‘‘आजी, हे हरभरे केवढे फुगले पाहिलेस का?’’ रतीच्या डोळय़ात आश्चर्य मावत नव्हतं, ‘‘आणि हा वास कसला येतोय गं?’’
‘‘अगं कैऱ्या उकडत ठेवल्या आहेत त्याचा हा आंबट-तुरट वास सुटलाय. बरं तुम्ही सगळीजण मदत करणार आहात ना आम्हाला.’’
‘‘होऽऽ,’’ सगळय़ा वानरसेनेने एकमुखाने गर्जना केली.
‘‘चला तर मग, एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. रती आणि गौरांगी, ते हरभरे चाळणीत उपसून ठेवा. हळू हं, खाली सांडता कामा नयेत. विराज तू त्या हरभऱ्याच्या डाळीत पाणी घाल बघू. तोपर्यंत मी नारळ खरवडून ठेवते.’’
‘‘आजी मी या कैऱ्यांची सालं काढून किसू का गं?’’ निहारिकाने ताईपणाने जबाबदारी घेतली.
‘‘विराज, तू आणि गंधार कोथिंबीर निवडून ठेवा. ये मी दाखवते कशी निवडायची ते.’’ दोघांनी पटापट काम उरकून कचरा झाडाच्या कुंडीत घालून टाकला.
‘‘आजी आरासही करायची ना!’’ रतीला आरास करण्याचे कुतूहल वाटत होते.
‘‘अभिजित तू टेबलावर ठेवायला चौरंग आणि नक्षीदार पाट माळय़ावरून काढून दे. आणि अदिती तू ते सर्व स्वच्छ पुसून विणलेले रुमाल त्यावर घाल बरं का! बाकी सगळय़ा मुलांनी हे दोघं सांगतील त्या शोभेच्या वस्तू शोकेसमधून काढून द्या. सावकाश, गडबड नको हं.’’
गणपतीची फ्रेम, मान हलवणारी नाचरी बाहुली, मातीचे पक्षी, फळं काढण्याचं काम शांततेत पार पडलं. हे इकडे ठेवू या, नको, ते तिकडे ठेवू या, असं प्रत्येकजण स्वत:चं डोकं चालवत होता. जागेची अदलाबदल होत वस्तू स्थिरावल्या.
‘‘छान दिसतंय, आता मीनूमावशी कलिंगडाचं कमळ करते आहे, ते बघा बरं. पुढच्या वर्षी रती आणि गौरांगी तुम्हाला करायचं आहे ते. सुरीकडे लक्ष असू द्या. आई काय गंमत करते आहे, ओळखा बरं.’’
‘‘आजी, आईने दोन सुबक आकाराच्या कैऱ्या निवडून त्याला लाल घोटीव कागदाची चोच लावली आणि पेनाने डोळा काढला. काय मस्त पोपट झालाय बघ.’’ पोपटासारखं बोलणारी तोंडं आश्चर्यचकित होऊन गप्प बसली.
‘‘निहारिका एका नवीन बशीत लाडवाचा डोंगर आणि दुसऱ्या बशीत करंज्यांचं स्वस्तिक काढून उतरंडीच्या कोपऱ्यावर ठेव.’’
‘‘आजी मी मण्यांची महीरप ठेवते हं बशीभोवती.’’ रतीला आवडीचं काम मिळालं.
‘‘गौरांगी तू विराजने तोडून आणलेली मधुमालती, अनंत आणि गुलाबाची पानं, फुलं फुलदाणीत छान रचून ठेव.’’
‘‘आजी, मी आणि गौरांगीनं मे महिन्याच्या सुट्टीत केलेली कागदाची फुलंही ठेवूया नं दुसऱ्या फुलदाणीत.’’
‘‘होऽऽ तर..’’ इति आजी.
फुलदाणी जागेवर ठेवताना गौरांगीला एकदम काहीतरी आठवलं. चित्रकलेत बक्षीस मिळालेलं रौप्यपदक ती नाचवत आली. ‘‘आजी मी हे इथे ठेवणार.’’ गौरांगीचा निर्णय ऐकून रती आणि विराजही धावले. व्यायामशाळेत मिळालेलं प्रशस्तिपत्रक रतीने मध्यभागी उभे ठेवले आणि विजयी मुद्रेने सर्वाकडे पाहिले.
‘‘मला उंच उडीत मिळालेला कप इथे राहू दे ना दादा,’’ विराजने हळूच दादाला खूश केलं.
दादाने गुपचूपपणे आईच्या अंजिरी रंगाच्या शालूचा पडदा लावून त्यावर लुकलुकणारी दिव्यांची माळ सोडली. दोन्ही बाजूंना टवटवीत कुंडय़ा ठेवल्या, पडद्याला टेकून आरसा ठेवला. आरशात बघण्यासाठी उंच उडय़ा रंगात आल्या. त्यासमोर चांदीच्या पाळण्यात आईने गौर आणून ठेवली.
‘‘देवीला मोगऱ्याचा गजरा घाल आणि ताम्हणात हरभऱ्याची ओटी काढून ठेव. रती, मीनूमावशीला सांग समई लावून झाली की रांगोळीची बेलबुट्टी काढ’’ आजीच्या सारख्या सूचना चालल्या होत्या.
स्वयंपाक घराकडेही तिचं लक्ष होतं. तिच्या देखरेखीखाली बायकांनी खोबरं, कोथिंबीर घातलेली पिवळीधमक आंब्याची डाळ आणि केशरवेलची घातलेलं पन्हं तयार केलं होतं.
‘‘दादा बर्फाची लादी फोडून टाकलीस का रे पन्ह्य़ात. ते गार व्हायला हवं ना.’’ बर्फ म्हणताच सगळय़ा वानरसेनेने हात पुढे केले. एक तुकडा गालांत, एक हातात नाचवत सगळे रंगात आले. रतीने बर्फाचा छोटा तुकडा विराजच्या बुशकोटाच्या आत मानेवरून हळूच सोडला.
‘‘आजी, रती बघ नं कशी करतेय’’ म्हणत विराज नाचायला लागला.
‘‘रती, असं नाही करायचं, देऊ का दणका?’’ आजी डोळे मिचकावत रतीला ओरडली.
‘‘बरं झालं, छान झालं’’ म्हणत विराज हसू लागला.
‘‘आमच्या पोटात कावळे ओरडायला लागले आहेत.’’ निहारिकाने जाहीर केलं.
‘‘देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणालाही डाळ, पन्हं मिळणार नाही. तेव्हा पटापट नवीन कपडे घालून तयार व्हा बघू.’’ आजीने फर्मान काढलं.
रती, गौरांगी, निहारिका झटपट खणाची परकर पोलकी, गळय़ात मोत्याचे सर, मोत्याच्या बांगडय़ा, छुमछुम घालून तयार झाल्या.
‘‘आता आम्हाला डाळ, पन्हं हवंय’’ विराजला राहावेना.
आजीने सगळय़ांना आग्रह करून पोटभर डाळ, पन्हं दिलं.
‘‘मला अजून मला अजून..’’ असं ओरडत रती डोळे चोळत उठली.
‘‘आजी सगळय़ा बायका येऊन गेल्या का गं, हळदीकुंकवाला.’’
‘‘कोणत्या बायका आणि आज कशाला येतील. उद्या गुढीपाडवा. तेव्हा चैत्र महिना चालू होणार आणि मग हळदीकुंकू. तुला नक्की स्वप्न पडलेलं दिसतंय.’’
‘‘अगं हो आजी, तू नेहमी सांगतेस ना तशीच चैत्रगौरीची आरास केली होती आणि मी चांदीच्या वाटीतून थंडगार पन्हं पीत होते. अजून हवं होतं मला.’’
‘‘मनी वसे ते स्वप्नी दिसे. अभ्यास करता करता चक्क सरळ कोन करत डुलकी काढलीस. आता परीक्षा झाली की आपले नेहमीचे पाहुणे येणारच आहेत. तेव्हा करू या आपण हळदीकुंकू. तोपर्यंत मात्र अभ्यास एके अभ्यास.’’
‘आणि अभ्यास दुणे अभ्यास,’ म्हणत रतीने पुस्तक उघडलं.