24 January 2021

News Flash

गोड गोड बोला..पण मास्क लावून!

दोघांनीही एकमेकांकडे पाहत हा खमंग वास कसला आहे, हे कळल्याच्या परस्परांना खुणा केल्या.

मोहन गद्रे wgadrekaka@gmail.com

सुदेश आणि स्वरा दोघंही ऑनलाइन क्लासमध्ये बसले होते. आणि एक गोड खमंग वास त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला. दोघांनीही एकमेकांकडे पाहत हा खमंग वास कसला आहे, हे कळल्याच्या परस्परांना खुणा केल्या.

दरवर्षी जानेवारी महिना उजाडला की संक्रांतीकरता आई तीळगुळाचे लाडू करायला घ्यायची आणि त्याचा एक गोड खमंग असा वास घरभरच नाही, तर अगदी आजूबाजूलाही पसरायचा. आता तसाच खमंग वास येऊ येतो आहे, याचा अर्थ जानेवारी उजाडला असून संक्रांत जवळ आलेली आहे, हे त्या दोघांनी कॅलेंडरकडे न पाहताच ओळखलं.

दहा मिनिटांचा ब्रेक झाला. दोघंही अभ्यासावरून उठून किचनकडे पळाले. स्वरा म्हणाली, ‘‘आई, अगं, करोना अजून गेला नाही ना.. मग?’’ आई म्हणाली, ‘‘तुम्हाला काय म्हणायचंय ते आलंय माझ्या लक्षात. बाबांनाही तुमच्यासारखाच प्रश्न पडला होता. आणि आम्ही ठरवलंय- काय करायचं ते. तुम्ही आधी ऑनलाइन क्लास पूर्ण करा. मग मी सांगते- या वर्षी आपण संक्रांत कशी साजरी करणार आहोत ते!’’

ब्रेकनंतर परत सुरू झालेला ऑनलाइन क्लास संपला. तोपर्यंत आईने तीळगुळाचे लाडू बनवण्यासाठीची सगळी तयारी करून बाहेर टेबलवर लाडू वळायला ती बसली होती. लाडू वळता वळता स्वरा, सुदेश आणि आजी या वर्षी संक्रांत कशी साजरी करावी याबद्दल बोलू लागले.

कारण या वर्षी कुठलाही सण करोनाच्या भीतीमुळे नीट साजरा करता येणार नव्हता. पाडवा.. गणपतीसारखा मोठा सण.. शिवाय दिवाळी, दसरा, होळी हे सगळेच दरवर्षी धुमधडाक्यात साजरे होणारे सण सुनेसुनेच कसेबसे साजरे करणं भाग पडलं होतं.

सुदेश म्हणाला, ‘‘आई, सोशल डिस्टन्सिंग पाळून तीळगुळाचे लाडू वाटायचं म्हटलं ना तर एकमेकांकडे लाडू टाकून झेलावे लागतील. कॅच कॅच खेळतात ना, तसं. कसं दिसेल ना? काय भन्नाट आयडिया आहे! काय तो सीन दिसेल?’’

स्वरा म्हणाली, ‘‘आई, अगं सोशल डिस्टन्सिंग ठेवून लाडू कसे वाटायचे? आणि मग इतक्या लाडवांचं करायचं काय?’’

आजी म्हणाली, ‘‘आम्ही ठरवलंय- लाडू कसे वाटायचे ते. तुम्ही सांगा बघू काय करता येईल? तुमच्या आयडियाही कळू देत!’’

स्वरा म्हणाली, ‘‘आपण कुरिअरने किंवा पोस्टाने लाडू पाठवले तर..!’’

सुदेश म्हणाला, ‘‘अगं, ते परत बऱ्याच अनोळखी लोकांच्या हातातून प्रत्येकाकडे पोचणार ना! ते घेणारा मग संशय म्हणजे डाउट करणारच ना! त्यापेक्षा आपण त्या ओल्ड एज होममधल्या आजी-आजोबांना नेऊन दिले तर?’’

आजी म्हणाली, ‘‘कल्पनाची आयडिया चांगली आहे, पण नॉन-प्रॅक्टिकल! म्हाताऱ्या माणसांनी हे कडक तीळगुळाचे लाडू खायचे कसे? म्हणून आजोबांनी सुचवलेली तुमच्या भाषेतल्या आयडियाची कल्पना आम्हाला आवडली आहे आणि पटलीही आहे.’’

आई म्हणाली, ‘‘आपण वृद्धाश्रमातपण देऊ या.. पण तीळगुळाच्या मऊ वडय़ा करून देऊ. या वर्षी आम्ही तीळगुळाचे लाडू दरवर्षीप्रमाणेच करणार आहोत. पण ते आपापसात न वाटता ज्या मुलांना आई-वडील नाहीत अशा मुलांना जिथे आसरा देतात त्या मुलांना ते मिळतील असं पाहणार आहोत.’’

स्वरा म्हणाली, ‘‘हा.. म्हणजे सुदेशचा वाढदिवस आपण एका वर्षी साजरा केला होता तिथे ना! काय म्हणतात गं त्याला?’’

सुदेश म्हणाला, ‘‘आठवलं. अनाथाश्रम. हो ना?’’

आई म्हणाली, ‘‘एकदम बरोबर. संक्रांत कधी असते?’’

स्वरा म्हणाली, ‘‘चौदा जानेवारीला.’’

सुदेश म्हणाला, ‘‘त्यात तू काय वेगळं सांगितलंस? दरवर्षी संक्रांत चौदा जानेवारीलाच येते. मागेच आजोबांनी सांगून ठेवलंय.’’

आई म्हणाली, ‘‘बाबा आणि मी संक्रांतीच्या आधी तीळगूळ नेऊन देऊ. म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सर्व मुलांना तिथले काका तीळगूळ वाटतील. म्हणजे या वर्षीसुद्धा तीळगूळ वाटला जाईल; पण सर्व नियम पाळून.’’

स्वरा म्हणाली, ‘‘घरात तर काय आपण आजसुद्धा नियम एकदम कडक पाळून तीळगुळाचा कडक लाडू खाऊ शकतो.’’

आई म्हणाली, ‘‘आजोबा देवाची पूजा करताना देवाला आधी प्रसाद ठेवतील. मग तुम्हाला फक्त चवीसाठी म्हणून मिळेल. तीळगूळ म्हणून तो खायचा. आणि द्यायचा तो मात्र संक्रांतीच्या दिवशी. कळलं का!’’

दोघंही म्हणाले, ‘‘कळलं गं. पण चवीला तरी आज देशील ना! बास मग.’’

सुदेश म्हणाला, ‘‘मी मोबाइलवर संक्रांतीसाठी खास मेसेज तयार केलाय. म्हणजे बाबांची आयडिया.. पण मी तयार केलाय. तोच सर्वाना या वर्षी पाठवणार आहे.’’

‘‘या वर्षीपुरता हा तीळगूळ गोड मानून घ्या.  दरवर्षीप्रमाणे गोड गोड बोलाच; पण यंदा मास्क लावून.. बरं का!’’

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 6:13 am

Web Title: loksatta balmaifil story about wearing face masks zws 70
Next Stories
1 हेही दिवस जातील..
2 गाठोडय़ांचं गुपित
3 मनमैत्र : उत्तरापेक्षा प्रश्न महान
Just Now!
X