोड वाटू लागला. आवडू लागला.

बघता बघता उन्हाळा वाढला आणि प्राण्यांचा झाडावरचा मुक्काम वाढला.

कैरी आता पिवळी झाली.

एका माकडाला बोलताना तिने ऐकलं, ‘तो बघ आंबा. कसा पिवळाधम्मक् झालाय.. तो अजून चांगला पिकला की मी त्याला खाऊन टाकणार.’

कैरीला वाटलं, ‘हे माकड मला आंबा का म्हणतंय? मी तर कैरी आहे.’

झाड म्हणालं, ‘तू जोवर हिरवी असतेस तोवर तू कैरी. आंबट आंबट..अन् तू पिकून पिवळी झालीस की तू आंबा होतेस. गोड गोड. आता तू कैरी नाहीस, आंबा आहेस.’

कैरी जाम खूश झाली. कारण तिला एक नवीन नाव मिळालं होतं- आंबा!!!

आंबा पिकला अन् कुणी तरी त्याला जोराचा हिसडा देऊन झाडापासून तोडून घेतलं.

तो घाबरला. दचकला. ओरडला.

पण कुणीच काही बोललं नाही.

एका माकडाने त्याला (आता तो आंबा होता) तोडलं होतं. त्याने मिटक्या मारत त्याला खाऊन टाकलं.

आंब्याला वाटलं, आता आपण मेलो. पण काही वेळातच तो जमिनीवर जोरात आदळला.

मुका मार लागला. तो विव्हळला.

त्याने आसपास पाहिलं. माकडाने त्याला झाडाखालीच फेकलं होतं. त्याच्या शरीरावर बाकी राहिलेला गर मुंग्यांनी फस्त केला.

तो रडू लागला.

त्याला प्रश्न पडला, ‘आता माझं कसं व्हायचं? मी झाडावरच बरा होतो. किती मज्जा होती तिथं.

डोलत डोलत सगळं जंगल दिसायचं. पण आता मी काय करू?’

झाड यावर बोललं, ‘आता तू आंबा राहिला नाहीस. तू ‘कोय’ बनलायस. म्हणजे आंब्याची बी. आता तू जमिनीत रुजली की एक नवीन झाड जन्माला येईल. मीही असाच जन्मलोय. तू आता स्वत: एक झाड होणार. त्यात अजून मज्जा आहे. मोठं होण्यातली मज्जा आता कळेल तुला.’

कोय खूश झाली. कारण तिला अजून एक नाव मिळालं होतं- कोय!!!

तिने जाग्यावरच एक टुणकन उडी मारली.

इतक्यात तिला कुणी तरी उचलून घेऊन दूर भिरकावलं.

माकडांची पिल्लं खेळत होती. त्यातल्याच एकाने तिला दूर भिरकावलं होतं.

ती दूर एका तळ्याकाठी जाऊन पडली आणि तिथंच रुजली.

पाणी मिळालं आणि आपल्या आतून काही तरी बाहेर येतंय असं तिला वाटायला लागलं.

अन् काय मज्जा!!

कोय आता अंकुर बनली.

मग रोपटं झालं.

बघता बघता मोठ्ठं झाड झालं.

त्याला मोहोर लागला.

मग कैऱ्या लागल्या.

कैऱ्यांचे आंबे बनले.

प्राण्यांनी आंबे खाऊन त्याच्या कोयी सगळ्या जंगलभर टाकल्या.

त्या कोयी तिथंच रुजल्या.

त्यांची रोपं झाली. झाडं झाली. त्यांना कैऱ्या लागल्या.

कैऱ्यांचे आंबे झाले. आंबे खाऊन पुन्हा कोयी जंगलभर पसरल्या.

जंगल झाडांनी भरून गेलं.

‘तू स्वत: झाड होणार, त्यात अजून मज्जा!!’

झाडाला पहिल्या झाडाचं बोलणं आठवलं आणि ते खुशीने डोलू लागलं.

मोठं होण्यातली मज्जा त्याला समजली होती.

सुंऽऽ सळसळ सुं ऽऽऽ सळसळ असा आवाज करत ते हसू लागलं.

साऱ्या जंगलभर त्याचं हसू पसरलं होतं.

फारूक एस. काझी farukskazi82@gmail.com

First Published on April 2, 2017 1:26 am

Web Title: interesting monkey story for kids