28 February 2021

News Flash

हरवलेली चाल

सकाळी सकाळीच समीक्षाच्या हर्षोत्सवातून होणाऱ्या आवाजामुळे छोटय़ा ओमची झोप मोडली. तो तसाच डोळे चोळत चोळत हॉलमध्ये आला.

(संग्रहित छायाचित्र)

रूपाली ठोंबरे

सकाळी सकाळीच समीक्षाच्या हर्षोत्सवातून होणाऱ्या आवाजामुळे छोटय़ा ओमची झोप मोडली. तो तसाच डोळे चोळत चोळत हॉलमध्ये आला. आई, बाबा आणि समीक्षाताई सारेच आलेल्या ‘बालमफिल’पाशी गोळा झाले होते. ओमने हे सर्व दुरूनच पाहिले आणि त्याचीही उत्सुकता जागृत झाली.

‘‘ए आई, तुम्ही सर्वजण काय पाहत आहात? आणि समीक्षाताई, तू इतकी का ओरडते आहेस? माझी झोप मोडली ना?’’

‘‘अरे ओम, उठलास तू? ही बघ, माझी गोष्ट आली आहे आज ‘बालमफल’ मध्ये.’’

ओमच्या तक्रारीकडे अगदी सहज कानाडोळा करून समीक्षा त्याला आजची खुशखबर सांगत होती. आणि ते ऐकताच ओम कुठे एका जागेवर थांबणार? लगेच पळत जाऊन त्याने तिच्या हातातून पेपर काढून घेऊन जमिनीवर अंथरला. स्वत:ला त्या गोष्टीमध्ये झोकून अक्षरश: अर्धाअधिक पेपर त्याने आपल्या शरीराखाली व्यापून घेतला. एक भलामोठा शंख पळतो आहे आणि त्याला पाहून घाबरून पळणारी मुले-समीक्षाताई आणि ओमच जणू ती! असे चित्र पाहून त्याला गंमतच वाटली. आई-बाबा आपल्या चिमुकल्याकडे कौतुकाने पाहत होती. शेजारचा रोहित कधी घरात येऊन गेला हे कळलेदेखील नाही. शेवटी त्यानेच ते वातावरण भंग केले.

‘‘ओम, चल आपण खेळायला जाऊ.’’

जरा पुढे येऊन पेपरमध्ये तोंड खुपसून बसलेल्या ओमला पाहिले आणि म्हणाला, ‘‘.. आणि हे काय रे ओम, तू हे काय करतो आहेस? वर्तमानपत्र? तुला वाचता येतं?’’ आणि तो जोरजोरात हसायला लागला. तसा ओम बालिश राग दाखवत वळला आणि म्हणाला, ‘‘रोहित, वाचता येत नाही; पण चित्र कळतात मला. पेपरमधली अशी चित्रे पाहायला मला तर नेहमीच फार आवडते. तू नाही बघत? ये ये, तूपण ये. कित्ती सुंदर चित्र काढलंय हे. आणि बघ, आमची गोष्ट आली आहे पेपरमध्ये. हो की नाही गं ताई?’’

समीक्षाचे नाव घेताच तीही पुढे आली आणि तिने दोघांनाही अगदी हावभाव करून गोष्ट वाचून दाखवली. ओम आणि रोहित दोघे मन लावून गोष्ट ऐकत होते. गोष्ट संपली आणि पुढच्याच क्षणी ओमने त्याच्या बेडरूममध्ये धूम ठोकली. छोटय़ा स्टुलवरून खुर्चीवर, खुर्चीवरून कपाटावर सरसर तो वपर्यंत चढत गेला आणि अगदी वरच्या कप्प्यामध्ये त्याची काहीतरी शोधाशोध सुरू होती. कितीतरी वेळ असाच गेला. बाहेर कुणालाच उमगेना, नक्की हा करतो आहे ते. समीक्षा त्याला बोलवायला आत शिरली आणि पाहते तर काय. एक सुंदर सजावट केलेला गिफ्टचा बॉक्स एका हातात घेऊन त्याची वेगात चढलेला गड उतरण्याची कसरत सुरू होती. तिने त्याला हात देऊन अलगद खाली उतरवले. तो बॉक्स हातात घेऊन पळतच ओम बाहेर आला.

‘‘अरे ओम, हे रे काय आणलेस तू?’’ या रोहितच्या प्रश्नावर उत्तर म्हणून त्याने संपूर्ण बॉक्स क्षणात जमिनीवर रिता केला..’’

‘‘शंख? इतके सारे? हे कुठून आले तुझ्याकडे?’’

इतके सारे शंख पाहून रोहित चकित झाला होता. ओम त्याला दोन महिन्यांपूर्वी अलिबागहून येताना दादाने शंख कसे आणून दिले, समीक्षाताईच्या शंखांची भर त्यात कशी पडली हे सर्व सांगता सांगताच ते सर्व शंख एका रांगेत मांडण्यात मग्न होता. एव्हाना समीक्षादेखील तिथे येऊन पोहोचली होती. शंखांची ती रांग पाहून क्षणभरासाठी तिला वर्षभरापूर्वीची तीच आठवत होती. आज तिची जुनी आठवण एकदम ताजी झाली होती.. आधी बाबांनी वर्तमानपत्रांत दिलेल्या बाललेखामुळे आणि आता ओमच्या या कृतीमुळे.

‘‘ओम, अरे तू हे काय करतो आहेस?’’

‘‘शूऽऽऽ..’’

प्रश्न विचारणाऱ्या रोहितला एक बोट ओठावर ठेवून नजरेनेच गप्प राहण्याचा इशारा देत ओम पुढे म्हणाला, ‘‘काही बोलू नकोस आता आणि फक्त शांतपणे पाहत राहा या शंखांकडे. मग बघ ते कसे चालतील ते?’’

ते ऐकून समीक्षाला हसायलाच आले. आपले हसू आवरत ती सांगत होती की, आता हे शंख चालणार नाहीत. पण तिच्याकडे दुर्लक्ष करून ओम आणि रोहित नजर रोखून एकटक त्या शंखांकडे कितीतरी वेळ पाहत राहिले.. १०.. १५ मिनिटे सरली तरी त्या शंखांमध्ये काहीच हालचाल जाणवत नव्हती. हे पाहून रोहितची चुळबूळ सुरू झाली. ओमचाही धीर आता सुटत चालला होता. तो उदास नजरेने समीक्षाकडे पाहू लागला. तशी समीक्षा त्याच्याजवळ जाऊन बसली आणि दोघांना समजावू लागली.

‘‘अरे, त्यावेळी जे शंख मी आणले होते ते तासाभरापूर्वीच खाडीवरून आणलेले होते. शिवाय, मी लगेच त्यांना धुतले होते. त्यामुळे त्यांच्यात पाण्याचा अंश उरलेला होता. त्याच आधारावर आतला जीव जिवंत राहिला होता, त्यामुळे ते चालू शकत होते..’’

समीक्षाचे बोलणे ओमला लगेच पटले आणि म्हणून शेजारीच पाण्याने भरून ठेवलेल्या ग्लासमध्ये त्याने २-३ शंख बुडवून बाहेर काढले. पुन्हा रचले आणि त्याचा जुना- निरीक्षण करत राहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. समीक्षा तरी आणखी समजावण्याचा प्रयत्न करत राहिली, पण सर्व व्यर्थ. खूप वेळ गेला. पण शंख चालले नाहीत. सारखे ‘नाही चालणार’ असे म्हणणाऱ्या समीक्षाताईचा आता ओमला रागच आला आणि त्याच रागात तो बाबांकडे गेला आणि एक तक्रार सूर त्या घरात घुमू लागला, ‘‘बघा ना बाबा, ही ताई मला त्रास देतेय. सारखे माझे ‘शंख नाही चालणार, नाही चालणार’असे म्हणते आहे. त्यामुळे ते घाबरतात आणि चालत नाहीत. आता तर मी त्यांना पाणीपण दिले. मी म्हणतो चालणार, पण ती ऐकतच नाही. आणि हे शंखपण का कुणास ठाऊक चालेनासे झाले. आता मी काय करू?’’

बाबांनी ओमला जवळ घेतले. समीक्षा आणि रोहितसुद्धा जवळच उभे होते. त्या सर्वाकडे पाहत बाबा ओमला समजावू लागले, ‘‘हे बघ, समीक्षा सांगते ते खरे आहे. आता हे शंख चालणार नाहीत.’’

‘‘बाबा, पण का? ते माझ्यावर रागावले?’’- ओमने निरागसतेने विचारले.

‘‘नाही रे, असे काही नाही. त्यावेळी ताईने आणलेल्या शंखांमधले जीव जिवंत असल्याने ते चालत होते, पण आता हे शंख गेले कितीतरी दिवस त्या कपाटामध्ये बंद होते. त्यातले सर्व जीव आत पाणी आणि हवेच्या अभावामुळे मरून गेले असतील. त्यामुळे

ते आता चालू शकत नाहीत. आणि हो, तू त्यांना आता पाण्यात घातलेस, पण

गेलेला जीव हा असा नंतर कितीही

उपचार करून परत येत नाही रे बाळा.’’

‘‘बाबा, मग माझे शंख कधीच चालणार नाहीत?’’

कोमेजलेली ओमची कळी खुलवण्यासाठी बाबांनी लगेच दुसऱ्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची योजना आखली आणि मुलांचा एकच गल्ला सुरू झाला. तो थांबवत बाबा पुढे म्हणाले, ‘‘आपण नवे शंख आणूया आणि मग तुझेही शंख नक्कीच चालू लागतील. पण यातून एक लक्षात ठेवायला हवे की, एखादी गोष्ट एकदा घडून गेल्यावर ती वेळ पुन्हा कधीच परत मिळत नाही, त्यामुळे आपण काय करतो, काय बोलतो यावर आपला ताबा असायला हवा. विचारपूर्वक पुढची पावले टाकायला शिकले पाहिजे. गेलेली वेळ

ही कधीच परत मिळवता येत नाही. झाडापासून एकदा तोडलेले फूल परत झाडावर फुलणे अशक्य! पण नव्या प्रयत्नांनी नव्या फुलाची वाट पाहून फुलणाऱ्या नव्या फुलापासून नक्कीच समाधान मिळवू शकतो.. पण त्यासाठी गरज आहे धीर, नव्याने प्रयत्न करण्याची इच्छा आणि नव्या उत्साहाची!’’

rupali.d21@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 12:05 am

Web Title: lokrang baalmaifal article rupali thombare
Next Stories
1 हितशत्रू : त्याला/तिला काय समजतंय?
2 विज्ञानवेध : दिसतं ते सगळं खरं असतं?
3 परी आणि ससा 
Just Now!
X