16 January 2019

News Flash

आयोची ओढाताण

चंद्रामुळे समुद्राला भरती येते हे तुम्हाला माहीत असेलच.

चंद्रामुळे समुद्राला भरती येते हे तुम्हाला माहीत असेलच. चंद्र पृथ्वीच्या ज्या बाजूला असेल त्या बाजूला चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील समुद्रातलं पाणी उचललं जातं हे त्यामागचं कारण आहे. पण आपल्या या सूर्यमालेत एक अजब चंद्र आहे. त्याच्यावर चक्क जमिनीला भरती येते. माहीत आहे का? आयो हा तो चंद्र. गुरू ग्रहाचा! आकाराने साधारण आपल्या चंद्राइतकाच आणि गुरूच्या सर्वात जवळ असलेला. गुरू म्हणजे सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह. तेराशे पृथ्वी त्याच्यात आरामात बसतील एवढा अवाढव्य. गुरूच्या या असल्या अबब आकारमानामुळे आयोवर त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रचंड प्रभाव पडतो.

त्यातून गुरूचे आणखी दोन मोठे चंद्र गनीमीड आणि युरोपा हेसुद्धा जवळ असल्याने त्यांच्या गुरुत्वाकर्षणालाही आयोला तोंड द्यावं लागतं. हे तिघं आयोला सतत आपल्याकडे खेचत असतात. त्यातून तो कसाबसा आपली गुरुप्रदक्षिणा पार पाडत असतो.

आपल्या कक्षेत फिरताना कधी आयोच्या एका बाजूला गुरू, गनीमीड आणि युरोपा तिघेही येतात, तर कधी गुरू एका बाजूला आणि दुसरीकडे गनीमीड आणि युरोपा अशी जोडी येते. त्यामुळे या तिघांच्या खेळात आयोचा पृष्ठभाग अक्षरश: डळमळत असतो. एकदा इकडे तर एकदा तिकडे अशा लाटाच जणू त्या खडकाळ जमिनीला येत असतात. यातली एकेक लाट एकेकदा शंभर मीटर इतकी उंच जाते. म्हणजे जवळजवळ तीस मजली इमारतीएवढी!

अशा वेळी हा बिचारा आयो चेपलेल्या बॉलसारखा दिसायला लागतो. ते दिसणं जाऊ दे. या ओढाताणीत त्याच्या आत भयंकर उष्णता निर्माण होते आणि आतला गरम लाव्हा उफाळून बाहेर यायला लागतो. उगीच नाही आयोवर मोठमोठे ज्वालामुखी आग ओकत असतात! त्यातले काही तर अवकाशात तीनशे किलोमीटर इतके उंच लाव्हा उडवत असतात. बरंय की, आपण त्यामानाने शांत अशा पृथ्वीवर राहतोय आणि इथे फक्त समुद्राला भरती येतेय, तीही फार फार तर अठरा मीटर उंच लाटांची!

– मेघश्री दळवी

meghashri@gmail.com

First Published on April 15, 2018 12:12 am

Web Title: io moon of jupiter planet