सकाळ झाली. सूर्यदेवाने रोजच्याप्रमाणे आपल्या सोनेरी किरणांनी पानांशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला. जलदेवतेने जमिनीच्या पोटातून सुरुवात करून मूळ, खोड, फांद्या, उपफांद्या अशी सगळी स्टेशने मागे टाकत पानांपर्यंत पोहोचण्याचा नेम पार पाडला. हरितद्रव्याचे फॅमिली पॅक तर होतेच, पण झाडाची पानं रागावल्यासारखी गप्प होती. वाऱ्याच्या झुळुकीने गुदगुल्या करीत पानांना हसविण्याचा प्रयत्न केला. पण पानांनी आळीमिळी गुपचिळी काही सोडली नाही. देवबाप्पा वरून बघतच होता. ही सारी हिरवी सृष्टी त्याची फार लाडकी होती. ती रुसलेली त्याला बघवेना. तो खाली धावून आला.

‘‘आज आमच्या झाडांच्या नाकावर रागोजीपंत बसलेत की काय?’’ देवबाप्पा म्हणाला.

देवबाप्पाचे आपल्याकडे लक्ष आहे हे जाणवल्यामुळे पानं मनातून सुखावली. पण वरवर रागावल्याचं नाटक चालू ठेवत त्यांनी आपली तक्रार सांगून टाकली.

‘‘देवबाप्पा, आमच्या भोवतालची सगळी दुनिया रंगीबेरंगी. फुलं वेगवेगळ्या आकर्षक रंगात दिमाखात आमच्या आजूबाजूला मिरवत असतात. सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे. नवरात्र असू दे, दिवाळी असू दे, कुठलाही सण असू दे, या रंगांचा तोराच जास्त. आम्ही आपला सारखा हिरवा युनिफॉर्मच का घालायचा? पावसाळ्यात नवीन कपडे देतोस, तेव्हाही हिरवाच शालू. आम्हाला कंटाळा आलाय या हिरव्या रंगाचा. आम्हालापण सगळे रंग हवेत.’’ पानांनी हट्ट धरला.

‘देवबाप्पाशिवाय सांगणार तरी कोणाला?’ हे पक्के ठाऊक असल्यामुळे पानांनी भडाभडा मनातली व्यथा बोलून दाखवली.
‘‘अच्छा, म्हणजे असं आहे तर. तुम्हाला या नवरंगांचा मोह पडलाय. ठीक आहे, तुमच्या मनासारखं होईल,’’ म्हणत बाप्पाने ‘तथास्तु’ म्हटलं.

पानांनी आनंदाने एकमेकांना टाळ्या दिल्या.

दुसऱ्या दिवशी पानांनी डोळे उघडले. पाहतात तो सगळ्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनी रंग बदलले होते.
‘ए, माझा तपकिरी रंग बघ’, ‘ए माझा केशरी रंग बघ’ लहान मुलांनी प्रत्येकाने आपले नवीन कपडे दाखवावेत तशी नव्याच्या नवलाईत सगळे गुंगून गेले. चार दिवस मजेत गेले.

‘‘पाना, आम्हाला खूप भूक लागली आहे, खायला कर ना आता. कळ्या उमलायच्या आधीच सुकून जाताहेत,’’ भुकेमुळे बावलेल्या फुलाने हळूच विचारले.

‘‘आता माझ्याकडे हरितद्रव्य नाही. मी काहीच खाऊ तयार करू शकणार नाही,’’ हे सांगताना पानांच्या पोटात कावळे ओरडतच होते.
‘‘ए फुला, हे कीटक सारखे आम्हाला बोचकारताहेत. त्यांना तू जरा रागाव ना,’’ पान जरा चिडूनच म्हणाले.
‘‘अरे पाना, ते आम्हाला शोधत आहेत. पण आपण सगळे रंगीबेरंगी झाल्यामुळे फूल कुठलं व पान कुठलं हे त्यांना कळेनासं झालंय. ते
गोंधळलेत. मग आमची खूण पटण्यासाठी सुगंध आहे का? केसर आहेत का? हे बघायला ते स्पर्श करताहेत.’’ फुलाने वस्तुस्थितीचे निवेदन केले.

‘‘आम्ही देतो त्यांना ढकलून,’’ पानाने जरा शिष्टपणाने सांगितले.

‘‘असं नका रे करू. आपल्याला त्यांची गरज आहे. परागीभवन झालं नाही तर आपल्या अस्तित्वावर गदा येईल, चालेल का तुला? आधीच खायला काही नाही, भूकबळी होऊन जाऊ,’’ फुलाने समजावलं.

‘‘थंडावा देणारा, मन प्रसन्न करणारा हिरवा रंग हरपला. त्यामुळे झाडाखाली किती रखरखीत वाटतंय,’’ झाडाखाली कोणी तरी कुजबुजलं. पानांनी कान टवकारले.

‘‘हिरव्या रंगामुळे झाड किती देखणं दिसायचं. डोळ्यांना सुखद वाटायचं. फुलांना लपायला जागा मिळायची. आता सगळंच बदललं,’’ दुसरा आवाज त्यात मिसळला.

‘‘परदेशात झाडं रंगीत असतात म्हणे,’’ कुणी तरी माहिती दिली. पानांनी क्षणभर ‘फॉरेन रिटर्न’ असल्याचा अभिमान सळसळण्यातून व्यक्त केला.

‘‘अरे, खालचं हिरवं जगच नाहीसं झालंय. आता खाली जायचं कुणाच्या ओढीनं. त्यापेक्षा इथेच आकाशात विहार करू या,’’ वरच्या ढगांतूनही नाराजीचा सूर कानावर आदळला.

‘‘अरे बाप रे, या ढगांनी बोलल्याप्रमाणे केलं तर पाऊस पडणारच नाही. सगळी सृष्टी होरपळून जाईल,’’ पानांचा धीर खचत चालला.
‘‘नकोच ना रंगांचा अट्टहास. आपला हिरवा रंगच बरा. बाप्पाला सांगून टाकू या,’’ सगळ्या पानांचे एकमत झाले.
‘‘देवबाप्पा, आम्ही चुकलो. आम्हाला परत हिरवे करा,’’ पानांनी प्रार्थना केली.

‘‘हे कसं बोललात शहाण्यासारखं. आता परत कुठल्याही रंगाचा हेवा करू नका हं. प्रत्येकाचं महत्त्व वेगळं. हिरव्या रंगात चैतन्य असतं. टवटवीतपणा असतो. रसरसशीतपणा, गारवा असतो. म्हणून तर वय वाढलं तरी मनाने तरुण असल्यामुळे पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, असं म्हटलं जातं,’’ देवबाप्पाने हसून प्रतिसाद दिला. झाड पूर्ववत हिरव्या रंगात

बुडून गेलं.

‘हिरवं हिरवं गार झालं, सारं शिवार

माझा आनंद गगनात मावेना’ म्हणत वाऱ्याच्या तालावर पानं नाचू लागली.
सुचित्रा साठे – lokrang@expressindia.com