डॉ. नंदा संतोष हरम

nandaharam2012@gmail.com

पाचवी ‘अ’च्या वर्गात आज गडबड चालू होती. एकतर शेवटचा तास.. त्यातून उद्या शनिवार.. त्यामुळे मुलं सुटीच्या मूडमध्ये होती. ‘‘बाई, आपण आज गेम खेळू या ना!’’ मुलं बाईंकडे हट्टच करत होती. वर्गातल्या वर्गात काय खेळणार, म्हणून बाईम्हणाल्या, ‘‘तुम्ही एकमेकांना कोडी घाला.’’ बाईंना वाटलं, तेवढाच मुलांच्या बुद्धीला ताण! वर्ग ४० मुलांचाच होता. त्यांनी दोन गट तयार केले. शेवटची १५ मिनिटं त्यांना खेळायला परवानगी दिली. त्या वर्गात राज आणि विराज अशी जुळी भावंडं होती. बाईंनी मुद्दामच त्यांना दोन वेगवेगळ्या गटांत घातले. त्यांना एका गटातून खेळायचं होतं. बाईंनी ‘नाही’ म्हणताच दोघेजण हिरमुसले. पण बाईतयार होईनात असं बघताच ते एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि दोघं वेगवेगळ्या दोन गटांत जाऊन बसले.

एक गट कोडं ठरवायचा. त्यातलाच एक जण दुसऱ्या गटाला कोडं घालायचा. गंमत अशी झाली की, दोन्ही गटाच्या तीन-तीन फेऱ्या झाल्या, पण उत्तरं कायम राज आणि विराजच देत होते. बाईंच्या लक्षात आलं की ही मुलं काहीतरी लबाडी करताहेत. तेजस नावाचा एक चुणचुणीत मुलगा होता. त्याने या दोघांवर लक्ष ठेवलं. राजच्या गटाने कोडं घालताच विराजने राजकडे कागदाचा बोळा टाकला. तेजसने तो शिताफीने पकडला.  धावत तो बोळा घेऊन बाईंकडे गेला. त्यांच्या हातात तो बोळा देत म्हणाला, ‘‘हे बघा बाई, विराजने राजला उत्तर कसं सांगितलं ते!’’ बाईंनी कागद उघडला, तर तो कोराच होता. त्यावर काही लिहिलेलं नव्हतं. तेजसची फजिती झाली. बाई काही बोलणार एवढय़ात बेल वाजली. आता मुलांना कसला धीर- ती गलका करत बाहेर पळाली. बाईंनी राज आणि विराजकडे बघितलं. ते दोघं गालातल्या गालात हसत होते. बाई मनातल्या मनात म्हणाल्या, ‘‘उद्या बघू.’’

दुसऱ्या दिवशी पहिले तीन तास बाई काहीच बोलल्या नाहीत. राज-विराज यांना वाटलं की बाई विसरल्या बहुतेक.. मधल्या सुटीची बेल झाली तेव्हा चटकन बाई विराजजवळ आल्या आणि त्या दोघांना त्यांनी स्टाफ – रूममध्ये यायला सांगितलं. राज-विराजना कळलं, आता आपली सुटका नाही. सुरुवातीला त्यांनी काही कबूल केलं नाही, पण बाई पाठच सोडेनात. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही खरं सांगितल्याशिवाय तुम्हाला मी सोडणार नाही. मी तुमच्यावर राग धरणार नाही, पण तुमची चलाखी कळू दे तरी मला..’’

राज-विराज दोघांची एवढीशी तोंडं झाली. दोघांनी बाईंची माफी मागितली. दोघेही एका सुरात म्हणाले, ‘‘सॉरी, बाई! परत आम्ही असं वागणार नाही.’’ बाई म्हणाल्या, ‘‘कागद तर कोरा होता, मग तुम्हाला उत्तरं कशी सांगता येत होती?’’

दोघेही पटकन म्हणाले, ‘‘तो एक छोटासा प्रयोग आहे.’’

‘‘प्रयोग? अरे व्वा! मग सांगा आता एका वेळी एकानेच बोलायचं.’’

राज म्हणाला, ‘‘मधल्या सुटीत आम्ही मित्रांना तो प्रयोग करून दाखवणार होतो, पण वेळच मिळाला नाही. तुम्ही आम्हाला दोन वेळा वेगवेगळ्या गटांत घातलं आणि एकदम आम्हाला सुचलं की आपण या प्रयोगाचा उपयोग करू शकतो.’’

विराज म्हणाला, ‘‘आमच्या सोसायटीत लहान मुलांसाठी विज्ञानाच्या प्रयोगाचं प्रात्यक्षिक झालं होतं. बटाटय़ातील पिष्टमय पदार्थाची टिंक्चर आयोडिनबरोबर अभिक्रिया होऊन निळा रंग कसा तयार होतो, ते दाखवलं होतं.’’

आता राज सांगू लागला- ‘‘आम्ही हा प्रयोग घरी आई-बाबांना सांगितला. तेव्हा आई म्हणाली की, तुम्ही आपण स्वयंपाकघरात वापरतो असा एखादा पिष्टमय पदार्थ शोधा बरं!’’

विराज उत्साहाने सांगू लागला. ‘‘आईने दुसऱ्या दिवशी साबुदाण्याची खिचडी केली. आम्हा दोघांना ती खूप आवडते. आईने ती रोज करावी म्हणून आम्ही हट्ट करायला लागलो. तेव्हा आई म्हणाली, ‘‘साबुदाणा एवढा पौष्टिक नसतो रे. त्यात प्रथिनं अगदी नगण्य असतात. स्टार्चचं खूप प्रमाण असतं.’’ ‘‘आम्हाला आमचं उत्तर सापडलं.’’ राज म्हणाला. आम्ही साबुदाणा भिजवला. मऊ झाल्यावर हाताने चुरडला. त्यात टिंक्चर आयोडिन घातलं. त्याबरोबर निळा रंग आला.’’

बाई म्हणाल्या, ‘‘टिंक्चर आयोडिनविषयी माहिती होती तुम्हाला?’’ विराज म्हणाला, ‘‘खेळताना आम्ही कायम धडपडत असतो. तेव्हा छोटीशी जखम झाली की आई टिंक्चर आयोडिन लावते. ती आम्हाला सगळं सांगत असते.’’

‘‘अरे व्वा! पण मग ही कागदाची काय भानगड?’’

विराज म्हणाला, ‘‘ती युक्ती आम्हीच शोधली खेळताखेळता. साबुदाण्याची पेस्ट काडीने आम्ही कागदावर लावली. त्यावर आयोडिन टाकल्यावर निळा रंग आला.’’

बाई म्हणाल्या, ‘‘फारच हुशार आहात तुम्ही! काल तुम्ही उत्तरं कागदावर लिहिली, साबुदाण्याची पेस्ट वापरून?’’

‘‘हो, बाई! आमच्याकडे दोघांकडे दोन्ही बाटल्या होत्या.’’

बाईंना दोघांच्या कल्पकतेचं कौतुक वाटलं. पण त्यांनी राज-विराजना दम भरला. ‘‘काल तुम्ही याचा असा वापर केलात, त्यातून कुणाचं नुकसान झालं नाही. पण आपल्या ज्ञानाचा उपयोग कुणाला फसविण्याकरिता करायचा नाही. मग हळूहळू तीच सवय लागते. जाणूनबुजून अशा गोष्टी करून दुसऱ्याला फसवलं की तो गुन्हा ठरतो. कळलं? नाही ना करणार असं परत?’’

राज-विराज पटकन म्हणाले, ‘‘आम्हाला आमची चूक कळली बाई! परत असं नाही करणार.’’

बाई म्हणाल्या, ‘‘मधली सुटी संपल्यावर पुढच्या तासात तुम्ही हा प्रयोग वर्गात दाखवा आणि सर्वाची माफी मागा.’’

‘‘हो, बाई!’’ म्हणत राज-विराज स्टाफरूममधून बाहेर आले आणि त्यांनी आपल्या वर्गाकडे धूम ठोकली.