मल्हारदादा सकाळीच क्लासला गेल्यामुळे जय जरा आरामातच अंथरुणात लोळत राहिला. बराच वेळ लोळून कंटाळल्यावर स्वारी उठून किचनकडे गेली. तिथे मामीचे काम चालू होते. मामा ऑफिसला गेला असावा. दूध पिऊन तो बागेत चक्कर मारायला गेला. मामाच्या या बदलीच्या गावातला हा छानसा बंगला, समोरची बाग त्याला खूप आवडले होते. गेल्या वर्षांपासून मल्हारदादा म्हणजे मामाचा मुलगा सुट्टीत जयला इथे बोलावत होता. म्हणून सुट्टी लागल्याबरोबर तो इथे आला होता. पहिले दोन दिवस मामाने गाडीतून सगळ्यांना गावात मस्तपैकी फिरवून आणले होते. बागेत फेरफटका चालू असताना मामीने नाश्ता आणि अंघोळीसाठी बोलावले. ते आटोपल्यावर त्याने दादा येईपर्यंत टाइमपाससाठी टी.व्ही.वरचे डोरेमॉन लावले. मस्त पोझ घेऊन स्वारी ते बघतानाच एकदम खर्र्र.. आवाज आला. तो ऐकून मामी धावत बाहेर येत म्हणाली, ‘‘अरे.. इथे ना केबल कनेक्शनचा खूप प्रॉब्लेम असतो. आता तिकडून काहीतरी दुरुस्ती करतील तेव्हाच केबल चालू होईल बाबा.’’ जयचा एकदम विरसच झाला. सोफ्यावरून उठताना त्याचे कंप्युटरकडे लक्ष गेले. उत्साहाने त्याने मामीला विचारून तो चालू केला आणि गेमची साइट उघडून अ‍ॅंग्री बर्ड खेळायला लागला. खेळ अगदी रंगात आलेला असतानाच कंप्युटरही अचानक बंद पडला. ‘‘मामी.. बघ ना हा बंद पडला.’’ जय वैतागून म्हणाला. त्यावर ‘‘अरे हो राजा.. मगाशी मी तुला सांगायलाच विसरले, आज सोमवार ना.. आता दिवसभर इथे लाइट नसतात. एकदम संध्याकाळी येतील.’’ मामीने समजावले. रंगलेला खेळ असा थांबल्याने वैतागलेल्या जयला खुर्चीतून उठता उठता टेबलावरचा मामीचा मोबाइल दिसला. खुशीतच त्याने यावरचे गेम खेळायचे ठरवले. मोबाइलमध्ये अ‍ॅंग्री बर्ड गेम नव्हता, पण कॅंडी क्रश तरी होता.. जयने तर आईच्या मोबाइलवर कितीतरी लेव्हल्स पूर्ण केल्या होत्या. जयने एक लेव्हल पूर्ण केली तोच मोबाइलची बॅटरी संपल्याचे मेसेज त्यावर दिसायला लागले. तरीही जिद्दीने त्याने अजून एक लेव्हल पार केली आणि मोबाइल चार्जिगला लावायला गेला. पण..

‘‘मामी.. हे बघ ना.. लाइट गेलेत. तू मोबाइल चार्ज का केला नव्हतास.. आता मला एकटय़ाला जाम बोअर होतंय. हा मल्हारदादाही अजून येत नाहीय़े.’’ जयने हातपाय आपटत थोडी रडण्याची अ‍ॅक्टिंग केली. व्हरांडय़ात येरझारा मारताना  सायकलवरून येणाऱ्या मल्हारदादाला पाहून त्याला हायसे वाटले. गप्पागोष्टी करत जेवण झाल्यावर मघापासून सतावणारा प्रश्न जयने विचारला..

‘‘दादा, मला सांग तुझा इथे टी. पी. ..म्हणजे टाईमपास कसा होतो?’’

‘‘अरे, त्यात काय सगळ्यांसारखाच म्हणजे शाळा, ग्राऊंडवर खेळ, स्कॉलरशिपचा क्लास बस्स.. आणखी कसा असणार?’’ – मल्हार.

‘‘पण इथे आसपास आमच्या सोसायटीसारखे तुझे कुणी मित्र रहात नाहीत ना?’’ जयची शंका.

‘‘इथे माझे मित्र?  अरे चिक्कार आहेत आणि गंमत सांगू.. ते मला हसवतात.. छान गोष्टी सांगतात, नवी नवी माहिती सांगतात. शिवाय ते माझ्याशी कधीच भांडत नाहीत. आता आज बघ लाइट गेल्यावर कंप्युटर आणि टी.व्ही.ने तुझ्याशी कट्टी घेतली ना.. तसे न करता ते केव्हाही मला मस्त कंपनी देतात. मस्त टी.पी.होतो की माझा त्यांच्याबरोबर..’’ मल्हार हसत म्हणाला.

मल्हारच्या बोलण्यावर मामीला हसताना पाहून जय इथे-तिथे बघत गोंधळून म्हणाला, ‘‘ए, मी तुझ्याहून लहान आहे म्हणून टेपा लावतोस काय मला?.. खरं सांग.’’

‘‘अरे खरंच.. चल दाखवतो तुला माझे मित्र,’’ म्हणत मल्हार जयला पुस्तकांच्या कपाटाशी घेऊन गेला. तिथे कॉमिक्स होती, सायन्सची, हिस्ट्रीवरची अशी वेगवेगळ्या विषयांची छान रंगीत चित्रांची खूप पुस्तके होती. ‘‘ही सगळी पुस्तकंच माझे इथले मित्र बनलेत.. तुला गंमत सांगू का, मी पहिल्यांदा इथे आलो ना तेव्हा बाजूला कुणी मित्र नाहीत म्हणून मीही जाम कंटाळलो होतो. शिवाय इथे लाइटचाही प्रॉब्लेम आहे ना.. मग आई किंवा बाबा मला शेजारी बसवून पुस्तकातल्या मस्त मस्त गोष्टी वाचून दाखवायचे. काही दिवसांनी आई म्हणाली आता यापुढे नवीन आणलेल्या पुस्तकातल्या गोष्टी तू वाचून आम्हाला स्वत:च्या पद्धतीने सांगायच्या. ते दोघे मी सांगितलेल्या गोष्टी ऐकणार म्हटल्यावर जामच ग्रेट वाटायचे सुरुवातीला. वाचनाची आवड वाढत गेली. आता मात्र आम्ही तिघेही जेवण झाल्यावर रात्री झोपायच्या आधी थोडा वेळ तरी आपली आपली पुस्तकं वाचतो. आई-बाबा मला नेहमी काही ना काही कारणाने पुस्तके गिफ्ट देतात. आणि एक गंमत सांगू? इथल्या शाळेतले दोस्तही या पुस्तकांसाठी मॅड झालेत. पुस्तकांसाठी म्हणून आता मी लायब्ररीच चालू केलीय. दर शनिवारी मित्र इथे येऊन इथले हवे ते पुस्तक आपल्या नावावर लिहून घेऊन जातात. आठवडय़ाने परत आणून देतात. अट फक्त एकच- पुस्तक जपून वाचायचे. ..हे घे वाचून बघ. तुला गाडय़ा आवडतात ना, त्याच्या गोष्टी सांगणारे एकदम सही पुस्तक आहे. आज आपण दोघे दुपारी पुस्तक वाचून टी.पी. करू आणि बाहेर उन्हे कमी झाली की भटकायला जाऊ. पण तुला आवडतं का पुस्तक वाचायला?’’ मल्हारने विचारलं.

‘‘हो पण तुझ्याइतकी पुस्तकं नाही वाचत मी.’’ -जय

‘‘अरे, पूर्वी मल्हारलासुद्धा वाचायची खूप सवय नव्हती, पण इथे एकटेपणा आणि लाइटच्या प्रॉब्लेमवर आम्ही हा उपाय शोधला. आज आपण सगळेच जण टी.व्ही. बघतो, कंप्युटर वापरतो. त्याचा आपल्याला माहितीसाठी खूप उपयोगही होतो. आता बघ ना इथे बसून आम्ही ऑनलाइन पुस्तके मागवलीच ना! पण पुस्तक वाचायची मजा वेगळीच असते हं.. ती आपल्याला कुठेही कधीही सोबत करतात. अत्ता मल्हार म्हणाला ना तस्सेच आपले बाबासाहेब आंबेडकरपण पुस्तकांनाच आपला खरा मित्र मानायचे. एकवेळ त्यांना उपाशीपोटी झोप लागत असे, पण पुस्तक वाचले नाही तर त्यांना झोप येत नसे. त्यांच्या विद्वत्तेचे मूळ त्यांच्या चौफेर वाचनातच तर होते. म्हणूनच त्यांनी सगळ्या समाजाला काय मंत्र दिला होता माहितेय का..?’’

‘‘हो.. वाचाल तर वाचाल.’’ मल्हारने उत्स्फूर्तपणे उत्तर दिले.

अलकनंदा पाध्ये
alaknanda263@yahoo.com