मेघना जोशी

अनेक जणांना समोर आलेल्या कामाबाबत असा विचार करायची सवय असते आणि या विचाराने काय होतं? तर स्वत:चं स्वत:च खच्चीकरण होतं, तेही अगदी स्वत:च्या नकळत. ‘‘बापरे! एवढं?’’ असं म्हणणं म्हणजे जे काही समोर आहे त्यासाठी मी कमकुवत आहे असं म्हणणं आणि या कमकुवत विचाराने जर सुरुवात केली तर सांगा बरं आपण कसे आपल्या कामाच्या शेवटापर्यंत- म्हणजेच आपल्या साध्यापर्यंत पोहोचू? अशक्यच आहे ते. कारण कोणतंही काम सुरू करताना जर का मनात आत्मविश्वास असेल तर त्या कामातील सारे टप्पे पार पाडणं सोप्पं असतं. पण तेच जर का आत्मविश्वास डळमळीत झाला तर मात्र सुरुवातच होणार नाही; शेवटाचा विचार फार दूरचा ठरेल. आता याचं एक छोटंसं उदाहरण पाहू. समजा आईने आपल्याला मेथीची जुडी दिली आणि म्हटलं ही निवड पाहू. आपण लगेचच म्हणतो, ‘‘बापरे! एवढं?’’ म्हणजे एवढं काम! जुडीत किती कांडय़ा आहेत या? प्रत्येक कांडी निवडायची? कित्ती वेळखाऊ  काम आहे? कसं जमणार मला? शेवटी शेवटी खूप कंटाळा येईल, पुरं नाही होणार माझ्याच्याने. म्हणजे पहा, बापरे! एवढं? एका एका विचाराने अनेक नकारात्मक विचारांची माळच निर्माण केली आणि या गडबडीत काय होऊ  शकेल, मेथी निवडायचं काम सुरू करायचंच राहील. मग उपाय काय बरं यावर? मेथीच्या जुडीचे चार किंवा पाच छोटे छोटे भाग करा आणि एक एक भाग छोटा असल्याने तेवढा निवडून पूर्ण करा. पाहता पाहता मेथी निवडूनही होईल, फारसा विचार न करता. हेच वर्षभराच्या अभ्यासाबाबत, होमवर्कबाबत, कोणत्याही कलेबाबत, अगदी पाठामधल्या प्रश्नसंचाबाबतही! मग ठरवताय ना, हा हितशत्रू येऊच द्यायचा नाही मनात असं!

joshimeghana231@yahoo.in