अनिश आणि अक्षया दोघंही आज सकाळपासून प्रचंड उत्साहात होते. किती वेळा काहीबाही ठरवत होते आणि किती वेळा त्यात बदल करत होते. त्यांचे प्लान्स ऐकून नि त्यांची धावपळ पाहून सारे मनातल्या मनात हसत होते. पण कोणी काही बोलत मात्र नव्हतं. कारण उगाच पापड नको मोडायला. पाचवीतला अनिश आणि तिसरीतली अक्षया यांच्यासाठी आजचा दिवस फार आनंदाचा होता. कारण आज ते खरेदीला जाणार होते. कोकणातील मालवणमध्ये राहणारे ते दोघे. मालवणमध्ये वर्षांतील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. आणि या सणासाठी त्या दोघांसाठी नवनवीन कपडे वगरे खरेदी करण्यासाठी त्यांचे आई-बाबा आज त्यांना बाजारात घेऊन जाणार होते. ती खरेदी काय करायची, याचीच ते दोघं सकाळपासून तयारी करत होते. यादी करत होते, त्यात बदल करत होते, काही नवीन ठरवत होते, काही जुनं बदलत होते, वगरे, वगरे..
शेवटी एकदाची संध्याकाळ झाली. आई-बाबा ऑफिसमधून आले. फ्रेश होऊन त्यांनी खरेदी करण्यासाठी जायचा विषय काढला तसं अक्षयाला हुश्श झालं. म्हणजे विसरले नाहीयेत हे खरेदीचं आणि दमलेही नाहीयेत. नाहीतर म्हणायचे की, आज नको, उद्या जाऊ. पण तसं काही होणार नाही हे अक्षयाच्या लक्षात आलं आणि तिचा चिवचिवाट पुन्हा सुरू झाला. सकाळपासून जे काही ठरवलं जात होतं ते सग्गळळं कध्धी एकदा आई-बाबांशी शेअर करते आणि त्यांच्याकडून होकार मिळवते असं तिला झालं होतं खरं; तर अनिशलाही तस्संच वाटत होतं. त्यामुळे अक्षयाच्या चिवचिवाटात तो मध्येमध्ये आपलाही कलकलाट मिसळत होता आणि दोघंही आपले खरेदीचे प्लान्स पुन:पुन्हा ऐकवत होते, तरीही त्यांचं समाधान काही होत नव्हतं. सारखं नवनवीन काही न काही आठवत होतंच. आई-बाबांना या साऱ्या उत्साहाची कल्पना होतीच, त्यामुळे ते सगळं गमतीने पाहात होते. ही सगळी गडबड करत असतानाच अनिश आणि अक्षया दोघंही तयार झाले, त्यांनी आपले साठवलेले पॉकेटमनीचे पसेही पुन:पुन्हा मोजून बरोबर घेतले. त्यातून काय काय खरेदी करायची त्याची पुन्हा एकदा उजळणी झाली. पर्स मानेत अडकवत अक्षयाने ‘‘बाबा, गाडी काढा, जायचंय ना,’’ असा पुकारा केला.’’ आणि बाबांनी एकदम बॉम्बच टाकला, ‘‘अरे, आज आपण चालत जातोय बरं का. इथून चालत गेलं तर दहा मिनिटांत बाजारात पोहचता येईल. चालत जाऊन तर पाहू आणि येतानाही छान रमतगमत येता येईल. यावर्षी पाऊसही नाहीए, त्यामुळे सहजच जमेल हे.’’ अनिशने यापुढे आपलं काही शहाणपण चालणार नाही हे समजून मान डोलावली, तर अक्षयाने थोडीशी खळखळ केली. पण त्यावर बाबांनी, ‘‘चालेल मग आपण खरेदीच कॅन्सल करू.’’ असा पवित्रा घेतल्याने तीही वरमलीच. शेवटी सगळे खरेदीसाठी निघाले. रस्त्यात काय काय खरेदी करायची याची उजळणी आणि त्यात आई-बाबांच्या सूचना हे सगळं चाललं होतं. त्यामुळे ते दुकानांपर्यंत कधी पोहोचले ते लक्षातच आलं नाही. कपडे, फटाके, लाडू, पेढे, मोदक, सजावटीचं साहित्य, आरत्यांची पुस्तकं, रांगोळ्यांची पुस्तकं, रांगोळ्यांचे रंग ही सारी खरेदी झाली तरी अजूनही त्या दोघांना काहीबाही आठवत होतंच आणि त्याची फर्माईश होत होती. शेवटी एकदाची ती वेळ आलीच. अक्षयाने साडेतीन हजार रुपयांच्या अनारकली ड्रेससाठी हट्ट सुरू केला आणि आईने तिला विरोध केला. शेवटी मुसमुस, रडारड हे सगळं होत तो ड्रेस दिवाळीत खरेदी करण्याच्या मुद्दय़ावर समेट झाला आणि सगळी कंपनी घरच्या रस्त्याला लागली. अक्षया आणि अनिशने बाबांना एक-दोनदा रिक्षाबाबत सुचवून पाहिलं, पण त्यांनी काही दाद दिली नाही. आपली मात्रा चालणार नाही हे सगळ्यांना कळून चुकलं आणि मुकाटपणे सारे घराच्या दिशेने निघाले. येताना अक्षयाने टुमणं सुरू केलं, ‘‘दादा मी की नाही बाप्पाकडे डिमांड करणार आहे, की मला तो ड्रेस मघाचचा केशरी अनारकली रे मिळावा. मला माहीत आहे बाप्पा माझी डिमांड नक्कीच पूर्ण करेल.’’
‘‘ए, डिमांड नाही गं, मागणं म्हणतात त्याला. पाळणाघरातल्या आज्जी काय सांगतात ते माहीत आहे ना तुला. आपण बाप्पाकडे मनापासून मागणं मागितलं ना तर तो ते नक्की पूर्ण करतो.’’
‘‘हा, तेच तर म्हणत्येय मी. मी बाप्पा आल्यापासून जाईपर्यंत सारखं त्या अनारकलीचंच मागणं मागणार आहे, म्हणजे नक्कीच पूर्ण करील तो.’’
‘‘आणि मी असं करतो, मी आपल्याला नवीन गाडीचं मागणं मागतो. बाबा, आपण बाप्पाकडे नवीन फोर व्हीलर मागतो. आपली आताची गाडी फार जुनी झाली.’’
बाबा त्यावर म्हणाले, ‘‘अरे, मघापासून तुम्ही स्वत:पुरताच विचार करता असं नाही का वाटत? मला अनारकली पाहिजे, आम्हाला गाडी पाहिजे.’’
त्यावर आई म्हणाली, ‘‘हे मात्र खरं हं. सगळे असंच करतात. कोणत्याही देवाकडे स्वत: पुरतंच मागणं मागतात. आपलं भलं झालं म्हणजे झालं.’’
त्यावर बाबा लगेच म्हणाले, ‘‘ तेच तर, मला स्वत:ला काही मिळालं की माझा फायदा, एव्हढाच संकुचित विचार आहे. पण अजून एक विचार आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, जो आपण करतच नाही. इतरांचं भलं झालं तर आपलंही अप्रत्यक्षरीत्या भलंच होतं की?’’
‘‘कसं काय?’’ – अनिश.
‘‘अरे, पाऊस भरपूर पडला, धान्य भरपूर पिकलं तर फक्त शेतकरीच आनंदित होतो असा विचार आपण करतो. पण शेतकरी धान्य विकतो तेच आपण खातो ना! म्हणजे शेतकरी आनंदी असेल तर आपणही आनंदी होऊ. जर स्त्रियांना मानाने वागवलं, त्यांना आनंदी ठेवलं तर फक्त कुटुंबच आनंदी होणार नाही, तर समाजही आनंदी होईल आणि आपण तर समाजाचाच भाग आहे.’’
‘‘ हे मात्र खरं हं बाबा, आमच्या वर्गात मीनल आहे ना तिला आई-वडील नाहीत, त्यामुळे ती काकांकडे राहते. कधी कधी तिची काकू तिला खूप ओरडते, तिच्याकडून खूप काम करून घेते. अशा वेळी मीनल वर्गात खूप दु:खी होऊन बसलेली असते. तेव्हा आम्ही सगळेच दु:खी होतो. खेळण्यातही आमचं लक्ष लागत नाही.’’
‘‘म्हणजे बघ ना, दुसऱ्यांच्या दु:खामुळे आपणही दु:खी होतो. मग सगळेच सुखी असतील तर कित्ती चांगलं होईल की नाही! तुला माहीत आहे ना संत ज्ञानेश्वरांनीही पसायदानात अशीच मागणी केलीय. म्हणून त्यांनी म्हटलंय, ‘जो जे वांछिल तो ते लाहो.’ ज्याला ज्याला जे जे हवंय त्याला त्याला ते ते मिळालं की सर्वच सुखी होतील.’’ आईने समजावलं. हे सगळं लक्षपूर्वक ऐकणारी अक्षया लगेच म्हणाली, ‘‘मला कुठे येतंय पसायदान. मग मी कसं मागणार हे सगळं बाप्पाकडे.’’ अक्षयाचा मुद्दा लक्षात येऊन बाबा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, ‘‘न का येईना पसायदान, तू ‘सर्वासी सुख लाभावे तशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वाचे, कोणी दु:खी असू नये’ किंवा प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादयासागरा। अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दारिद्रय़, दु:ख अवघे देशांतरा पाठवी। हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी॥ अशी मागणी तर करू शकतेस. असं बोलत असतानाच ते घरी पोहोचले आणि दार उघडल्यावर खरेदी न दाखवता अक्षयाने ‘‘आजी, मला सर्वासी सुख लाभावे आणि प्रारंभी विनंती शिकवायला सुरुवात कर हां आजपासून’’ अशी मागणी आजीकडे केल्याने आजी चपापली, पण आई-बाबांनी एकमेकांकडे एक हसरा कटाक्ष टाकला.
मेघना जोशी – joshimeghana.23@gmail.com

hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?