छोटय़ा रतीचं लक्ष अभ्यासापेक्षा पावसाकडेच होतं. गृहपाठ पूर्ण केल्याशिवाय आई पावसात खेळायला पाठवणार नाही, हे तिला पक्कं माहीत असल्यामुळे भराभर अभ्यास पूर्ण करून ती छत्री नाचवत अंगणात पळाली. सगळे सखेसोबती पाण्यात थबक थबक करत नाचत होते. रतीच्या छत्रीतून पावसाचे थेंब आत येत तिला गुदगुल्या करत होते. हळूच एक थेंब कानात कुजबुजला, ‘ए, आम्ही आऽऽलो.’
‘‘कोण तुम्ही?’’ रतीने जरा न कळल्याचं नाटक केलं.
‘‘आम्ही सगळे थेंब. तू बोलावलंस ‘ये रे ये रे’ म्हणून, म्हणून इतक्या मोठय़ा संख्येने येतोय. विसरलीस?’’
‘‘छे, मी तर तुमची ७ जूनपासून वाट बघत होते.’’ रती.
‘‘काय करणार! आम्हाला खाली यावंसं वाटत होतं, पण आमच्या घरी आभाळात ‘ढासळतं पर्यावरण’ यावर चर्चा चालल्या होत्या, म्हणून उशीर झाला. तुमचं पृथ्वीवरचं रंगीबेरंगी जग आम्हाला खूप आवडतं. आमच्याकडे बघ ना, फक्त काळ्या रंगाचं राज्य. आम्ही रंगहीन, पारदर्शक. आकाशातले केशरी, लाल, निळा रंग आम्ही आलो की लपून बसतात. तुमच्या जवळचा हिरवा रंग आम्हाला फार आवडतो. शोधून शोधून बाहेर काढतो आम्ही त्याला..’’
‘‘कसे आलात धक्काबुक्की करत, जराही शिस्त नाही तुम्हाला,’’ रतीने शाळेतल्या बाईंसारखं सर्वाना झापलं.
‘‘बरोबर आहे तुझं. तुम्ही बाहेर निघालात की तुमचे आई-बाबा सूचना करतात ना, तसाच आमच्यावरही सूचनांचा भडिमार झाला. नीट रांगेत जा. रांग मोडू नका. इतकेतिकडे घुटमळू नका. सरळ धारा पडल्या तर तुमचं रूप सगळ्यांना दिसेल,’’ थेंब म्हणाले.
‘‘मग बिनसलं कुठं?,’’ रतीने मधे टोकलं.
‘‘हा वारा आहे ना, त्याच्या शक्तीपुढे आम्ही काही करू शकत नाही. कधी तो हलकेच ढकलतो. कधी गोलगोल राणी करायला लावतो. कधी फरफटत दूरवर घेऊन जातो. कधी रागात असला की आम्हाला ठोकून काढतो. कधी शहाण्यासारखा चूप बसतो. मग आम्ही पांढुरक्या धारा बनवत आमच्या लयीत, गुणगुणत खाली येतो. तसा अधूनमधून ढगांचा ओरडा खावा लागतो. वीजही डोळे वटारते. पण आम्ही घाबरत नाही. थोडय़ा वेळानं सगळं शांत होतं. आमच्या सवयीचं झालं आहे सगळं.’’
‘‘खाली कशाला येता पण दरवर्षी तुम्ही? कंटाळा नाही येत.’’
‘‘खरं सांगू. तुम्हाला ‘जीवन’ द्यायला येतो. शिवाय आम्हाला खूप खेळही खेळायचे असतात. हुंदडायचं असतं. हिरव्या पानांवर उतरलो ना, की अगदी राजासारखं वाटतं. फुलांचा तलम स्पर्श अनुभवत सुगंध घ्यायचा असतो. रंगीबेरंगी फुलपाखरांना गुदगुल्या करायच्या असतात. त्यांचे रंग खुलवायचे असतात. पक्ष्यांच्या पंखांवर बसून हवेत चक्कर मारायची असते. पान जरा लांबट असलं की आम्ही त्याच्या टोकावर बसलो की ते खाली झुकतं. मग आम्ही टुणकन् खाली उडी मारतो. पान वर जातं. आमचे भाऊबंद त्यावर बसायला टपलेलेच असतात. हा सी-सॉचा खेळ अखंड चालू असतो.’’
‘‘आम्ही तर वॉटरपार्कमध्ये तुमच्यापेक्षा जास्त गेम्स खेळतो,’’ रतीने आपलं घोडं पुढे दामटवलं.
‘‘मुळीच नाही. आम्ही उंच उंच झाडांच्या शेंडय़ांवरून, खोडांवरून, डोंगरदऱ्यांतून अशा घसरगुंडय़ा खेळतो, की तुमचे सगळे गेम्स फिके पडतील. चकोर तर आमच्या वाटेकडे अगदी डोळे लावून बसलेला असतो. आमच्या जिवाचं अगदी सार्थक होतं. तू तो डौलदार मोर पाहिला आहेस का गं?’’
‘‘हो तर.. ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनांत’ असं म्हटलं की तो नाचू लागतो,’’ रतीने टेचात सांगितलं.
‘‘नाही हं, आमच्या स्वागतासाठी तो नाचतो. त्याच्या मोरपिसाच्या मखमली स्पर्शानं आमचं भानच हरपतं.’’
‘‘ए, मी गॅलरीत उभी असते ना तेव्हा शेडवरून पागोळ्या झरझर पडत असतात. आणि मी तुला मस्त हाताच्या ओंजळीत पकडायचा प्रयत्न करते. मला ओलसर करत तू किती पटकन् खाली निसटतोस. मी आपली पुन्हा पुन्हा तुला हातात खेळवत गालांवर, डोळ्यांवर फिरवत राहते. का रे जरा हातात थांबत नाहीस?’’ रतीने आपला अनुभव सांगितला.
‘‘अगं, अंगणातल्या चिमुकल्या खड्डय़ात आधी निघालेले सगळे थेंब हातात हात गुंफून माझी वाट बघत असतात. मी धुपकन् खाली पडलो की छोटंसं कारंज उसळतं, आणि मग वर्तुळाकार नक्षीत मी पटकन् जागा पकडतो.’’
‘‘ए, आमचा सह्य़ाद्री पर्वत तुला दिसतो का रे खाली येताना’’ रतीला प्रश्न पडला.
‘‘होऽऽ, अगं, हे सगळे पर्वत आमच्या वाटा अडवतात. मग मस्त खळाळत, उडय़ा मारत, खडकाभोवती गिरक्या घेत आम्ही खाली येतो. खूप घनदाट जंगल असलं ना की खाली जायला रस्ताच दिसत नाही. सगळीकडे पानंच पानं. मोठय़ा मुश्किलीने खाली पोहोचतो. जे थेंब अगदी पहिले येतात ना ते पटकन् मातीला मिठी मारतात. पण तिचा पारा चढलेला असतो. मग बिचाऱ्यांच्या अस्तित्वावरच गदा येते. काही वेळाने मात्र ती पटकन पोटाशी घेते. तो गंध आम्हाला खूप आवडतो गं.’’
‘‘आमच्याकडे रंग नाही म्हणून रडतोस, मग इंद्रधनुष्य कसं रंगवतोस?’’ रतीचं कुतूहल जागृत झालं.
‘‘अगं, ते मलासुद्धा कोडंच आहे. सूर्यदेव ढगांना न जुमानता हिरवी सजावट बघायला डोकावतो. आम्ही वाटेत असतो तेव्हा त्याचे प्रकाशकिरण चक्क आमच्या पोटातून रंग घेऊन आरपार जातात आणि इंद्रधनुष्य काढतात. एरवी आमच्याजवळचे ते रंग आम्हाला का सापडत नाहीत, हा प्रश्नच आहे.’’
‘‘आणखीन काय काय करतोस रे थेंबा,’’ रती.
‘‘शेतातल्या काळ्या मातीत लोळायला मला खूप आवडतं. खूप मायेने तिथे आमची वाट बघितली जाते. कधी कधी झोपडीत डोकावतो. पण तिथे आमच्यामुळे सगळ्यांची तारांबळ होते. अगदी वाईट वाटतं अशी चूक झाली की. एखादा आमच्यातला भाग्यवान शिंपल्यात विसावतो, पाणीदार मोती बनतो आणि तुझ्या गळ्यात पडतो.’’
‘‘आणि विजेच्या तारांवर कसे छान एका रांगेत लोंबकळता रे..’’  रती म्हणाली.
‘‘तुझं आमच्याकडे लक्ष आहे तर! तिथून आम्हाला छान सगळं जग दिसतं. असं करण्यात चार महिने संपून जातात. घरची आठवण येऊ लागते. फिरून फिरून नदीत उतरतो. तिला घाई असते आम्हाला सागराकडे घेऊन जायची. सगळे तिथे भेटतो.’’
‘‘मग वर जाता कसे?’’ – रती.
‘‘आम्हाला वर पोहोचवण्याचं काम सूर्य तत्परतेने करतो.’’
‘‘अरे, पण जायलाच हवं का?’’ निरोप समारंभात रती गहिवरते.
‘‘अगं, पुढच्या वर्षी येण्यासाठी वरती जावंच लागतं. ‘का?’ हा प्रश्न विचारायचा नसतो. खरं ना!’’
रतीशी कानगोष्टी करणारा थेंब हळूच बाहेर निसटतो.

धो-धो पाऊस

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

धो-धो धो-धो पावसाची
धो-धो धो-धो गाणी
गावातल्या ओढय़ाला
कित्ती कित्ती पाणी

पाण्यामध्ये मासोबांची
कित्ती कित्ती गर्दी
पाण्यामध्ये खेळतात
म्हणून होते सर्दी

सर्दी झाली मासोबांचं
नाक लागलं गळू
डॉक्टरचं नाव घेता
लागला दूर पळू

औषध नाही घेतलं तर
सर्दी बरी होईल काय?
मासोबांचा मामा त्याला
आईस्क्रिम देईल काय?

-मनिषा तांबे

पावसा रे पावसा

पावसा रे पावसा
टपटप पडतोस
छोटय़ा छोटय़ा तळ्यात
थुई थुई नाचतोस।।

पावसा रे पावसा
वेडावाकडा पडतोस
छत्र्या लोकांच्या उलटून
गालात हळूच हसतोस।।

पावसा रे पावसा
ऐटच तुझी भारी
शाळा नाही, अभ्यास नाही
मजा आहे खाशी।।

-वासंती काळे