शकुंतला मुळये

मे महिन्याच्या सुटीत रिया आपल्या आजोळी कोकणात प्रथमच आली होती. सगळ्यांची खूप खूप लाडकी. रिया खूप हुशार आहे. नाचरी आणि हसरी. रिया आणि तिचे आई-बाबा होशंगाबादला राहतात. आजी-आजोबांच्या सहवासात तिला मराठीत बोलण्याचीही सवय होऊ लागली.

कोकणातले आंबे, फणस आणि समुद्र रियाला फार फार आवडलं सगळं. सुट्टी संपायला दहा दिवस उरले. रियाच्या आई-बाबांना ऑफिसच्या कामामुळे रियाला ठेवून होशंगाबादला जावे लागले. सुट्टी संपण्याआधीच एक दिवस कोकणात वळिवाचा पाऊस आला. आजोबांनी रियाला त्या पहिल्या पावसात भिजू दिलं. ती धावत घरात येऊ लागली आणि अंगणाकडेच्या दगडाला धडकून जोरात आपटली.  एका पावलाला फ्रॅक्चर झालं. मग काय! डॉक्टरांनी प्लास्टर घातलं गुडघ्यापर्यंत. दीड महिना तिला सक्तीची विश्रांती. चालता येणं शक्यच नव्हतं. आजी-आजोबा खूप लाड करत होते तरी नाचऱ्या रियाला नुसतं बसून आणि झोपून राहण्याचा खूपच कंटाळा आला. आजोबांबरोबर पत्ते नि कॅरम किती दिवस खेळणार?

आजोबांकडे कॉम्प्युटर गेम, मोबाइल काहीच नव्हतं. इतके दिवस रियाला कशाचीच आठवण आली नव्हती. ‘‘आजोबा, एक गेम आणा नं मार्केटमधून. खूप कंटाळा आला.’’ रिया असं म्हणाल्यावर आजोबांना सुचेनाच काही. त्या खेडेगावात काही गेम मिळण्यासारखे नव्हते. ते दोघे तिला रोज नवी गोष्ट सांगत, तरीही रिया चार-पाच दिवसांतच वैतागली. त्यांच्या घराजवळच राधाबाई नावाच्या त्यांच्या कामवाल्या बाईचं घर होतं. त्यांना चंदा नि नंदा या दोन मुली. कधी कधी त्या दोघींना घेऊन राधाबाई कामाला येत असत. आजीला एक युक्ती सुचली. त्यांनी राधाबाईंना म्हटलं, ‘‘उद्या येताना चंदा, नंदाला घेऊन या हं. रियाला जरा सोबत होईल. कंटाळलीय ती. आणि हो, येताना सागरगोटेही घेऊन यायला सांगा.’’

दुसऱ्या दिवशी सकाळी रियाला जाग आली ती तिच्या खोलीच्या दरवाजासमोर तिच्याच एवढय़ा दोन मुलींच्या गाण्यामुळे.

इरखई दुरखई तिरखई

गजगे खेळण्यात मजा येई

पाच नि खाच, सात नि भात

नऊ नि खऊ, अकरा नि बकरा

बोरुखडा नि मुठी मुठका

आमच्या खेळाची मजा ऐका

कोंबडय़ाची चोच अन् चिमणीची चोच

हळूच उचला हीच तर खोच

मुंगीला वाट द्या गं बाई

गजगा हळूच हलवा गं बाई

नाहीच जमत? तर चढवा हंडी

मुळीच नाही रडी नि खडी

गजगा जाईल आभाळा

झेल घ्यायचा, सांभाळा

दोघी-दोघी, तिघी-तिघी खेळू या खेळ

गंमत मोठी गजग्यांचा मेळ!

रिया ते गमतीदार गाणं ऐकतच राहिली. होशंगाबादला सगळं िहदी; त्यामुळे बरेच शब्द तिला कळले नाहीत, तरी आवडले. नकळत तीही टाळ्या वाजवून मान डोलवू लागली. रियाला उठलेली पाहून आजी म्हणाली, ‘‘रिया, चल, तोंड धुऊन दात घास. मग दूध पी.’’ दूध प्यायलावर ती म्हणाली, ‘‘आजी, मला त्यांचं गाणं ऐकायचंय.’’ आजी हसून म्हणाली, ‘‘हे बघ बेटा, या आहेत चंदा-नंदा. तुला कंटाळा आलाय ना एक पाय लांब ठेवून बसायचा? तुला एक नवा खेळ शिकवणार आहेत त्या. मी किनई, लहानपणी खेळत असे. बघच तू. मज्जा वाटेल तुला.’’

रिया, चंदा, नंदा गोलाकार बसल्या. चंदाने पाच सागरगोटे काढले आणि मग त्या दोघी जणी गजग्यांचा म्हणजे सागरगोटय़ांचा खेळ कसा खेळायचा ते रियाला शिकवू लागल्या. मधेच रिया म्हणाली, ‘‘पण ते तुमचं धमाल गाणं सांगा ना मला.’’ चंदा-नंदा हसल्या. तेव्हा मीनाआजी म्हणाली, ‘‘हे याच खेळाचं गाणं आहे. मीच केलंय ते. हे सागरगोटे म्हणजेच गजगे. या बिया किती गुळगुळीत आहेत बघ. वजनाला हलक्या. आमच्याकडे भरपूर आहेत. पहिल्यांदा पाच सागरगोटे घ्यायचे, जमिनीवर पसरून टाकायचे. मग त्यातला एक उजव्या हाताने उंच उडवायचा आणि त्याच वेळी जमिनीवरचा एक गजगा उचलायचा. म्हणजे एरखई, नंतर दुसऱ्या डावात असेच दोन गजगे उचलायचे म्हणजे दुरखई. तिरखई म्हणजे तीन उचलायचे आणि एक उंच उडवून झेलताना जमिनीवरचे चार गजगे उचलायचे- ती चौरखई’! ‘मज्जाच आहे.’ मधेच रिया बोलली. ‘अजून पण खेळ आहेत रियाताई.’ मग चंदा-नंदा एकदमच म्हणाल्या, ‘दोन्ही हातांचे अंगठे आणि अंगठय़ाजवळच्या दोन बोटांनी एकेक करून सगळे गजगे त्या गुंफलेल्या बोटांच्या पोकळीत म्हणजे ओंजळीत टाकायचे. त्याला ‘कोंबडीची चोच’ म्हणतात. करंगळ्या सोडून हातांची बाकीची बोटे एकमेकांत अडकवून मग दोन्ही करंगळ्यांचा चोचीचा आकार येतो ना, त्याने एकेक गजगा उचलून ओंजळीत टाकायचा. ही झाली ‘चिमणीची चोच.’ सगळे गजगे टाकता आले नाहीत तर डाव दुसरीकडे जातो. मुठी मुठक्याची गंमत वेगळीच. एक गजगा उंच उडवून जमिनीवरचा गजगा त्याच हाताने पटकन् उचलून ती मूठ छातीवर हळूच आपटायची. एकदा-दोनदा-तीनदा जसे जमेल तसे; पण मुठका आपटून वरचा खडा त्यात झेलायचा असतो, हे विसरायचं नाही.’’ त्या अजून काही बोलणार तेवढय़ात रिया म्हणाली, ‘‘पण आजी हे कसं गं येणार?’’

आजी हसली आणि म्हणाली, ‘‘अगं, आमच्या लहानपणी आम्ही हाच खेळ खेळायचो. हा कौशल्याचा भाग आहे. त्यासाठी मन एकाग्र करावं लागतं. जमिनीवर बसून खेळायचा हा मजेदार आणि बिनखर्चाचा खेळ आहे. या सगळ्या खेळात हातांच्या बोटांपासून खांदे, मानेचे स्नायू या सगळ्यांचा छान व्यायाम होतो आपोआप. शिवाय मन एकाग्र करणं, कौशल्य वाढवणं हे मोठ्ठे फायदे! डोळ्यांचाही व्यायाम होतो. असं बघ रिया, या खेळात वर उडवलेला सागरगोटा झेलण्यासाठी आपण मान वर करतो. आपोआपच डोळेही. डोळ्यांसाठी हा खूप सोपा आणि फायदेशीर व्यायाम आहे. वेळही छान जातो. आता या चंदा-नंदा तुला शिकवतील. हळूहळू समजेल आणि तुझा कंटाळाही पळून जाईल. सागरगोटे वजनाला खूप हलके आणि गुळगुळीत असतात. त्यामुळे झेलताना अंगावर पडला तरी त्रास नाही.’

‘‘पण आजी, हे सागरगोटे मिळतात कुठे गं? आणि नसले तर गं?’’ रिया म्हणाली. ‘‘नसले तर नसले. इथे समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूत लहान गुळगुळीत खूप गोटे असतात. त्यांनीही खेळता येतं. आणि मी देईन ना तुला. मग तुझ्या हौशंगाबादच्या मत्रिणींनाही शिकव. आहे ना मस्त, स्वस्त आणि मजेदार खेळ? मोबाइल, कॉम्प्युटर आणि रिमोटवाले महागडे खेळ यांमुळे डोळ्यांना त्रास तर होतोच, शिवाय त्यांना खूप पैसेही लागतात. चला, मला काम आहे आता. खेळा हं तुम्ही,’’ असं म्हणून आजी स्वयंपाकघरात गेली. चंदा-नंदा रियाला शिकवू लागल्या. आठ दिवसांत रियाला बरंच कळलं. मज्जा आली आणि आपला पाय दुखतो हेही ती विसरली.

मग मत्रिणींनो, तुम्हीही खेळणार ना हा धम्माल खेळ?