उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारची वेळ.. वारा जोरजोरात वाहू लागला. झाडेही जोरात हलू लागली. आजूबाजूचा पालापाचोळाही भोवऱ्यासारखा गरगर फिरत उडू लागला. त्याच वेळी गुरांच्या गोठय़ात चिमू चिमणीचे घरटे गोठय़ाच्या माळ्यावरून धपकन खाली पडले. कापशी गाय दाव्याने ज्या खुंटीपाशी बांधली होती, अगदी तिच्यासमोर. त्या घरटय़ात चिमूची तीन चिल्लीपिल्ली होती. घाबरून ती रडवेली झाली.
चिमू घाबरून एकदम दचकली. खूप घाबरीघुबरी झाली. आता माझ्या लाडक्या पिल्लांचं खरं नाही, कापशी गाय त्यांना मारणार या भीतीनेच ती थरथरत होती. पटकन इकडे-तिकडे अस्वस्थपणे उडत होती; रडत होती. ओरडत होती. कापशी माझ्या पिल्लांना मारणार तर नाही ना? या विचारांनी ती अधिकच हळवी झाली. ती कापशीच्या अगदी समोर आली. हात जोडून याचना करू लागली, ‘माझ्या पिल्लांना मारू नकोस.’
कापशी त्या घरटय़ातील इवलूशा चिवचिव करणाऱ्या पिल्लांकडे एकटक पाहात होती. त्या कोवळ्या जिवांना न्याहाळत होती. त्यांची तगमग पाहात होती. त्या घरटय़ातील निष्पाप जिवांची भेदरलेली नजर, त्यांचा हलकासा चिवचिवाट तिला दु:खी-कष्टी करीत होता. तिच्या काळ्याभोर नेत्रांत करुणा होती. कापशीने आपल्या पिल्लांना काहीच केले नाही, हे पाहून चिमूला जरा धीर आला. तिला हायसे वाटले. कापशीला विनवणी करीत, हात जोडून म्हणाली, ‘कापशीताई, कापशीताई माझ्या पिल्लांना मारू नकोस गं, मी तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. तुझ्यावर संकट आले तर प्राणांची पर्वा न करता मदत करेन.’
कापशीने आपली मान हलवली. डोके वरखाली केले. करूण नजरेने चिमूकडे पाहिले. चिमूला कापशीच्या प्रेमळ नजरेत आश्वासकता दिसली. तिला धीर आला. मनातली भीती दूर कुठल्या कुठे पळाली. ‘कापशीताई, कापशीताई तू किती गं चांगली आहेस. तुला मी आयुष्यात कधीही विसरणार नाही,’ चिमू म्हणाली.
आता या पिल्लांना सुरक्षित कसे न्यायचे, या विचारात ती समोरच्या खुंटीवर जाऊन बसली. इतक्यात कावऽऽ काव करत कातळ्या कावळा गोठय़ात आला. त्याची काकदृष्टी त्या घरटय़ावर पडली. चिमूच्या हृदयात धस्स् झाले. आता काय करणार. कातळ्या माझ्या पिल्लांना गट्टम् करणार. कातळ्या पाषाणहृदयी आहे, हे तिला माहीत होते. तरीही कातळ्याकडे जाऊन ती विनवणी करून म्हणाली, ‘कातळ्यादादा, कातळ्यादादा माझ्या पिल्लांना खाऊ नकोस.’ पण कातळ्या कसला ऐकतोय. तो म्हणाला, ‘मला खूप भूक लागली आहे. मी तुझी पिल्ले खाणार.’ चिमू काकुळतीला येऊन हात जोडून म्हणाली, ‘कातळ्या तुझ्या पाया पडते.’ चिमू दु:खी-कष्टी होत अत्यंत आर्जवी स्वरात दयेची प्रार्थना करीत होती. ‘कातळ्या, माझी पिल्ले तशी तुझी पिल्ले, नको ना रे खाऊस, माझ्यावर तुझे उपकार होतील. आभारी होईन तुझी.’ चिमूच्या हृदयाला भिडणाऱ्या विनवणीचा कातळ्यावर बिलकूल परिणाम झाला नाही. तो टपूनच बसला होता. केव्हा ती लुसलुशीत पिल्ले खातो असे त्याला झाले होते. तो घुश्श्यातच बोलला. ‘मी पिल्ले खाणारच. माझी भूक ही पिल्ले खाऊनच शमवणार.’ कातळ्याचे हे उद्गार ऐकून चिमूताई ओक्साबोक्शी रडू लागली. चिमूचे रडणे कापशीचे अंत:करण भेदून गेले. तिने कातळ्याला आपल्या लांब शेपटीने पिटाळले. पण फिरून कातळ्या तिथे आलाच. ‘चल, चालता हो.’ कापशीने जोरात ओरडून दरडावले. ‘मला भूक लागली आहे,’ कातळ्या चिडून म्हणाला. ‘तुला भूक लागली ना मग माझ्या अंगावरच्या गोचिड वेचून खा.’ निर्दयी कातळ्या थोडेच ऐकतो. तो फिरून घरटय़ाकडे झेप घेऊ लागताच कापशीने शिंगांनी त्याला उडवले. तो परत परत प्रयत्न करीत होता. कापशी त्याला कधी शिंगांनी तर कधी शेपटीने हाकलून लावत होती. त्या दोघांच्या झटापटीत कातळ्या पार दमून गेला. शेवटी दमला-भागला कातळ्या निराश होऊन कावऽऽ काव ओरडत दूर पळून गेला. चिमूला हायसे वाटले.
‘कापशीताई, कापशीताई, तुझे खूप खूप उपकार झाले. तू देवतेसारखी धावून येऊन माझ्या सोनुल्यांना वाचवलेस, मी फार फार ऋणी आहे. तुझे उपकार केव्हा ना केव्हा नक्कीच फेडेन.’
‘चिमे! अगं मी माझे कर्तव्यच केले. जा, तुझ्या पिल्लांना लवकर सुरक्षित ठिकाणी घेऊन जा.’
काही दिवसांनंतर त्या गावात गुरांचा लागण नावाचा रोग आला. गावातली गुरे पटापट मरू लागली. गुरांच्या खुरांमध्ये किडे पडून ती हैराण होत आणि मरून पडत. कापशीलाही लागण झाली. ही गोष्ट चिमूला समजली. ती उडत उडत, लगबगीने गोठय़ात आली. लागण झाल्याने कापशी पाय आपटून आपटून हैराण झाली होती. तिची ती दयनीय अवस्था पाहून चिमू अस्वस्थ झाली. कापशीजवळ गेली. धीर दिला आणि लागली कामाला. आपल्या चोचीने खुरातील किडा काढून पायाने मारत होती. एक एक करत एका पायाच्या खुरातील सर्व किडे साफ केले. लगेच न थांबता दुसऱ्या पायाकडे वळली. त्या खुरातील किडे साफ केले. ती दमली होती. कापशीला विचारले, ‘आता कसे वाटते?’ थोडा आराम वाटला. चिमू न थांबताच पुन्हा जोरात कामाला लागली. तिसऱ्या पायाच्या खुरातील किडे काढण्यात मग्न झाली. दिवसभर अविरत श्रम करून तोही पाय साफ झाला. चिमू न खाता-पिता, न आराम करता काम करत होती. आता तिच्यात त्राणच उरले नव्हते, तरी तो चौथा पाय साफ करायला घेतलाच. तिच्या डोळ्यांवर अंधारी आली होती. तरी एक एक कीड चोचीने कशीबशी काढून टाकत होती. शेवटी तोही खूर पूर्ण साफ केला. तिला खूप समाधान वाटले. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. कापशी चारही पायांवर उभी राहिली, पण तिची मैत्रिण मात्र पाय ताणून चोच उघडी ठेवून क्षीण आवाजात कापशीला ‘का प शी’ म्हणत मूच्र्छित पडली. कापशी घाबरली. तिने क्षणात स्वत:ला सावरले. चिमूच्या तोंडात दुधाची धार धरली. चिमूलाही थोडी तरतरी आली. कापशी म्हणाली, ‘चिमू, आज तू माझे प्राण वाचवलेस. तुझ्या कृतज्ञतेने, प्रेमाने, कर्तव्यबुद्धीने आणि वचनपूर्तीने मी भारावून गेले आहे.’