31 May 2020

News Flash

एका चित्राची गोष्ट!

दरवाजावरची बेल वाजली आणि मी धावत दरवाजाकडे पळत गेलो.

प्रतिनिधिक छायाचित्र

दरवाजावरची बेल वाजली आणि मी धावत दरवाजाकडे पळत गेलो. कारण खात्री होती की, यावेळी येणारी व अशा प्रकारे दोन बेल लागोपाठ वाजवणारी आईच असेल. मी टाचा उंच करून दरवाजाची कडी उघडली आणि आत येणाऱ्या आईला मिठीच मारली. अगदी लाडात येऊन बिलगलेल्या माझे अर्धे लक्ष मात्र होते आईच्या पर्सकडे. तितक्याच लाडात मी आईला विचारलं, ‘‘ए आई, सांग ना आज तू माझ्यासाठी काय आणलं?’’

ती त्यावर काही उत्तर देणार त्यापूर्वीच मी तिची पर्स घेऊन शोधाशोध करू लागलो. आईच्या पर्समध्ये कित्ती नको त्या गोष्टी असतात. त्यात माझ्यासाठी आणलेले काही दिसतच नाही.

‘‘अरे व्वा! माझं आवडतं बिस्किट.. पण हे काय नवीन?’’ मी माझं बिस्किटावरचं लक्ष क्षणात दुसरीकडे वळवलं. बिस्किट काय माझ्यासाठीच असेल, ते उद्या मलाच मिळणार; पण हे गाडीसारखं काय आहे बरं? मी तो नवा प्रकार हातात घेतला. एक प्लास्टिकची काठी छोटीशीच आणि तिला फिरणारे एक स्पंजचे चाक. ही अशी कशी नवीन गाडी आहे एका चाकाची? त्या दिवशी सर्कशीत पाहिली होती तशी विदूषकाची एकचाकी सायकलच असेल असा तर्क करून मी खूप खूश झालो; पण आई मात्र माझ्या हातात लागलेली तिची कामाची वस्तू पाहून नाराज दिसत होती. मी ती घेऊन सरळ पलंगावर गेलो. आई येण्यापूर्वी गेला तासभर याच पलंगावर मनसोक्त उडय़ा मारल्यामुळे अस्ताव्यस्त चादरीचे खूप सारे डोंगर त्या निळ्या चादरीवर होते. माझ्या या नव्या सायकलसोबत त्या डोंगरदऱ्यांत खेळायला खूप खूप मज्जा येत होती. या चढउतारांवर जितक्या वेळा माझी ही सायकल वर-खाली धावे, माझ्या आईचा जीव तितकाच वर-खाली होत होता; पण मी मात्र रममाण होतो माझ्याच खेळात तिच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत. खरं तर हेही चूकच होतं, पण तरी त्या वेळी मला माझा खेळ प्रिय वाटला.

अचानक आईचा आवाज कमी झाला तशी माझी नजर तिला शोधू लागली. आई कपाटात काही तरी शोधत होती आणि लवकरच शोधलेलं सारं खाली जमिनीवर मांडत होती. वेगवेगळे ब्रशेस, रंगीबेरंगी रंग, पॅलेट, माझे क्लेचे साचे, कापूस असं बरेच काही आणि त्यासोबत एक भला मोठ्ठा पांढराशुभ्र कागद. रंग म्हटले की ते माझे पहिले आकर्षण. मी लगेचच माझी नवी सायकल घेऊन आईजवळ गेलो. विविध रंगांच्या बाटल्या एक वेळ हातात घेऊन चौफेर फिरवून पाहिल्या. ब्रशेस हातात घेऊन उगाचच इथेतिथे फिरवून पाहिले. पॅलेटला जमिनीवर एक-दोनदा आपटून पाहिले, पण त्यात काही मज्जा नाही आली; पण हे सर्व करत असता माझी ती एकचाकी गाडी अजिबात सोडली नाही.

मग आईने पॅलेटमध्ये हिरवागार रंग पाण्यासोबत मिसळून ते मिश्रण समोर ठेवले. मी हक्काने माझ्या गाडीचे ते एकुलते एक चाक त्या हिरव्या रसात न्हाऊ  घातले आणि पुढची उडी घेतली ती थेट त्या शुभ्र कागदावर. या अचानक घेतलेल्या झेपेमुळे हिरव्या रंगाचे असंख्य तुषार त्या कागदावर इतस्तत: उडाले आणि मग ते चाक जसजसे वेगवेगळ्या दिशेला फिरू लागले तसतसे त्या कोऱ्या कागदावर हिरवेगार गालिच्यासारखे शेत जन्म घेऊ  लागले. खूप मज्जा येत होती. आधी मारलेल्या रंगावर पुन्हा नव्याने रंग आला की त्या हिरव्या रंगाची एक नवीनच छटा तयार होई. अशा अनेक हिरव्या रंगाच्या गवतांनी माझे शेत बहरले जात होते; पण आता त्या रोलरचा मला फार कंटाळा आला होता. माझ्या त्या एकचाकी गाडीला पेन्टिंग रोलर म्हणतात हे एव्हाना मला समजले होते. हिरवा रंगही नकोसा झाला.

आईला हे अगदी अचूक समजले म्हणूनच ती नवा रंग शोधू लागली आणि मी लगेच माझा आवडता निळा रंग तिच्यासमोर आणून तिला मदत केली; पण आई हा निळा रंग घेऊन काय बरं करत आहे? पॅलेटमध्ये या निळ्या रंगात माझे क्ले आर्टचा फुलपाखरूच्या आकारातील साचा बुडवून तो माझ्या हिरव्या शेतात उमटवला आणि काय आश्चर्य? अवघ्या काही मिनिटांत अशी किती तरी फुलपाखरे माझ्या हिरव्या शेतात आनंदाने बागडू लागली. मी आपला फुलपाखरे आणि पक्षी उमटवण्यात मग्न; पण आईने आता ब्रशला हात घातला. पाण्यात भिजवून बाटलीतला तो पिवळाधम्म रंग पाहून माझे साचे अगदी सहज दूर फेकले गेले. माझ्या मनाप्रमाणे तो ब्रश हाती मिळाला आणि मग माझ्या हिरव्या शेतात पिवळे सोन्याचे ऊन सांडू लागले. पूर्वीचा निळा आणि हिरवा रंग अजून ओलाच असल्याने नव्याने पांघरला जाणारा हा पिवळा रंग पोपटासारखा पोपटी रूप घेऊ  लागला. निळ्या रंगासोबत ही मजा अधिक उठून दिसायची म्हणून आईचे न ऐकता मी निळ्या रंगावरच पिवळे फटकारे मारू लागलो आणि यासोबत कित्येक फुलपाखरे नव्याने फुटलेल्या पोपटी पानांमागे दडून गेली. माझा हा कार्यक्रम सर्वच फुलपाखरांना इजा पोहोचवतोय असे समजून आईने माझ्या हातून ब्रश काढून घेतला आणि ती माझ्या बोटांच्या टोकांवर लाल, केशरी, गुलाबी रंग लावू लागली. माझी ती इवली बोटे जसजशी त्या गवतावर नाचू लागली तशी रंगीबेरंगी फुलेच फुले त्या हिरवळीत उमलू लागली. आता मला ती एक सुंदर फुलबाग वाटत होती. कापसाच्या पांढऱ्याशुभ्र बोळ्यावर त्याहूनही अधिक शुभ्र पांढरा रंग घेऊन तो ढग बनून माझ्या बागेत बरसला. पुढे तेच धुके बनून एक निराळेच सौंदर्य माझ्या चित्राला निर्माण झाले. माझ्या हातून या ढगांची संख्या वाढण्याच्या आत आईला याला आवर घालावासा वाटला, कारण आता मी खूप चलबिचल होऊ  लागलो आणि ती चंचलता कागदावर उमटू लागली होती.

आईने सर्वच काही काढून घेतले. तो माझा रोलर, ब्रश, पॅलेट, रंग सर्वच आता माझ्यापासून खूप दूर होते. खूप वाईट वाटले. आता मी काय करू? असा प्रश्न आला आणि मी चिडचिड करत रडायला लागणार इतक्यात आईने एक जांभळ्या रंगाच्या पेपरमध्ये पॅक केलेले गिफ्ट हातात ठेवले आणि माझा राग कुठच्या कुठे पळून गेला. मी लगेच तो कागद दूर सारून ती वस्तू उघडून पाहिली तर त्यात होते माझे आवडते क्रेयॉन्स. आता आठवले मला, हे गिफ्ट आईच्या एका मैत्रिणीने दिले होते आणि हिने ते माझ्यापासून लपवून ठेवले होते. खूप खूश झालो. मला त्यातही आईने चॉकलेटी रंग काढून हातात ठेवला आणि मीही अगदी शहाण्या मुलासारखे ते घेऊन आईच्या इच्छेप्रमाणे दोन-चार रेघोटय़ा मारून फांद्या काढल्या आणि बघता बघता माझ्या चित्राचे रूपच पालटले. आता ते शेत किंवा बाग नसून एक डेरेदार झाड वाटत होते, लाल केशरी फुलांनी बहरलेले. पक्षी आणि फुलपाखरे तिथे नाचत बागडत होती. हे सर्व पाहून आई फार खूश झाली असली तरी मला मात्र त्यात काही कमतरता जाणवत होती. मी आईची नजर चुकवून काळ्या रंगावर झेप घेतली आणि काळ्या रंगाच्या मनसोक्त रेघोटय़ा मारल्या. मी खूश होतो, पण आईने मात्र मला थांबवले आणि सारे क्रेयॉन्स पेटीत पुन्हा बंद करून ठेवले. आई आता माझ्या चित्राला निरखून पाहत होती आणि मी तिच्याकडे एकचित्ताने पाहत होतो. काही क्षणातच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान, स्मित आणि आनंद एकाच वेळी झळकले आणि मीही खुदकन् हसत आईच्या कुशीत शिरलो.

रूपाली ठोंबरे rupali.d21@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 1:34 am

Web Title: interesting story for kids 10
Next Stories
1 मोतियन दाणा
2 फुलांच्या विश्वात : कोरांटी
3 जीवचित्र : समर्था- घरचे श्वान
Just Now!
X