चिन्मय कामत हे एक उच्चपदस्थ अधिकारी. शेकडो लोक त्यांच्या हाताखाली आनंदाने काम करतात असे गृहस्थ. हुशार, मनमिळावू आणि मुख्यत: शांत, संयमी वगरे वगरे. मि. कामतना मात्र आपल्या नावामागे लावलेल्या या शांत, संयमी विशेषणांचं हसूच यायचं. आणि त्यांना नेहमी वाटायचं की, आजी-आजोबांनी जर का हे ऐकलं असतं तर त्यांना नक्कीच आनंद झाला असता. दुर्दैवाने आज आजी-आजोबा हयात नाहीत.
पण काही म्हणा, मि. कामतनी खरंच खूप यश मिळवलं होतं. आत्ताच कुठे पंचविशी पार केली होती-नव्हती, पण अत्यंत शांत, संयमी, जबाबदार अधिकारी म्हणून व्यवस्थापनात आणि हाताखालील कर्मचाऱ्यांमध्ये नावलौकिक मात्र मिळवला होता आणि तो रास्तच आहे, याबाबत कुणाचंही दुमत नव्हतं आणि व्हायचं कारणही नव्हतं. पण हेच कामत जेव्हा चिनू होते नं, तेव्हा मात्र वेगळंच चित्र होतं. हा चिनू सतत कावणारा, चिडणारा, उरफाटय़ा डोक्याचा, क्षणोक्षणी मूडस् बदलणारा म्हणून घरात, शेजारी, नातेवाईकांमध्ये, मित्र-मत्रिणींमध्ये एकदम फेमस होता. कोणी फारसं त्याच्या वाटेला जात नसे. कारण कधी स्फोट होईल नेमच नव्हता. कोणावर तो कधी डाफरेल, ओरडेल, चिडेल, वैतागेल काही नेम नसायचाच. त्यामुळे कोणी त्याच्या जवळ येत नसे, मत्री करीत नसे. त्यामुळे चिनू समाजापासून थोडा बाजूलाच पडला होता. आणि बाजूला पडला होता म्हणून आणखी चिडचिडा, रागावणारा आणि रुसणारा झाला होता, असं हे दुष्टचक्र होतं.
चिनू सातवीत होता तेव्हाची गोष्ट! एकदा नाताळच्या सुटीत बाबांनी त्याला कोकणात आजी-आजोबांकडे पाठवलं होतं. कोकणातील   घरात आजी-आजोबा दोघंच राहायचे. छोटंसं टुमदार घर, बाजूला माड-पोफळींची बाग, त्याला लागून वाहणारं पाटाचं झुळझुळ पाणी आणि अप्रतिम निसर्गसौंदर्य. ते सगळं पाहून चिनू खूप खूश झाला. खूप खूप आवडलं हे सगळं त्याला. त्यात आजी-आजोबा आणि तो असे तिघेच. त्यामुळे मनाविरुद्ध फारसं काही घडण्याचा आणि त्यातून चिडचिड, धुसफुस, रागराग होण्याचा प्रश्नच नव्हता. तिथं गेल्यापासून आजी-आजोबांना मदत करणं, त्यांच्यासोबत इकडंतिकडं जाणं, त्यांच्याकडून लाड करून घेणं, िहडणं, फिरणं, खाणं-पिणं अगदी चन होती चिनूची. आजोबांच्या कामात लुडबुडताना फार मजा यायची त्याला. त्यांनी मागितलेला कोयता, फावडं, कुदळ वगरे आणून देणं, झाडांना पाणी घालण्यात मदत करणं, नोकरांसाठी चहा-नाश्ता घेऊन जायला मदत करणं हे सतत चालायचं. आजोबा म्हणायचे, ‘बरं का चिन्मय, या सगळय़ांना फार सांभाळून घ्यावं लागतं बघ. आता हा सख्या, म्हणजे आपला गडी रे, जरा काय झालं की रागावतो. तेवढा एकच दुर्गुण, पण त्यामुळे त्याचे कित्तीतरी सद्गुण वाया गेले. चिकाटी, कामसूपणा, हुशारी सारं वाया गेलं. तो एक दुर्गुण नसता ना तर हा सख्या कुठच्या कुठे गेला असता, कलेक्टर झाला असता कलेक्टर. पण मास्तरांच्या रागानं शाळा सोडून आला नि आता बसलाय माड िशपत. काय? ऐकतोस ना चिन्मय..’ आजोबा पुढे बोलतच होते. ‘अरे बाप रे! रागाचा एवढा वाईट परिणाम,’ चिन्मयच्या मनाने नोंद घेतली.
नंतर दोन दिवसांनी आजी चिन्मयसाठी घावन करीत होती. चुलीवर बिडाचा तवा तापत पडला होता. त्यावर तांदळाच्या पिठाचे जाळीदार घावन आजी चटाचट काढत होती आणि समोर केळीच्या फाळक्यावर चिन्मयसाठी वाढत होती. तो मऊ, लुसलुशीत जाळीदार घावन खाण्यात चिन्मय गर्क झाला होता. त्याच वेळी आजी म्हणाली, ‘तुमच्या मुंबईत नाही ना रे बिडाचा तवा? पण या तव्यावरचे घावन कसे छान होतात की नाही, आवडले ना? चिन्मय, काय गंमत आहे ना, हा तवा ना चिडखोर माणसांसारखा असतो बघ. आच लागली की चटकन लालेलाल होतो. आणि आमच्यासारखी माणसं त्याच्या या गरमपणाचा फायदा उठवतात बरोब्बर आपल्या जिभेचे चोचले पुरे करायसाठी. बरं का चिन्मय, जी माणसं चटकन रागावतात ना त्यांचाही काही लोक आपल्या फायद्यासाठी असाच उपयोग करून स्वत:चा स्वार्थ साधून घेतात बरं का. तेव्हा चटकन रागावून काही फायदा नसतो.’ असं म्हणत आजीने पुढचा घावन चिन्मयसमोरच्या फाळक्यावर घालत विषय बदलला, पण ते वाक्य मात्र चिन्मयच्या डोक्यात घोळतच राहिलं.
संध्याकाळी चिन्मय आजी-आजोबांसोबत देवळात जाताना त्याला सांगत होते, ‘चिन्मय, आमच्या कोकणातला निसर्ग खूप छान आहे बरं का, अगदी समतोल. रौद्रत्व तर त्याच्या गावीच नाही. इथली जंगलं पानगळीने निष्पर्ण होत नाहीत तर घोंघावणारी वादळं, उद्ध्वस्त करणारे पूर वगरेचीही या कोकणाला सवय नाही. म्हणूनच आम्ही म्हातारा-म्हातारी अशा निसर्गावर विसंबून इथं निर्धास्त राहू शकतो. बघितलंस ना चिन्मय, चटकन न रागावणाऱ्या, रौद्रत्व न धारण करणाऱ्यावर विसंबून सारे कसे निर्धास्त होतात ते.’ हे सांगतच त्यांनी विषय बदलला होता.
आजोबांनी त्याला एकदा न्यूटनची गोष्टही सांगितली होती. त्याचे सहा महिने संशोधन केलेले पेपर्स त्याचा लाडका कुत्रा डायमंड याच्या चुकीमुळे एका क्षणात जळून खाक झाले, पण तो क्षमाशील न्यूटन त्या डायमंडवर अज्जिबात रागावला नाही. म्हणजेच वैज्ञानिक म्हणून न्यूटन जेवढा मोठ्ठा होता तेवढाच या क्षमाशीलतेमुळे माणूस म्हणून तो मोठ्ठा ठरला. आणि ते आजही सर्वाच्या स्मरणात आहे. न्यूटन जसा संशोधक म्हणून मोठा होता तसा माणूस म्हणूनही मोठा होता, हे विशेष. माणुसकीचं मोठेपण मोठ्ठं असतं बाबा चिन्मय,’ असं शेवटी आजोबा म्हणाले होते. नाताळच्या सुटीहून परत येताना चिन्मय कोकणातून अशी बरीच शिदोरी बरोबर घेऊन आला आणि त्यातूनच आजचा शांत, संयमी इ.इ. चिन्मय कामत जन्मला होता. दरवर्षी नाताळ संपताना मि. चिन्मय यांना हे हमखास आठवतं आणि त्या आठवणीतूनच ते पुढील वर्षांत शांत, संयमी, क्षमाशील वगरेचा वसा पुढे नेत राहतात.