शाळेची बस थांबली. अवी खाली उतरला. ऊन चांगलेच तापले होते. अवी सावकाश घराकडे चालायला लागला. इमारतीपाशी पोहोचल्यावर त्याने खिशत हात घातला व ‘ते’ खोडरबर बाहेर काढले. जिन्याखाली सायकली ठेवतात तिथे तो शिरला. जरा अंग चोरूनच कोणाला दिसणार नाही असा बसला. मग त्याने ते खोडरबर पुढून- मागून नीट बघितले. छोटय़ाशा जोकरच्या आकाराचे ते खोडरबर त्याला खूप आवडले होते. रंगीबेरंगी आणि वासाचे. तो कितीतरी वेळा त्याला उलटेपालटे करत न्याहाळत होता. जोकरचा पिवळा शर्ट, भडक जांभळी पँट, उंच हिरवी टोपी आणि लालबुंद नाक.. किती छान!

‘‘माझ्या मामांनी अमेरिकेतून पाठवलंय’’- अथर्वचा आवाज त्याच्या मनात घुमला.

एक मोठ्ठा श्वास घेत अवीने परत एकदा त्याचा छातीभरून वास घेतला. मग तो खोडरबर खिशात ठेवून तो जिने चढत वरती घरी गेला.

घरी गेल्यावर त्याने ते दप्तरात ठेवून टाकले. आईला दिसले असते तर तिने अनेक प्रश्न विचारले असते. आज त्याने निमूट सर्व वेळेवर आवरले. चार वाजता न सांगता अभ्यासालाही बसला. त्यांनी कंपासपेटीत त्याचे नेहमीचे खोडरबर पाहिले आणि त्याला ते जोकरचे खोडरबर परत एकदा पाहावेसे वाटले. त्याचा वास आठवला. पण मग भानावर येऊन तो परत अभ्यासाला लागला.

‘‘काकू, आईने विरजण मागितलंय.’’ आवाजावरूनच अवीला समजले की विवेकदादा आलाय. अवीने लिहायचे थांबवले. आई हसून उठली. दादाच्या हातातून वाटी घेऊन ती स्वयंपाकघरात गेली.

‘‘काय रे? अभ्यास करतोस?’’ – दादाने विचारले.

‘‘हो! न सांगता..!’’ अवीने छाप मारायचा प्रयत्न केला. दादा नुसता हसला. काही बोलला नाही.

अवीला ती पुढची शांतता सहन झाली नाही. स्वत:च्याही नकळत त्याने ते खोडरबर दप्तरातून बाहेर काढले.

‘‘हे बघ’’

‘‘तुझं आहे का ढापलं कुणाचं?’’- दादा

अवी एकदम चपापला. दादा असे काही विचारेल त्याला वाटलेच नव्हते.

‘‘माझ्या मित्राचं आहे. मला दिलंय. म्हणजे.. कायमचं नाही. एका दिवसाकरता.’’

‘‘एका दिवसाकरता?’’- दादा

अवी विचारात पडला. दादा पुढे बोलायला लागला, ‘‘बघ हं, काळजी घे. चोर कसे तयार होतात माहीत आहे? आधी- पेन्सिल, पट्टी, खोडरबर मग बॅट, बॉल- मग मोठय़ा वस्तू, पैसे.. आधी छोटय़ा चोऱ्या, मग थोडय़ा मोठय़ा, मग अजून मोठय़ा आणि मग एक दिवस..’’

दादा हातवारे करत सांगत होता. तेवढय़ात आई आली. दादा एकदम गप्प बसला. अवीला बरेच वाटले. पण जाताना दादाने अवीकडे बघत एक भुवई उंचावली आणि हलकेच मानेला झटका दिला..

सोसायटीतल्या सगळ्या दादा मंडळींचा अवी जाम भक्त होता. त्यामुळे विवेकदादा गेला, पण त्याचे बोलणे अवीच्या डोक्यातून जाईना. संध्याकाळभर डोक्यात सारखे विचार येत होते. शेवटी रात्री झोपायच्या अगोदर अवीने आईला विचारायचे ठरवले.

‘‘आई, कोणाचं काही न सांगता घेतलं तरी ती चोरी होते का गं?’’

‘‘म्हणजे काय? चोर काय सांगून चोरी करतो का?’’

आई हसून म्हणाली.

‘‘एका दिवसाकरता घेतलं तर?’’ अवीने आशेने विचारले. ‘‘एक नाही आणि दोन नाही. कोणाचं काही घेऊ नाही. कारण आपण चांगले आहोत. चोर नाही. हो ना?’’ अवीने मान डोलावली. खरे तर त्याला आईला घट्ट मिठी मारावीशी वाटली. सगळे खरे खरे सांगावेसे वाटले. पण काही केल्या धीर एकवटेना.

मध्यरात्री अवीला स्वप्न पडले. तो एका कापडाच्या झोळीत होता. हळूहळू तो बाहेर यायला लागला. येता येता अवीचे कपडे बदलायला लागले. काळी पँट, काळ्या – पांढऱ्या पट्टय़ा पट्टय़ाचा टीशर्ट आणि चित्रात दाखवतात तसा लांबडा काळा चष्मा! तो मदतीसाठी ओरडतही होता- ‘‘वाचवा! वाचवा! मी चोर होतोय!’’

अवीला दचकून जाग आली. तो घामाने चिंब ओला झाला होता. ते स्वप्न होते हे समजल्यावर त्याला हायसे वाटले.

अवी उठला. त्याने दप्तर उघडले. ‘ते’ खोडरबर बाहेर काढले. का कोणास ठाऊक आता त्याला ते रंगीबेरंगी वाटले नाही. उलट रात्रीच्या वातावरणात ते त्याला जास्तीच बटबटीत वाटले. त्याने ते खोडरबर मुठीत घट्ट दाबले आणि तो स्वत:शीच पुटपुटला, ‘‘मी चोर नाहीये. आणि मी होणारही नाही.’’

दुसऱ्या दविशी सकाळी शाळेत बस थांबताच अवी घाईघाईनी निघाला. सगळ्यांच्या अगोदर वर्गात पोचायचे असे त्याने ठरवले होते आणि खरेच त्याचे नशीब की तो पोहोचला तेव्हा वर्गात कुणी नव्हते. त्यानी घाईघाईने दप्तर उघडले. ते खोडरबर काढले. थोडा विचार केला आणि दोन बेंचच्या मध्ये, जरा सहजासहजी दिसणार नाही असे ठेवायला वाकला; तोच त्याला तीन-चार जणांचे पाय दिसले. अवी सावकाश उठून ताठ उभा राहिला. समोरच अथर्व होता. मागे सिद्धार्थ, ईशान, सार्थक आणि कबीर उभे होते. अवीच्या तोंडातून शब्दच फुटेनात. तो रंगेहाथ पकडला गेला होता.

तेवढय़ात ‘‘अवीऽऽऽ!’’ असे ओरडून अथर्वने त्याला मिठीच मारली. अवी अजूनच चमकला. ‘‘तू माझं खोडरबर मिळवून दिलंस.’’ अथर्व आनंदाने म्हणाला. ‘‘कालपासून मिळत नव्हतं. तू सापडवलं.’’

आता सगळेच गोंधळले. अवीवर इतर कोणाचाही विश्वास नव्हता. जो कोणी त्याच्या जवळ बसायचा त्याचे काय काय गायब होत असायचे.

प्रार्थना झाली. शाळा सुरू झाली. अवीचे मात्र लक्षच लागेना. अथर्वला झालेल्या गैरसमजामुळे तो अजून बेचैन झाला. हे असे आपल्याला का होतेय अवीला समजेना. धीर एकवटून मधल्या सुटीत अवीने अथर्वला गाठले. सरळ सरळ सांगितले. ‘‘काल मीच तुझं खोडरबर घेतलं होतं. सॉरी अथर्व. मी परत कधी काही घेणार नाही.’’

बोलताना अवीचा आवाज कापत होता. अथर्व काही म्हणायच्या आता अवी फिरला अन् झपाझप चालत जागेवर येऊन बसला. शाळा पुढे चालू झाली. त्याने नंतरही अथर्वकडे पाहिले नाही.

शेवटच्या तासाला अवीची लिहिताना खाडाखोड झाली. त्याला त्याचे खोडरबर मिळेना. बहुतेक घरीच राहिले. अवी क्षणभर घोटाळला. बाई पुढे सांगत राहिल्या. अख्खा वर्ग लिहीत होता. हळूहळू अथर्वची मूठ अवीच्या वहीवर आली. मग उघडली. त्यातून जोकरचे खोडरबर अवीकडे बघून हसत होते. आता कुठे अवीने अथर्वकडे पाहिले. आश्चर्य म्हणजे अथर्वही शांत होता.

शाळा सुटल्यावर अथर्व स्वत:च सांगायला लागला. ‘‘मीपण एकदा चोरी केली होती. त्यावेळेस आई माझ्याशी दिवसभर बोलली नाही. आपल्याला चोरी करायची नसते रे. काहीतरी आवडतं, एवढंच. तुला आवडलंय ना हे खोडरबर?’’

अवी काही बोलला नाही.

अथर्वने चालता चालता एक हात अवीच्या खांद्यावर टाकला.

‘‘आपल्याला जे आवडतं ते आपण एकेमेकांना वापरायला देऊ. मग हा प्रश्न येणारच नाही. आई म्हणते मैत्रीत वाटून घ्यायचं असतं.’’

आत आत कुठेतरी अवी शांत होत होता. स्वत:ला माफ केल्याबद्दल मनोमन अथर्वचे आभार मानत होता.

वर्ष संपले..

आज ते जोकरचे खोडरबर चुका दुरुस्त करत करत झिजून गेले. अवी आणि अथर्वची मैत्री मात्र अजूनही कायम आहे.

 

लीना कुलकर्णी

storyeducationpune@gmail.com