‘‘अरे, तुम्ही एवढय़ा लवकर घरी कसे आलात?’’ बागेत भरपूर वेळ खेळणाऱ्या मुलांना लवकर घरी आलेलं पाहून आजोबांनी विचारलं.
‘‘अहो आजोबा, आमच्या दोस्ताला चोरांनी पळवलं होतं. आमचा मित्र शिरीष हरवला होता ना.’’ मुकुंदानं सांगितलं.
‘‘हरवला? कसा?’’ इति आजोबा.
‘‘संध्याकाळी आम्ही बागेत खेळत असताना दोन माणसं तिथं आली. त्यांनी शिरीषला दोन मोठी चॉकलेटं दिली. आणि आणखी चॉकलेटं हवी असल्यास आमच्याबरोबर चल, असं ती माणसं म्हणाली. शिरीष लगेच त्यांच्या बरोबर गेला. आम्ही शिरीषला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. पण शिरीषला चॉकलेटची भुरळ पडली होती. शिरीष त्या माणसांसोबत जाताच आम्ही आरडाओरड केली. कॉलनीतल्या लोकांना जमवलं. झाला प्रकार त्यांना सांगताच एकादोघांनी मोटारसायकलवरून त्या लोकांचा पाठलाग केला. स्टेशन रोडनं शिरीषला नेताना त्यांनी त्या माणसांना अडवलं. त्या दोघा माणसांना पोलिसांच्या ताब्यात देऊन शिरीषला घेऊन ते घरी आले. शिरीष फार घाबरलाय हो. आम्हीही घाबरलोय.’’
‘‘घाबरून जाऊ नका. धीरानं घ्या. घाबरल्यानं कार्यभाग फसतो. तेव्हा नीट विचारानं वागा. पाहिलंत ना बाळांनो, शिरीषला चॉकलेटच्या लोभानं फसवलं. लोभ, मोह हा कधीही वाईटच रे. क्षुल्लक भक्ष्याच्या लोभानं स्वत:च स्वत:ला कैद करून घेणारे पशू, पक्षी आणि चॉकलेटच्या लोभानं स्वत:वर संकट ओढवून घेणारा शिरीष दोघेही सारखेच. अशावेळी विचारानं वागायला हवं. या लोभामुळं ओढवलेल्या संकटाची गोष्ट तुम्हाला सांगतो.’’
एकदा एका जंगलात एक तहानलेलं माकड पाण्यासाठी वणवण भटकत होतं. तहानेनं त्याच्या डोळ्यांपुढं अंधारी येत होती. तरीही धीर गोळा करून ते पाण्यासाठी फिरत होतं. फिरता फिरता त्याला एका खड्डय़ात भरपूर पाणी दिसलं. पाणी पाहताच माकडाला राहावलं नाही. त्यानं धाडकन पाण्यात उडी मारली आणि तो अधाश्यासारखा पाणी पिऊ लागला. पोटभर पाणी प्याल्यावर आपल्या वाढलेल्या वजनामुळे आणि फुगलेल्या पोटामुळे त्याला खड्डय़ाबाहेर येणं जमेना. खूप प्रयत्न करून थकल्यावर तो घाबरला. आता काय करावं याचा विचार करीत राहिला.
तेवढय़ात चरत-चरत एक बोकड तिथं आलं. खड्डय़ातील पाण्यात मनमुराद डुंबणाऱ्या माकडाला पाहून म्हातारा बोकड हळूच पुढं आला. खड्डय़ाच्या तोंडाशी येत तो म्हणाला, ‘‘माकडदादा, पाणी कसं आहे हो?’’
माकडानं म्हाताऱ्या बोकडाकडं चोरून पाहिलं. बोकडाच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव पाहून माकड खूश झालं. उत्साहानं म्हणालं, ‘‘बोकडदादा, हे पाणी अमृतासारखं गोड आहे. चांदण्यासारखं गार आहे. संजीवनीसारखं जीवन देणारं आहे. आणि हो, अद्भुतही आहे. या खड्डय़ातील पाण्यात नुसती डुबकी मारली तरी प्राण्याला नवतारुण्य प्राप्त होतं.  मला याची प्रचिती आलीय. मी आता पूर्ण तारुण्य उपभोगतोय.’’ एवढं बोलून माकड पुन्हा जोरजोरानं पाण्यात पोहू लागलं. माकडाचं बोलणं ऐकून बोकड आनंदला. लोभावला. अधीर होऊन त्यानं विचारलं, ‘‘पण, हे खरं ना माकडोबा?’’
‘‘म्हणजे काय? तू प्रत्यक्ष येऊन खात्री कर. अरे, मी तर तुझ्यापेक्षाही म्हातारा होतो. मला धावता येत नव्हतं. उडी मारता येत नव्हती. झाडावर चढणं, उतरणं जमत नव्हतं. म्हातारपणामुळं मी जीवनाला कंटाळलो होतो. पण या दैवी पाण्यात अंघोळ केली आणि जादू झाली. मी एकदम तरुण झालो. गगनाला कवेत घेण्याचं सामथ्र्य माझ्यात आलं. आता मी रोज इथं अंघोळीसाठी येतो आणि नवी ऊर्जा, नवा जोम घेऊन घरी परततो.’’
माकडानं गोड बोलून बोकडाला मोहात पाडलं आणि बोकड तारुण्याची स्वप्नं पाहाण्यात हरवून गेला. आपणही माकडासारखं उत्साही, तरुण व्हावं असं वाटून तो खड्डय़ाच्या तोंडाशी येऊन म्हणाला, ‘‘माकडोबा, मलाही तुझ्यासारखं व्हावंसं वाटतं रे. मी येतो.’’ असं म्हणून बोकडानं पाण्यात उडी मारली, पण पोहता येत नसल्यानं तो गटांगळ्या खाऊ लागला. ती संधी साधून माकड चटकन बोकडाच्या डोक्यावर चढून खड्डय़ाबाहेर आलं आणि बोकडाला हसून म्हणालं, ‘‘मूर्ख, लोभी बोकडा, आता राहा तिथंच.’’ माकडाच्या या शब्दांनी बोकडाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातलं. आपण फसलो हे कळताच बोकड शोक करू लागला. पण त्याचं रडणं, ओरडणं ऐकायला तिथं कुणीही नव्हतं. माकड खड्डय़ाच्या तोंडाशी येऊन बुडणारं बोकड काहीक्षण पाहात राहिलं आणि पुटपुटलं ‘‘मोह वाईट रे बोकडा. या मोहामुळे संकटं येतात. अशावेळी सारासार विचार करून वागावं. त्यातच स्वत:चं कल्याण आहे. तू माझ्या शब्दांवर विश्वास ठेवलास आणि लोभामुळे फसलास. ़’’
‘‘तेव्हा कळलं का बाळांनो, कुणी काही देतो म्हणून घ्यायचं नसतं. तो का देतो? त्यानं काय होईल? हा विचारही प्रत्येकानं करायला हवा. नाहीपेक्षा बोकडासारखी फसगत होईल. कळलं?’’