22 April 2019

News Flash

मदतीच्या शोधात तीन पात्रे

‘काय पण  हा वेडगळ प्रश्न! अरेऽऽ झंप्याऽऽ! अनेक संकोची लोक मदत मागतच नाहीत.

(संग्रहित छायाचित्र)

भालचंद्र देशपांडे

गंप्या, झंप्या, टंप्या ही मनानं चांगली मुलं होती. पण अर्थाचा अनर्थ करून ते भलतंच काहीतरी करून बसायचे. त्या दिवशी स्काऊटचे सर सांगत होते. ‘‘मुलांनो! तुम्ही स्काऊट विद्यार्थी आहात. आणि स्काऊटचं कर्तव्य आहे मदत करण्याचं.’’ गंप्याला काही राहवलं नाही. तो म्हणाला, ‘‘पण सर! कोणाला मदत करायची?’’

‘‘अरेऽऽ! मूर्खाऽऽ! कोणालाही मदत करावी.’’ तरीही शंकासुर झंप्यानं शंका काढलीच.

‘‘ते पटलं सर! पण कोणी मदत मागितली तरच ती करायची का?’’’

‘‘काय पण  हा वेडगळ प्रश्न! अरेऽऽ झंप्याऽऽ! अनेक संकोची लोक मदत मागतच नाहीत. अशा वेळी आपण होऊन ते नको नको म्हणत असले तरी त्यांना मदत करायची बरंऽऽ!’’ आता होती टंप्याची शंकेची पाळी. तो म्हणाला, ‘‘सऽर! हेदेखील पटलं आम्हाला. तरी मला लघुशंका आली आहे.’’ टंप्याचा लघुशंका हा शब्द ऐकताच सगळे खोऽऽ खोऽऽ खोऽऽ करून हसू लागले. आपलं चुकलं तरी काय, हे काही टंप्याला समजेना. तेव्हा स्काऊटचे सर हसता हसता म्हणाले, ‘‘टंप्या! लघुशंका याचा वेगळाच अर्थ करून ही सगळी मुलं तुला हसली. हं, काय म्हणतोस?’’

‘‘सर, कोणाला मदत हवी आहे की नाही, हे कसं ओळखायचं?’’

‘‘टंप्याऽऽ! तुला आधी एक टप्पू देतो आणि मगच सांगतो.’’ टंप्यानं टप्पू चुकवायचा प्रयत्न केला खरा, पण सर ‘टप्पूउस्ताद’ होते. शंकानिरसन करताना ते म्हणाले, ‘‘हे बघा मुलांनो, आपण सदैव मदतीच्या शोधात राहायला हवं. आलं लक्षात?’’ आणि तेव्हापासून गंप्या, झंप्या, टंप्या मदतीच्या शोधात एकत्र फिरू लागले. फिरताना ते एका सुरात ओरडायचे, ‘‘मदत, मदत, मदत, अहोऽऽ! हवी आहे का कोणाला मदत?’’

अखेर त्यांना स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये एक वृद्ध प्रवासी दिसला. तो म्हणाला, ‘‘मुलांनो, तुम्हाला मदत करायची आहे ना, मग मला करा मदत. माझी झोपेची वेळ झाली आहे. प्लॅटफॉर्मला गाडी लागली की मला झोपेतून उठवा आणि सामानासकट गाडीत बसवून द्या.’’ आणि बघता बघता ते गृहस्थ बाकावर हात-पाय पसरून चक्क घोरू लागले.

थोडय़ाच वेळात गाडी आली आणि गंप्या, झंप्या, टंप्या हे त्या गृहस्थाला उठवू लागले. पण तो गृहस्थ काही केल्या जागा होईना. तेव्हा गंप्यानं त्याच्या चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारला. त्यामुळे दचकून ते गृहस्थ जागे झाले. लगेच गंप्यानं त्यांचा हात धरला. झंप्यानं त्यांच्या हातात काठी दिली. टंप्यानं त्यांची बॅग उचलली आणि त्या तिघांनी मिळून त्यांना गाडीत बसवून दिलं.

गाडी सुटण्याच्या बेतात असताना ते गृहस्थ कसेबसे धडपडत सामान घेऊन खाली उतरले. आणि काठी उगारत त्या तिघांच्या अंगावर धावून गेले. आणि वसकन्त्यांच्यावर ओरडले. ‘‘मूर्खानो, तुम्ही मला भलत्याच गाडीत बसवून दिलं होतं. बरं झालं त्या गाडीत गेल्यावर कळलं म्हणून. नाही तर मोठा घोटाळा झाला असता.’’ त्या गृहस्थाच्या तावडीतून ते तिघेही कसेबसे निसटले. पण त्या प्रसंगाने ते काही नाउमेद झाले नाहीत.

त्यानंतर त्यांनी स्काऊटच्या सरांच्या घरी आपला मोर्चा वळवला. त्यावेळी सर काही घरी नव्हते. घरात शिरतानाच त्यांनी एका सुरात ‘मदत, मदत, मदत, हवी आहे काही कुणाला मदत?’ असा उद्घोष केला. घरात सरांची पत्नी होती. तिला मुलांचं खूप कौतुक वाटलं. तिनं मुलांना चिवडा, शंकरपाळी असं फराळाचं दिलं. ती म्हणाली, ‘‘मुलांनो! आजकाल कोणीही दुसऱ्याला मदत करत नाही. तुम्ही मला शहाणी मुलं दिसता. मुलांनो, मी आत दूध तापवत ठेवलं आहे. तेव्हा प्रथम मी आत जाते. तुम्ही फराळ करा. तोपर्यंत सुचलं तर मी तुम्हाला काम सांगते.’’ त्या आत गेल्या आणि उतू जाण्याच्या बेतात असलेल्या दुधाकडे लक्ष देत आतूनच मोठय़ा आवाजात म्हणाल्या, ‘‘मुलांनो, टेबलावर पेपरचा गठ्ठा आहे. तो गल्लीच्या कोपऱ्यावरच्या रद्दीवाल्याच्या दुकानात नेऊन विकून टाका.’’ उत्साही स्वरात झंप्या म्हणाला, ‘‘हो काकू! पण पैसे मात्र उद्या आणून देऊ. शाळेला उशीर व्हायला नको. उशीर झाला तर सर खूप रागवतात अन् शिक्षादेखील करतात.’’ ‘‘काही हरकत नाही. पैसे उद्या आणून दिलेत तरी चालेल.’’

* * *

स्काऊटचे सर घरी आले आणि त्यांची घाई सुरू झाली. ‘‘अग्ऽऽ! शाळेला उशीर होतोय. घरातली सगळ्यात मोठी पिशवी आण बघू. टेबलावर तपासून ठेवलेल्या पेपरचा गठ्ठा त्या पिशवीत भरतो आणि शाळेत घेऊन जातो.’’ तेवढय़ात सरांचं लक्ष टेबलाकडे गेलं आणि त्यांना चक्करच आली. टेबलावरचा तपासलेल्या पेपर्सचा गठ्ठा अदृश्य झाला होता. ते पत्नीवर वसकन् ओरडून म्हणाले. ‘‘अगं, ही भुताटकी झाली तरी कशी? टेबलावरचा पेपरचा गठ्ठा गेला तरी कोठे?’’ सरांच्या पत्नीच्या लक्षात सगळा प्रकार आला. तिनं रडत रडत काय झालं ते सरांना सांगितलं. ते ऐकल्यावर सर डोक्यात राख घालून ओरडले, ‘‘मेलो रे मेलो. ठार मेलो. अगंऽऽ!  हेडसरांना काय सांगू?’’ आणि सरांनी पत्नीची खरपूस हजेरी घेतली. तेव्हा ती म्हणाली. ‘‘अहोऽऽ! पेपर म्हणजे वर्तमानपत्र म्हणायचं होतं मला. ती मुलं एवढी बिनडोक असतील असं नव्हतं वाटलं मला. आता हे बघा, माझ्याशी भांडण्यात वेळ घालवू नका. असेच धावतपळत रद्दीच्या दुकानात जा. अजूनही पेपरचा गठ्ठा तिथंच असेल.’’

मग मात्र सर तसेच अनवाणी पायांनी धावतपळत रद्दीच्या दुकानात गेले. सुदैवाने पेपरचा गठ्ठा गरीब गाईप्रमाणे शांतपणे एका बाजूला फतकल मारून बसलेला होता. धूर्त रद्दीवाल्याने मात्र सरांकडून त्या गठ्ठय़ाचे तब्बल शंभर रुपये वसूल केले. बिचारे सर करणार तरी काय? अडला हरी गाढवाचे पाय धरी, असं म्हणतात तेच खरं. या मदतीबद्दल सरांनी गंप्या, झंप्या आणि टंप्या यांना कोणतं बक्षीस दिलं असेल ते सांगायलाच हवं का?

बालमित्रांनो! मदत करा. पण गंप्या, झंप्या, टंप्याप्रमाणे नव्हे बरं! डोकं ताळ्यावर ठेवून मदत करा.

First Published on November 18, 2018 12:04 am

Web Title: loksatta balmafil story article three characters in search of help