छोटय़ा दोस्तांनो,
काही दिवसांपूर्वी केवढा मुसळधार पाऊस पडला ना! त्यातच त्या दिवशी लाइट गेले. नेमके आई-बाबा गाडय़ांच्या  गोंधळामुळे घरी आलेले नव्हते. घरात तुम्ही एकटेच, त्यातून सगळीकडे मिट्ट काळोख. कशी घाबरगुंडी झाली ना तुमची. इन्व्हर्टर बंद, बॅटरी लागेना आणि मेणबत्ती सापडेना. रस्त्यावरचेसुद्धा दिवे गेलेले, सगळीकडे काळोख, काळोख आणि काळोख! काही सुचतंच नव्हते तुम्हाला. खिडकीला चिकटून भेदरलेल्या सशासारखे उभे होतात, लाइट येण्याची वाट बघत. पण लाइट नव्हतेच तेव्हा..
आपले पूर्वज, आदिमानव सुरक्षेसाठी गुहेत राहायचे. दिवसा आकाशात प्रखर दिवा लागलेला असायचा, ओळखलात ना! ‘सूर्य.’ त्याच्या उजेडात सगळे व्यवहार पार पडायचे. पण सूर्यदेवांना फक्त दिवसभराचीच ‘डय़ुटी’ होती. तेव्हा संध्याकाळ झाली की सगळीकडे अंधार, अगदी चिडीचूप. या अंधारावर मात करण्याचे आदिमानवाचे प्रयत्न चालू होते. ‘गरज ही शोधांची जननी असते,’ हे लक्षात असू द्या. त्या प्रयत्नातून आदिमानवाने घर्षणातून अग्नी निर्माण केला. उष्णतेबरोबर प्रकाश गवसला. लाकूड पेटवून ‘दीप’ म्हणून त्याच्या उजेडात आदिमानवाचे गुहेतील वास्तव्य सुसहय़ झाले. परंतु अग्नी प्रज्वलित करणे व टिकवून ठेवणे हे फारच जिकिरीचे काम. हा प्रकाश टिकविण्याच्या साधनातूनच ‘दिव्या’चा जन्म झाला. गुहेच्या परिसरात दगडाशिवाय दुसरे काय मिळणार? एका ओबडधोबड दगडाला मध्यभागी असलेला खड्डा आणि वातीसाठी एका बाजूला खाच, हे दिव्याचे मूळ रूप. काही ठिकाणी शिंपल्याचाही दिवा म्हणून वापर केला जाऊ लागला. तेल व कापसाच्या वातीने दिवा तेवू लागला. काळाबरोबर दगडी दिव्यांची जागा मातीने घेतली. वातीसाठी चोच तयार झाली. गरीब-श्रीमंतांना सारखाच आनंद देत पणतीने आपल्या स्निग्ध प्रकाशाने जग उजळवून टाकले.
काळाबरोबर दिव्याच्या आकारात बदल झाले. तो तयार करण्यासाठी वापरलेले पदार्थही बदलले. खापर, तांबे, पितळ, कास, सोने, चांदी, मेण यांचा उपयोग करून दिवे तयार झाले. पशुपक्ष्यांच्या आकाराने आणि कलाकुसरीने या दिव्यांचे रूप पालटले. दीपमाळ, दीपवृक्ष, दीपदंड असे शोभिवंत नमुने तयार झाले. रामायणकाळात तर रत्नांचे दिवे होते असे म्हणतात. त्यावरून त्या काळाचे वैभव दिसून येते.
संध्याकाळी तुम्ही अंगणातला खेळ खेळून झाल्यावर, टी.व्हीसमोर बसणार इतक्यात आई किंवा आजी तुम्हाला पाय धुऊन देवाला नमस्कार करायला सांगतात. देवापाशी लावलेली समई हे ‘दिव्याचंच देवघरातलं मंगलरूप’, पटापट ‘शुभं करोति कल्याणम्.. दीपज्योती नमोस्तुते’ म्हणत तुम्ही दिव्याला नमस्कार करता. तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही केक कापायला अधीर झालेले असता तेव्हा आई आधी निरांजन ओवाळून औक्षण करते. ती मेणबत्त्या लावून विझवू देत नाही. हे तबकातले निरांजन म्हणजे दिव्याचेच स्निग्ध रूप. त्या प्रकाशाच्या हलत्या ज्योतींनी तुमचा चेहरा अगदी उजळून निघतो. तुम्हाला असे कौतुक करून घ्यायला आवडतेच की. स्वत: प्रकाशित होऊन दुसऱ्याला प्रकाशित करणारा हा दिवा आपल्या तेजाने एकटेपणाची, भीतीची, असहायतेची जाणीव दूर करून मन प्रसन्न करतो. स्थापित दिवा, शकुन दिवा, पिष्ट दिवा, नंदादीप, लामणदिवा, सांजदिवा अशी नानाविध रूपे धारण करणारा हा दीप म्हणजे शुभशकुनाचे प्रतीकच. हे दिवे अनंत रूपात जागोजागी तेवत असतात. कृतज्ञतेचा संस्कार जपत हा दीप सदैव पूजनीय, वंदनीय मानला जातो.
हय़ा दिव्याची ज्योत वाऱ्याने विझू नये म्हणून तिच्याभोवती काचेचे कुंपण येते. रॉकेल जाळत तो दिवा ‘कंदील’ या नावाने धूर सोडत घरभर फिरत राहतो. शेतकऱ्याच्या हातातील दिवटी किंवा रानावनात, गडकिल्ल्यावर फिरताना मशाल ही हय़ा दिव्याचीच रूपे बरे का! जणू त्या काळातील बॅटऱ्या. लग्नाच्या वराती किंवा मिरवणुका मात्र झगझगीत प्रकाशाच्या डोक्यावर धरलेल्या बत्तीने सजतात.
मानवाला विज्ञानाचे वरदान लाभते आणि विजेचा शोध लागतो. बटण दाबले की लगेच दिवा लागतो. कंदील, चिमणी, दिवटी, मशाल ही दिव्याची रूपे एक एक करीत काळाच्या पडद्याआड जातात. तुम्हाला तर एखाद्या संग्रहालयात किंवा छोटय़ा पडद्यावरील मालिकांतच हे सर्व बघावे लागणार.
विजेवर चालणाऱ्या असंख्य आकाराच्या, रंगाच्या दिव्यांनी सगळे जगच प्रकाशमान झालंय. पण बटण दाबताक्षणी तो दिवा लागेलच याची खात्री नाही. याउलट तेलाची पणती मात्र निरंतर तेवत राहून अंधाराचा नाश करते. आपल्या शांत, सौम्य, मंद प्रकाशाने परिसर उजळून टाकते. आणि म्हणूनच हय़ा दिव्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो. आषाढ अमावास्येला घरातले दिवे घासूनपुसून लख्ख करून त्यांची पूजा करतो. कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवतो. या गरम दिव्यात तूप घालून ते गुटूम करण्याची संधी चुकवू नका हं. आपल्या उपयोगी पडणाऱ्यांच्या सन्मानार्थ खास दिवस राखून तो साजरा करणे हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्टय़ आहे. शिवाय दीपावलीत घराबाहेर, अंगणात, आजूबाजूच्या परिसरात पणत्या लावून प्रकाशाचा उत्सव आपण साजरा करतो. दाहीदिशा उजळवून टाकणाऱ्या सूर्यदेवालाही आपण विसरत नाही. श्रावणातील रविवार हा खास त्यांच्या पूजनाचा.
दगडाच्या खोलगट वाटीपासून सुरू झालेल्या दिव्याच्या रूपात विजेचा शोध लागल्यानंतर आमूलाग्र बदल होत गेला. तरीही प्रकाश दाखविण्याच्या हेतूने बदल झाला नाही. अंधकाराचा नायनाट करून प्रकाशाने जग उजळवून टाकायचे आपले ध्येय पणती कधीच विसरत नाही.
‘कुठलेही मज रूप मिळो, देह जळो अन् जग उजळो’ हेच तिचे ब्रीदवाक्य आहे.
आणि म्हणूनच सातत्याने वेगवेगळे ‘डे’ज् साजरे करण्याच्या गडबडीत हा ‘दीपपूजना’चा डे विसरू नका हं, आत्ताच डोक्यात ‘सेव्ह’ करून ठेवा बघू!

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Badlapur, electricity power down, citizens, water supply
बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात
Maldhok birds
अग्रलेख: पूतनामावशीचे पर्यावरणप्रेम!
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस