21 September 2018

News Flash

अवकाश- स्थानक बघायचंय?

शास्त्रज्ञ पेगी व्हिटसन यांनी नुकताच एक मोठा विक्रम केला आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

शास्त्रज्ञ पेगी व्हिटसन यांनी नुकताच एक मोठा विक्रम केला आहे. सलग २८८ दिवस त्या आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकावर (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) राहून आल्या आहेत; आणि त्यांचा स्थानकावरचा एकूण मुक्काम झाला आहे ६६५ दिवस!

HOT DEALS
  • Apple iPhone 6 32 GB Space Grey
    ₹ 25799 MRP ₹ 30700 -16%
    ₹4000 Cashback
  • JIVI Revolution TnT3 8 GB (Gold and Black)
    ₹ 2878 MRP ₹ 5499 -48%
    ₹518 Cashback

माणसाला अवकाशात जाण्याची ओढ आहे. पण त्याआधी खूप अभ्यास हवा. अवकाशात रसायनं, जिवाणू-विषाणू, वनस्पती, प्राणी, माणूस यांच्यावर वेगवेगळे परिणाम होतात. त्यांचा अभ्यास करण्यासाठी अवकाशस्थानकात बरेच प्रयोग सुरू असतात.

पण तिथे गंमतजंमतसुद्धा असते. जवळजवळ शून्य वजन असल्याने आपोआप होणाऱ्या उलटसुलट कोलांटय़ा, खातानाची तारांबळ, खेळ, पार्टी असं काही ना काही तिथं सुरू असतं. आणि अवकाशवीर आवडीने स्थानकावरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.

हे सगळं ऐकल्यावर आपल्यालाही या स्थानकावर जाऊन बघावंसं वाटतं ना? पण प्रत्यक्ष जरी तिथं जाता आलं नाही, तरी आपण हे स्थानक पृथ्वीवरून अगदी आरामात बघू शकतो. हे स्थानक पृथ्वीभोवती दिवसातून सुमारे सोळा फेऱ्या घालतं. त्यातल्या काही फेऱ्या तर थेट आपल्या घरावरून जातात!

अवकाशस्थानकावर दिवे बसवलेले नाहीत. त्याच्यावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे ते आपल्याला दिसतं. मात्र दिवसा भरपूर उजेडात हे स्थानक आपल्याला बघता येणार नाही. फक्त पहाटे सूर्योदयाच्या किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारास ते बघता येईल.

आपल्या परिसरात हे स्थानक कधी दिसू शकेल याची माहिती नासाकडून सहज मिळवता येते. https://spotthestation.nasa.gov/signup.cfm   इथं रजिस्टर केलं की अवकाशस्थानक कधी बघता येईल याच्या ई-मेल्स नासा आपल्याला पाठवत राहते. त्यात कुठच्या दिशेला किती वेळ स्थानकाचा प्रवास आकाशात दिसेल याची माहितीही असते.

अवकाशस्थानकाचा वेग चांगलाच असतो. त्यामुळे हे स्थानक आकाशात विमानाच्या तिपट्ट वेगाने जाताना दिसतं. त्याचा आकार विमानासारखा वाटतो, पण विमानासारखे लुकलुकते दिवे तिथं नसतात. छोटी दुर्बीण वापरली तर तपशील आणखी स्पष्ट दिसतील. तेजस्वी असं ते अवकाशस्थानक आकाशात प्रवास करताना बघितलं की केवढा अभिमान वाटतो!

तुम्हीही बघायला विसरू नका!

– मेघश्री दळवी

meghashri@gmail.com

First Published on February 18, 2018 12:58 am

Web Title: international space station 2