News Flash

चित्रांगण : चित्रांसंगे मनमुक्त होऊ या

आपल्या प्रत्येकातच एक चित्रकार दडलेला असतो, पण कालांतराने तो हरवतो. याला कारणंही अनेक आहेत

(संग्रहित छायाचित्र)

शुभांगी चेतन

shubhachetan@gmail.com

आपल्या प्रत्येकातच एक चित्रकार दडलेला असतो, पण कालांतराने तो हरवतो. याला कारणंही अनेक आहेत. ‘अरे, हे वर्तुळ नीट काढ.’, ‘बाहेर रंग जायला नको.’, ‘हा माणूस काढलायसा की अजून काही ते कळत नाहीए.’, ‘रेषेचं वळण बघ.’, ‘चित्र नीट आलं की अक्षर सुधारेल.’.. या आणि अशा अनेक सूचनांनी कलेचं बालरोप रुजायच्या आधीच कोमेजून जातं. आणि ‘मला चित्र नाही येत आणि कळतही नाही,’ हे म्हणण्यात वयोपरत्वे आपल्यातील अनेकांना भूषण वाटतं.

पण इथे प्रश्न मुलांचा आहे. शाळेतल्या जीवघेण्या- थकवणाऱ्या स्पर्धेनंतर त्यांना ‘मूल’ म्हणून स्वत:चे हक्काचे क्षण हवे असतात. त्यांना त्यांच्या पद्धतीनं व्यक्त व्हायचं असतं. ते त्यांचं स्वातंत्र्य त्यांना प्रत्येक विषयात मिळायला हवं, पण तसं होताना दिसत नाही. किमान ‘चित्र’ या विषयात त्यांना त्यांचं स्वातंत्र्य अनुभवू देऊ या आणि त्यांचं ते विश्व आपणही अनुभवण्याचा प्रयत्न करू या.

‘चित्रांगण’ या सदरातून चित्रकला, हस्तकला यांच्या विविध गमतीजमती आपण करणार आहोत. रंग, रेषा, कागद आणि इतर अनेक माध्यमांतून मुलांना स्वत:ला उलगडण्याची संधी आपण पालक म्हणून त्यांना देऊ या. मुलांना सारं स्वत: करून पाहायचं असतं. हाताने केलेली कृती त्यांना अधिक उत्तमरित्या समजते, लक्षात राहते.. हे मानसशास्त्र सांगतं. हाताला झालेले रंगांचे, कागदांचे स्पर्श लहानग्यांशी एक नातं तयार करतात. ते त्यांचं नातं, त्यांचे विचार त्यांच्या कृतीतून दिसतात. म्हणून ‘चित्रांगण’ मध्ये अशाच कृतींना प्राधान्य असेल. या कलाकृती करताना त्यांना हवे असेल तेव्हा, त्यांना हवे तेवढे आणि तेही त्यांनी मागितल्यावरच पालकांनी सहकार्य करायचं आहे. न मागता कोणतीही सूचना देऊ नका, एवढं मात्र करा. प्रत्येक मूल वेगळं असतं. त्याच्या दिसण्यापासून- असण्यापर्यंत त्यांच्या डोक्यात असंख्य रचना असतात. एकाची रचना दुसऱ्यासारखी नसते, एकाचं झाड दुसऱ्यासारखं नसतं, ते तसं नसावंही. म्हणून त्यांना मुक्त होऊ द्या. चित्रकलेचं शास्त्र नसतं. समीकरण, सूत्रातून चित्रकला उलगडता येत नाही. चित्र शिकवता येत नाही. ते ज्याचं त्याचं प्रत्येकाचं स्वत:चं असतं. वेगळं असतं ते मांडण्यासाठी, साकारण्यासाठी त्यांचं अवकाश त्यांना देणं, एवढंच पालक म्हणून आपण करू या. मुलं जबाबदार असतात. त्यांच्याकडे मूल म्हणून, व्यक्ती म्हणून पाहण्याची त्यांची गरज आहे.

या कलाकृती करताना तुम्ही पाहाल की, तुमच्याच मुलांच्या डोक्यात किती विविध रचना आहेत. रंग, रेषांच्या साहाय्याने त्या रचना कधी कागदावर, कधी वेगळ्या जागेवर आकार घेतील. रंगांची संवेदनशीलता मनापर्यंत पोहोचून, मनाचीही मशागत होणं हे व्यक्ती म्हणून आवश्यक आहे. चित्र काढून प्रत्येक जण चित्रकार होणार नसतो, पण एक उत्तम, दर्जेदार रसिक नक्कीच आकार घेईल. म्हणून मला वैयक्तिक असं वाटतं, हे सदर केवळ मुलांसाठी नाही तर पालकांमधल्या मुलांसाठीही आहे. यात आखीव-रेखीव काहीच नाही. सारं काही मुक्त, स्वतंत्र आहे. हे स्वातंत्र्य मुलांसोबत मूल होऊन अनुभवू या. काही क्षण का होईना, आपणही मूल होऊ या..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 4:02 am

Web Title: lets get rid of the pictures balmaifal article abn 97
Next Stories
1 झाकली मूठ
2 गजाली विज्ञानाच्या : वर झगझग आत भगभग
3 असाही ख्रिसमस
Just Now!
X