दोस्तांनो, अभ्यास करताना किंवा पुस्तक वाचताना एखाद्या शब्दाचा अर्थ समजत नसेल तर तुम्ही काय करता? अर्थातच घरातील मोठय़ा व्यक्तींकडून तो समजून घेण्याचा प्रयत्न करता. किंवा शब्दकोशाची मदत घेता. बरोबर ना?
बाजारात विविध प्रकारचे- जसे की, इंग्रजी-मराठी, इंग्रजी-इंग्रजी (म्हणजे इंग्रजी शब्दांचे सोप्या इंग्रजीत अर्थ देणाऱ्या) किंवा विशिष्ट विषयाला वाहिलेले (उदाहरणार्थ- विज्ञान, वैद्यकशास्त्र, संगणक, इत्यादी) जाडजूड पुस्तकांपासून ते खिशात ठेवता येतील अशा आकाराचे शब्दकोश उपलब्ध असतात.
आज मात्र आपण शालेय गणिताशी संबंधित शब्दांचा संग्रह असलेल्या इंटरअ‍ॅक्टिव्ह आणि अ‍ॅनिमेटेड ऑनलाइन शब्दकोशांबद्दल माहिती घेणार आहोत. या साइटचे नाव आहे http://www.amathsdictionaryforkids.com.  हा शब्दकोश पूर्णपणे विनामूल्य असून तो डाऊनलोड करून प्रिंटदेखील करता येता़े. आपण काही उदाहरणे पाहू. इंटरअ‍ॅक्टिव्ह ओरिजिनल लिहिलेल्या चौकोनावर क्लिक केल्यास शब्दकोशाचा मुख्य स्क्रीन उघडतो. त्यात डावीकडे A ते Z अक्षरे दिलेली आहेत. त्यातील कुठल्याही अक्षरावर क्लिक केल्यास त्या अक्षराने सुरू होणाऱ्या गणितातील शब्दांची माहिती आपल्याला पाहता येते.
बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार या क्रिया करण्याचा एक विशिष्ट क्रम आहे. हा क्रम चुकला तर मिळणारे उत्तर चुकते. तो क्रम काय आहे हे उदाहरणासहित येथे दाखवलेले आहे. (त्यासाठी तुम्हाला आधी O वर क्लिक करून नंतर ऑर्डर ऑफ ऑपरेशन्स वर क्लिक करावे लागेल.) तसेच समजावून सांगितलेली व्याख्या तुम्हाला नीट समजली का हे बघण्यासाठी सरावासाठी काही उदाहरणे दिलेली आहेत. तसेच सर्कल (circle) म्हणजेच वर्तुळाची व्याख्या जाणून घेताना तुम्हाला कंपासने वर्तुळ काढून दाखवले जाते. त्याचबरोबर त्रिज्या (रेडियस) आणि परीघ (सरकमफरन्स) म्हणजे काय हेदेखील समजावून सांगितले आहे. वर्तुळाशी संबंधित इतर शब्दांच्या व्याख्या म्हणजेच व्यास (डायमीटर), जीवा (कॉर्ड), स्पर्शिका (टँजंट) याबद्दल समजून घेताना तो भाग वर्तुळावर काढून दाखवल्यामुळे त्यांचे अर्थ समजण्यास आणि लक्षात ठेवण्यास सोपे होते.
दोन वस्तूंमधील अंतर (डिस्टन्स) पट्टीच्या सहाय्याने कसे मोजायचे हे समजावून सांगण्यासाठी दोन पक्षी एकमेकांपासून काही अंतरावर ठेवले आहेत. त्यांच्यातील अंतर मोजण्यासाठी तुम्ही पट्टी माऊसच्या सहाय्याने ड्रॅग करा. पट्टी त्यांच्याजवळ नेऊन अंतर मोजू शकता. अशा अनेक गणिती संकल्पना तुम्हाला गमतीशीर पद्धतीने येथे शिकता येतील. तसेच या ऑनलाइन शब्दकोशामध्ये काही ठिकाणी छोटय़ा छोटय़ा क्विझेसदेखील आहेत. उदाहरणार्थ 3D शेप्स. यामध्ये विविध आकारांचे फोटो दाखवलेले आहेत. ते बघून योग्य तो आकार तुम्हाला ओळखायचा आहे. कोन, घन, सिलेंडर, इत्यादी.
परीक्षेच्या वेळी जसे महत्त्वाचे मुद्दे लक्षात राहण्यासाठी तुम्ही त्यांची वहीत नोंद करून ठेवता किंवा तक्ता बनवता; अशाच प्रकारे येथे क्विक रेफरन्स आणि मॅथ्स चार्ट या विभागात तुम्हाला एखाद्या संकल्पनेशी संबंधित आकृत्या, व्याख्या आणि उदाहरणे दिलेली आहेत. उदाहरणार्थ मॅथ्स चार्ट या भागात पर्सेंटेज (टक्केवारी), सेल्स टॅक्स (विक्री कर), नफा-तोटा, डिस्काउंट (सूट), सरळव्याज इत्यादींचे चार्ट बघायला मिळतील. या तक्त्यांमध्ये काही इंटरअ‍ॅक्टिव्ह चार्टसुद्धा आहेत जे कॅलक्युलेटरप्रमाणे कार्य करतात. या कॅलक्युलेटरमध्ये योग्य ते आकडे टाकून तुम्हाला उत्तर मिळवता येते. हा गणिताचा शब्दकोश तुम्हाला नक्कीच नावीन्यपूर्ण वाटेल याची खात्री वाटते. ल्ल

– मनाली रानडे
manaliranade84@gmail.com