26 February 2021

News Flash

कांदेपोहे

जय आणि मधुराकडे मल्हार आणि रिया दुपारी खेळ खेळत होते.

मला भूक लागलीय.’’

जय आणि मधुराकडे मल्हार आणि रिया दुपारी खेळ खेळत होते. थोडय़ा वेळाने   जय म्हणाला, ‘‘ए, आता आपण थांबूया का? मला भूक लागलीय.’’

‘‘हो हो मलापण लागलीय, पण आपण आईला उठवूया नको हं, कालच तिच्या पायाला प्लॅस्टर घातलेय. डॉक्टर काकांनी तिला आराम करायला सांगितलंय नं.. मग काय बरं करूया?’’ मधुराची शंका.

‘‘आयडिया.. आज आपणच काहीतरी खायला करू आणि आईलापण सरप्राइज देऊया.’’- जय.

‘‘व्वॉव! चालेल चालेल. मस्त आयडिया,’’ मल्हारची संमती.

‘‘पण नक्की काय करायचे?’’ रिया.

‘‘अं.. मला ना मॅगी करता येते, पण आता त्यावर बंदी आलीय ना! हं.. सुचलं मला. आपण कांदेपोहे करूया का? मला जाम मूड आलाय पोहे खायचा.’’ जयचा उत्साही स्वर.

‘‘ए, पण तू मुलगा आहेस ना, तुला करता येईल का सगळं?’’ – रिया.

‘‘हो मग? आता मुलाची आणि मुलीची कामं असं काही नसतं हं. आणि आमची आई तर मला आणि मधुराला नेहमीच आलटूनपालटून काम वाटून देत असते. हो की नाही मधुरा?’’ जयच्या प्रश्नावर मधुराने मान डोलावली.

‘‘म्हणून तर मला मॅगी आणि चहासुद्धा करता येतो. मी आधी पोहे केलेले नाहीत, पण आईला करताना बरेचदा पाहिलंय, तेच आठवून करीन की! आणि रिया, प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला जमतेय की नाही कसे कळणार?’’ जय म्हणाला.

‘‘आम्ही तुला काय मदत करायची सांग पाहू?’’ मल्हारने तयारी दाखवली.

‘‘ए थांब हं, मी बेडरूमचे दार लोटून येते. आपल्या किचनमधल्या आवाजाने आईची झोपमोड व्हायला नको, शिवाय तिला सरप्रइज द्यायचेय ना!’’ मधुराची हुशारी.

बालभवनमधे जाणाऱ्या जयला भाज्या सोलायचे, किसायचे ट्रेनिंग मिळाले होते. गोकुळाष्टमी साजरी करण्यासाठी तिथे प्रत्येकाकडून १-१ वाटी पोहे मागितले होते. त्या अंदाजाने त्याने ५ वाटय़ा पोहे धुऊन घेतले आणि मधुराला कांदे चिरायला सांगितल्याबरोबर, ‘‘मी मुळ्ळीच कांदे चिरणार नाही. आई कांदे चिरते तेव्हासुद्धा माझे डोळे चुरचुरतात. मला दुसरे काम सांग.’’ असं म्हणत मधुराने कांदे चिरायला ठाम नकार दिला.

‘‘ठीक आहे, मल्हार तू या कांदे चिरायच्या यंत्राने कांदे चिरून दे, शिवाय मिरची-कोथिंबीर लिंबू जमेल तसे कापून देशील?’’ जयच्या प्रस्तावाला मल्हारने तयारी दाखवली.

‘‘ए, आजचा दिवस आपणही सगळेजण आईबरोबर चहाच पिऊया का?’’

‘‘होऽऽऽ’’ जयच्या प्रश्नाला एकमताने संमती मिळाली.

‘‘मधुरा आणि रिया तुम्ही एकीकडे प्लेट्स, चमचे, कपबशा, पाण्याची तयारी करा पाहू.’’ जयच्या सूचना सुरू झाल्या. मल्हारचा कांदा चिरून झाल्यावर जयने कढई गॅसवर ठेवून त्यात अंदाजाने तेल घातले. ते तापल्यावर आईच्या स्टेप्स आठवून त्यात मोहरी घालून तडतडल्यावर हिंग, हळद घालून फोडणी केली, त्यावर मिरचीचे तुकडे आणि कांदा घालून परतले आणि त्यावर भिजलेले पोहे, मीठ आणि चवीला साखर घालून ते काळजीपूर्वक ढवळणारा जय सगळ्यांना भारी वाटत होता.

‘‘ए, मी पोहे ढवळायला मदत करू तुला?’’ चुरचुरणारे डोळे पुसत रियाने विचारले.

‘‘नाही. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा लहान आहात. माझ्याएवढे म्हणजे सातवीत गेल्यावर तुम्ही गॅसजवळची कामे करायची,’’ जयदादा जरा अधिकारातच बोलला. एकीकडे त्याने आईने शिकवल्याप्रमाणे चहाही बनवला. इतक्यात ‘‘एक मिनिट.. दादा कुठलेही काम करताना झालेला पसारा लगेचच आवरून टाकायची आईची नेहमीची वॉर्निग लक्षात आहे नं? मग सगळ्यांनी मिळून हा किचन प्लॅटफॉर्म, टेबल सगळे स्वच्छ करूया आणि मगच आईला उठवूया.’’ मधुराच्या सूचनेनंतर सर्वानी पटापट पसारा आवरला.

आईला उठवून तिच्या पुढय़ात कांदेपोहे आणि चहाचा ट्रे ठेवून सगळे तिच्याकडे उत्सुकतेने बघू लागले.

‘‘अरे, मी स्वप्न बघतेय की काय.. हे सर्व कुणी केलं? मला चिमटा काढा पाहू. हे तुम्ही कुठून मागवले की मल्हार-रियाकडून आले?’’ चकित झालेल्या आईची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.

‘‘अगं नाही.. हे सर्व आम्ही केलंय.’’ सगळ्यांचे एकसुरात आणि उत्साहात उत्तर.

‘‘म्हणजे पोहे आणि चहा जयने बनवलाय  आणि आम्ही त्यासाठी त्याला मदत केली.’’ मल्हारचा खुलासा.

‘‘व्वा! खूपच शहाणी बाळं आहात तुम्ही.’’ आईचे कौतुक सुरू असतानाच  ‘पोहे थोडे ओले राहिलेत.’ अशी  रियाची कुरकुर आणि ‘लिंबूपण जास्ती पिळलेय बहुतेक’ ही मधुराची कॉमेंट ऐकल्यावर उतरलेल्या चेहऱ्याच्या जयने हळूच आईकडे पाहिले. त्यावर आई म्हणाली, ‘‘अगं पहिल्यांदाच प्रयत्न केलाय ना म्हणून अंदाज आला नसेल. काही हरकत नाही, पुढच्या वेळी बरोब्बर अंदाज येईल हं तुम्हाला. आणि सध्या पोह्यांवर फ्रिजमधले थोडे खोबरे आणि डब्यातली शेव जरा जास्ती पसरा म्हणजे ओलसरपणा आणि आंबटपणा आपसूक कमी होईल. मला आराम मिळावा म्हणून भूक लागल्यावर मला न उठवता तुम्ही एकमेकांच्या मदतीने हा प्रयत्न केलात. कामाचा स्वत: अनुभव घेतलात हेच सगळं किती छान आहे!’’ खरोखरंच आईने सांगितल्याप्रमाणे केल्यावर पोहे खूपच चवदार झाले. तिच्याकडून तारीफ ऐकता ऐकता चहा-पोहे फस्तही झाले.

सगळे प्लेट्स आणि कपबशा आत ठेवायला गेले तेव्हा जय म्हणाला, ‘‘ए, आपली आई ग्रेट आहे ना, आपले पोहे खूप छान झाले नाहीत तरीही आईने त्यातल्या चुका न काढता आपल्या मेहनतीचे केवढे कौतुक केले. खरं म्हणजे आपली आईसुद्धा रोज अशीच मेहनत करून आपल्याला काय काय बनवून देते आणि आपण बरेचदा किती चुकीचे वागतो ना? डब्यातला पदार्थ आवडला नाही तर आपण बिनधास्त तो डबा म्हणजेच अन्न आणि तिची मेहनत वाया घालवतो तेव्हा तिला किती वाईट वाटत असेल नाही?’’

‘‘हो रे जय. तू म्हणतोस ते बरोबर आहे रे.’’ सर्वाचे कोरसमधे उत्तर.

-अलकनंदा पाध्ये (alaknanda263@yahoo.com)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2015 12:36 am

Web Title: kannada padhye article on kande pohe
Next Stories
1 स्थानिक व अस्थानिक वनस्पती
2 गोगलगाय
3 नको नुसती निंदा
Just Now!
X