शुभांगी चेतन

shubhachetan@gmail.com

Google New App Photomath let you take a picture of a math equation and help you solve it step by step
गूगलकडे आहे ‘असा’ एक ॲप; विद्यार्थ्यांची गणितं सोडवली जातील मिनिटांत, जाणून घ्या
sugarcane juice selling Business
Viral Video: लय भारी जुगाड! दुकानदाराने ऊसाचा रस थंड राहण्यासाठी बिना बर्फाचा केला भन्नाट जुगाड; दुकानावर झाली गर्दीच गर्दी
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली

आपल्या प्रत्येकाला मातीची ओढ असते. तिच्यासोबतच्या आठवणी नक्कीच निराळ्या असतील; पण पहिला पाऊस आणि मातीचा तो ओला गंध न आवडणारी व्यक्ती विरळच. तिच्या त्या स्पर्शाची, गंधाची आठवण मोठय़ांनाही बालपणात नेते. जशी माती, तसंच आभाळ. डोक्यावर पसरलेलं अथांग आभाळ. जवळ वाटणारं, पण खूप दूर असणारं. दिवसागणिक बदलणारा त्याचा तो निळा रंग आणि स्वच्छंद उडणारे पक्षी.. हे सारं काही आपल्या आसपास, आपलं असं!

मातीचा गंध मोहवतो, तसंच ते आभाळही उडण्यासाठी खुणावत असतं आणि आपण उडतोही- तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विमानात बसून.. आणि तेव्हा तर वाटतंच की पंख असावेत, एकदा तरी झेप घेण्यासाठी!

हेच आभाळ पक्ष्यांचं मोठं अवकाश असतं. विविध आकार, रंगांचे अनेक पक्षी या आभाळात काहीतरी शोधत असतात, असंच वाटतं खालून पाहताना. हवेत तरंगणं हे त्यांना निसर्गाने दिलेलं आहे. पण मग आपल्याला का नाही? असा एक प्रश्न लहान वयात मला नेहमी सतावत असे. आपण कसं उडायचं, हे शोधताना माझी मैत्री झाली पतंगासोबत.. पतंग.. उडणारा, पण त्याची दोर आपल्या हातात म्हणजे अप्रत्यक्षपणे तो उडण्याचा आनंद आपल्यालाच मिळतो. तोही रंगीबेरंगी. पण पतंग उडवणं फारसं कधी जमलं नाही. त्यासाठी लागणाऱ्या मांज्याने दरवर्षी अनेक पक्षी गंभीर जखमी होतात, काही जीवाला मुकतात, हे कळल्यावर तर उडवण्यासाठी पतंग कधी घेतलाच नाही.. वाटायचं, त्यांचं घरटं त्यांची वाट पाहत असेल ना!

आणि मग ठरलं.. पतंग तयार करायचा. कसा?.. अगदी सोप्पा आणि सहज. त्यासाठी नेहमीच्या कागदापेक्षा जाड कागद आणायचा. आपल्याला हव्या असलेल्या आकारात तो कापायचा.. अगदी हुबेहूब पतंगासारखाच कापला तरी चालेल. मोठ्ठा कापायचा जरा. नाही जमलं तरच घरातल्या मोठय़ांची मदत घ्यायची. त्याचे पेन्सिलने, पेनने चार भाग करायचे. चारपेक्षा अधिकही चालतील. आता तो प्रत्येक भाग वेगळा कसा दिसेल हे पाहायचं. त्यासाठी विविध माध्यमं तुम्हाला वापरता येतील. म्हणजे, जसे या पतंगात दोन भाग तैलरंगाचे खडू (ऑइल पेस्टल्स) वापरले आहेत. त्यातही एका ठिकाणी उभे भाग आणि दुसऱ्या ठिकाणी तिरक्या पद्धतीने ते रंगवले आहेत. तिसऱ्या भागात रंगीत कागदाचे तुकडे वापरून कोलाज केलंय आणि चौथ्या भागात भेंडी वेगवेगळ्या रंगांत बुडवून तिचे ठसे घेतले आहेत. तुम्ही हे ठसे अनेक भाज्यांचे घेऊ शकता. ते काय, कसं घ्यायचं, हे तुम्हीच ठरवा. याहून आणखी वेगळं काही करू शकता का, याचा विचार करा. स्वत: हाताने तयार केलेल्या पतंगाचा आनंद तुम्हीच मला सांगा. हा पतंग उडवता येणार नाही.. पण उडणाऱ्या पक्ष्याचा आनंद हा हिरावून घेणार नाही, हे नक्की.