दारावरची बेल जोरजोरात वाजत होती. ‘‘आजी लवकर दार उघड. आम्ही सगळे भिजलो आहोत,’’ रतीचा आवाज ऐकून मी ताडकन उठले. ‘अगं बाई, पाऊस आलाय वाटतं. रात्री वीज नसल्यामुळे झोपेचं खोबरं झालं होतं. त्यात हा जीवघेणा उकाडा. त्यामुळे इतकी गाढ झोप लागली की, पाऊस पडायला लागला तरी जाग आली नाही. दार उघडताच रती आणि कंपनी घरात घुसलीच.
‘‘आजी, इतकं मस्त वाटतंय म्हणून सांगू. अगं मी थेंबांची आंघोळ केलीय,’’ आपल्या तोंडावरून पुन:पुन्हा हात फिरवत रती म्हणाली.
‘‘केस भिजले नाहीएत ना गं फार.’’ मला रतीच्या लांबसडक केसांची काळजी वाटली.
‘‘नाही गं, ऐक ना, आज ऊन नव्हतं म्हणून आम्ही मस्त डबाऐसपैस खेळत होतो. माझ्यावर राज्य होतं आणि..’’
‘‘ए थांब गं, तू काय सगळं सागून टाकतेस,’’ गौरांगी रतीला अडवत म्हणाली. पावसाचा आनंद व्यक्त करण्यात जणू चढाओढ लागली. ‘‘आजी, मगाशी एकदम एवढा वारा सुटला आणि या गंधारची डोक्यावरची टोपी उडून गेली. मोठं भोकांड पसरलं त्यानं.’’ अजूनही मुसमुसत डोळे पुसणाऱ्या आपल्या भावाला कडेवर घेत गौरांगी म्हणाली.
‘‘एवढा ढगांचा गडगडाट झाला, पण आजी, तुला जाग कशी आली नाही?’’ आर्यमनने नकळत माझ्या वर्मावर बोट ठेवलं. ‘‘म्हातारी हरभरे भरडत होती ना रे दादा,’’ अजूनही त्या आठवणीने घाबरलेल्या प्रीतीने विचारलं.
‘‘हिला काहीच कळत नाही. ढग एकमेकांवर आपटतात म्हणून आवाज येतो, हो की नाही?’’ आर्यमनने तिला धपाटा घालत ‘दादा’गिरी दाखवलीच.
‘‘आणि अक्षरश: लगेच पाऊस आलाच. आजी मी काल तुला वर्तमानपत्रातली ठळक बातमी वाचून दाखवली होती ना की केरळमध्ये पावसाचं आगमन झालं आहे आणि आता तो पुढे सरकतोय. अगदी तसंच झालं नाही. आम्ही इतके छान नाचत होतो, उडय़ा मारीत होतो, पण वरच्या खडूस जोशी आजी ओरडल्या, म्हणून धावत घरी आलो.’’ – रती. थोडंसं भिजल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरून निथळत होता.
इतक्यात कॉलेजकुमारी रमादीदी पूर्ण भिजून आली. तिला मनसोक्त भिजायला मिळालं म्हणून सगळ्या बच्चे कंपनीला तिचा हेवा वाटला. ती पटकन फ्रेश होऊन आली आणि मग तिने सगळ्यांना पावसाच्या गप्पांत गुंतवून ठेवलं.
‘‘सांगा बघू, पाऊस तुम्हाला आवडतो का?’’ रमादीदी. ‘‘खूप खूऽऽप आवडतो.’’ सगळ्यांनी ‘खू’ लांबवत एकच गलका केला.
‘‘का आवडतो सांगा बरं?’’
‘‘आपल्याला प्यायला पाणी मिळतं. शेतीला पाणी मिळतं. धनधान्य, भाजीपाला, फळं-फुलं भरपूर येतं.’’ यावर सगळ्यांचं एकमत झालं.
‘‘आणि भिजायला मिळतं.’’ असं दीदीच्या कानात सांगत लिंबूटिंबू प्रीतीने तिच्या मांडीवर जागा पटकावली.
‘‘आणि नळाला नाही का पाणी येत.’’ बालवाडीतल्या स्नेहाने मोठय़ांना कुणालाच कसं लक्षात येत नाही, अशा थाटात उत्तर फोडलं.
‘‘आता इकडे लक्ष द्या. मृग नक्षत्र लागलं की पाऊस पडतो. समुद्राच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होते. ती वर जाते. तिचे ढग बनतात. त्यांना गारवा लागला की वाफेचं पाणी होतं आणि पाऊस पडू लागतो. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू आहेत. मराठी महिन्यांप्रमाणे ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद हे चार महिने पावसाचे. ७ जूनला तो येणार असं म्हटलं तरी कधी लवकर कधी उशिरा तो येतोच. तुम्ही मुलं कसं कुणाचंही लक्ष नाही असं बघून भॉक करता, तसाच तोही येतो बरं का! या तापलेल्या मातीवर पावसाचे थेंब पडले की मातीचा सुवास पसरतो. हे उत्तर एकदम नॅचरल. तो पडताना वेगवेगळ्या रूपांत खाली येतो, हे माहिती आहे का तुम्हाला?’’ इति दीदी.
‘‘होऽऽ, कधी हळूहळू पडतो, कधी एकदम जोरात, इतका की आईची छत्री उलटी करून टाकतो, म्हणूनच आईने मला छत्री न आणता रेनकोटच घेतला आहे,’’ गौरांगीच्या मनातली खंत हळूच बाहेर पडते.
‘‘खिडकीत उभं राहून पाऊस बघण्यातही गंमत असते हं. रिमझिम रिमझिम  असा नाजूकपणे तो बरसतो ना तेव्हा झाडं, वेली, घरं, रस्ते कसे स्प्रे मारल्यासारखे स्वच्छ होतात. मळक्या पानांवर एकदम तकाकी येते. ती हिरवीगार दिसू लागतात. आपला सभोवताल प्रसन्न दिसू लागतो.’’
‘‘दीदी, मी काय करते, माहिती आहे? उडी मारून झाडाची फांदी ओढते. मस्त शॉवरखाली उभं राहिल्यासारखं वाटतं. त्या गारेगार थेंबाच्या स्पर्शाने गुदगुल्या होतात. कपडे भिजविल्याबद्दल घरात गेल्यावर आईचा धम्मक लाडूही मिळतो,’’ रतीने पटकन ‘अ‍ॅक्शन रिप्ले’ करून उडी मारीत आपली गंमत सांगून टाकली. प्रत्येकाने तिच्या कृतीचं त्याक्षणी घरातच अनुकरण केलं.
‘‘कधी कधी वेगळीच जादू होते बरं का! पाऊस पडत असताना सूर्यदेवही आकाशात हजर होतात. सगळी हिरवीगार सृष्टी सोनेरी उन्हात चमकायला लागते. क्षणभरात ते ढगांमागे जाऊन लपतात. असा ऊन-पावसाचा लपंडाव श्रावणात रंगतो. आकाशात सप्तरंगाची कमान झळकते. कुणी-कुणी पाहिली सांगा बघू.’’ काही हात पटकन वरती येतात. काही न कळल्यामुळे इतरांच्या हाताकडे बघत हळूच थोडेसे वर येतात. ‘‘ज्यांनी इंद्रधनुष्य पाहिलेलं नाही, त्यांनी बघायला विसरायचं नाही. बाकीच्यांनी तर बघायचंच. दरवर्षी सगळं नव्याने अनुभवायचं.’’ सगळ्यांच्या माना जोरात हलल्या.
‘‘दीदी, प्रीतीला होडी करून हवीय.’’ आर्यमन प्रीतीची कुरबुर दीदीकडे त्वरित पोहोचवतो.
‘‘हो तर! पण त्यासाठी जोरात पाऊस पडायला हवा. टपटप टपटप पावसाची संततधार लागायला हवी. अशा वेळी वाराही इकडून तिकडे धावत सुटतो. आपली दारं-खिडक्या आपटत राहतात. झाडाच्या फांद्या जोरजोरात हलत राहतात. अंगणात पाणी साचतं. मग साधी होडी, शिडाची होडी करून पाण्यात सोडता नं. शिवाय मोठी छत्री घेऊन त्या होडय़ांच्या मागोमाग तुम्ही पाण्यात थबक थबक करत जात राहता, खरं ना!’’ होडी मिळणार याची खात्री वाटून लिंबू-टिंबू खुदकन् हसले.
‘‘दीदी असा पाऊस पडला की आमच्या खिडकीच्या वरच्या पत्र्याच्या शेडवरून पाण्याच्या धारा वाहायला लागतात. हात बाहेर काढून त्यांना हातात घ्यायला मला खूप आवडतं. खाली साचलेल्या पाण्यात या धपदिशी आपटतात आणि मस्त कारंजी उडतात. शिवाय पाण्यावर इतकी वर्तुळे निर्माण होतात, अगदी कंपॉसने काढल्यासारखी गोल, मोठी होत जाणारी. हे कसं गं दीदी.’’ आर्यमनला उत्सुकता लपविता येत नाही.
‘‘कधी हा पाऊस भीती वाटण्याइतका रात्रंदिवस कोसळतो. ढगांच्या गडगडाटाबरोबर विजांचा लखलखाट होतो.’’
‘‘वीज चमकली की सोनेरी रिबीनीसारखी दिसते ना.’’ रतीने आपलं निरीक्षण मध्येच नोंदविलं.
‘‘हो, अगदी बरोबर. या भयाण पावसाने जनजीवन ठप्प होतं. २६ जुलैची आठवण करून देतो असा पाऊस.’’ नुसता शाब्दिक गडगडाट आणि लखलखाटानेही मांडीवर बसलेली प्रीती दीदीला घट्ट मिठी मारते.
‘‘गाडय़ा बंद पडल्या आणि आई ऑफिसला गेली नाही की, मला मज्जा वाटते. शाळेलाही बुट्टी मारता येते. नाहीतरी पावसात एवढं जड दप्तर, डबा, वॉटर बॅग संभाळत शाळेला जायचा मला कंटाळाच येतो. पण पावसामुळे आईला घरी यायला उशीर झाला की मात्र मला पावसाचा खूप राग येतो. बाहेर खेळता येत नाही आणि घरात बोअर होतं.’’ त्यातल्या त्यात मोठय़ा असलेल्या गौरांगीचं विचारचक्र वेगात फिरू लागतं.
‘‘ही प्रीती विजा चमकल्या की इतकी घाबरते की, आईच्या कडेवरून खालीच उतरत नाही. आई घरात नसली की कानात बोटं घालून उशीत तोंड खुपसून बसते. अगदी भित्री भागुबाई आहे.’’ आर्यमन प्रीतीला चिडविण्याची संधी सोडत नाही.
आता दीदी पावसाच्या रूपात गुंग झालेली असते. ‘‘कधी ढगांच्या मारामारीचा आवाज एवढा वाढतो की, मस्त पाऊस कोसळणार असं वाटतं. आपण खिडकीतून बाहेर डोकावतो, तर काय आश्चर्य, सगळे ढग इतस्तत: पांगलेले असतात. जाता जाता ‘गर्जेल तो पडेल काय’ या म्हणीचं प्रात्यक्षिक दाखवून जातात. गारांचा पाऊस पाहिलाय का तुम्ही? पावसाबरोबर गारा म्हणजे बर्फाचे तुकडे खाली येतात. आपल्याला चांगल्या टपल्या मारतात हं त्या गारा. या हातातून त्या हातात नाचवत गालात लपवायला मलासुद्धा फार आवडतात. कधी गारांचा पाऊस पाहिलात तर भरपूर गारा गोळा करा आणि मला पाठवायला विसरू नका हं.’’ गारा कशा गोळा करायच्या या विचारात बुडून सगळी बालसेना घराच्या दिशेने धावली.
‘‘दीदी, बरी आठवण झाली. बाईंनी आम्हाला पावसाच्या विविध रूपांवर निबंध लिहून आणायला सांगितला आहे. आता मी पटापट लिहून काढते’’ असं म्हणत रतीने वही उघडली.