27 May 2020

News Flash

पुस्तकांचा धडा!

राहुलने चौथ्यांदा बेल वाजवली पण कुणीच दार उघडलं नाही. शेवटी शेजारच्या काकूंकडून घराची किल्ली घेत

राहुल त्याच्या रूममध्ये गेला आणि नेहमीप्रमाणे त्याने पलंगावर त्याचं दप्तर भिरकावून दिलं.

राहुलने चौथ्यांदा बेल वाजवली पण कुणीच दार उघडलं नाही. शेवटी शेजारच्या काकूंकडून घराची किल्ली घेत आणि काहीसं चिडतच त्याने घराचं दार उघडलं. आत शिरताच त्यानं धडामक्न पायाने दार बंद केलं. घरी कोणीच नसल्यामुळे तो अजूनच धुसमुसत होता. बाबा ऑफिसला गेले होते. ते रोज उशिराच येतात. पण नेहमी कामावरून चार वाजेपर्यंत येणारी आईसुद्धा आज नेमकी साडेपाच वाजले तरी घरी आली नव्हती. आजी-आजोबा तीन-चार दिवस आत्याकडे राहायला गेले होते म्हणून तेदेखील घरी नव्हते. असं खरं तर फार कमी वेळा व्हायचं. पण आज नेमकं त्याला कोणाशी तरी बोलायचं होतं आणि घरात कोणीच नव्हतं.
राहुल त्याच्या रूममध्ये गेला आणि नेहमीप्रमाणे त्याने पलंगावर त्याचं दप्तर भिरकावून दिलं. युनिफॉर्म न बदलताच तो स्टडी-टेबलजवळच्या खुर्चीवर धाडकन जाऊन बसला. त्याला काहीच सुचेना. त्याने टेबलावर हाताची घडी घालून त्यावर आपलं डोकं टेकवलं. त्याचे डोळे पाणावले होते. आज त्याच्या शाळेमध्ये बाईंनी गणिताची ‘सरप्राईज टेस्ट’ घेतली होती आणि त्याला १० गणितांपैकी चार गणितं सोडवायलाच जमली नव्हती.
खरं तर राहुल तसा हुशार मुलगा होता आणि गणित तर त्याच्या आवडीचा विषय होता. विशेष म्हणजे, आजच्या टेस्टमध्ये न जमलेली गणितं त्यानं पूर्वी बाईंनी दिलेल्या ‘होमवर्क’मध्ये सोडवलीदेखील होती. पण आज का कोणास ठाऊक, टेस्टच्या वेळी तो एकदम गोंधळून गेला आणि त्या १० गणितांपैकी चार गणितं त्याला काही केल्या सोडवायलाच जमेनात. त्यामुळे त्याची जास्तच चिडचिड होत होती.
सारखा-सारखा तोच विचार करून राहुलला आता रडू यायला लागलं. रडून रडून तो एकदम दमून गेला होता. त्याचं डोकं दुखत होतं. टेबलाशेजारीच असलेल्या खिडकीतून वाऱ्याची एक मंद झुळूक आली, तशी त्याला गाढ झोप लागली. एवढय़ात कुठून तरी त्याला पुस्तकाची पानं फडफडण्याचा आवाज आला. दबक्या आवाजात कुणी तरी हसतंय, असा राहुलला भास झाला. आजूबाजूला पाहतो तर त्याच्या स्टडी टेबलवर त्यानेच कशीही फेकलेली तीन-चार पुस्तकं त्याच्याकडे पाहून चक्क हसत होती. ती एकमेकांच्या कानामध्ये काही तरी कुजबुजत होती. ते पाहून राहुल जरा दचकलाच. ‘‘अरे, पुस्तकं कशी बोलू शकतात?’’ त्याच्या मनात विचार आला. पण तो सावरला आणि त्यांना दमटावून म्हणाला, ‘‘का रे, मला बघून असे फिदीफिदी का हसताय तुम्ही?’’ राहुलचा आवाज ऐकून पुस्तकं घाबरली आणि ती थोडीशी मागे झाली. ती आता हसायची बंद झाली. तरी धीर करून त्यांच्यातलं भूगोलाचं पुस्तक थोडं पुढे सरसावलं. जरा चिडवतच ते राहुलला म्हणालं, ‘‘काय राहुल? आज टेस्टमध्ये गणितं नाही नं जमली सोडवायला?’’
‘‘तुम्हाला कसं माहीत?’’ राहुलनं आश्चर्यानं विचारलं. रडतच तो पुढे म्हणाला, ‘‘कोणास ठाऊक कसं! मला तर सगळी गणितं आधी येत होती. पण आज टेस्टमध्ये सोडवताच येईनात.’’
पुस्तकाला राहुलची दया आली. ते म्हणालं, ‘‘रडू नकोस राहुल. अरे, हे सगळं आम्हीच घडवून आणलं होतं.’’
‘‘पण का?’’
‘‘अरे, आम्ही रोज पाहतोय तुला. तुझ्या घरचे सगळे कित्ती रागवत असतात तुला, की शाळेतून आल्यावर दप्तर जागच्या जागी व्यवस्थित ठेव. पण तू आल्या आल्या ते पलंगावर भिरकावून देतोस. त्यामुळे आम्ही दप्तरामध्ये दुमडून जातो रे! तू आम्हाला कसंही वापरतोस. आता हेच पाहा नं! अजून सहावीचं अर्ध वर्ष सरायचंय, पण आमची काय अवस्था करून ठेवली आहेस तू! कव्हर्स निघालेली, कित्येक ठिकाणी आमच्या पानांचे कोपरे दुमडलेले, पानं फाटलेली, बाईंडिंग सुटलेलं, पेन-पेन्सिलीने कशाही मारलेल्या रेघोटय़ांनी आमची पानं खराब झालेली. पार रया गेलीय आमची. एवढंच नाही; तुझी पेनं, पेन्सिली, खोडरबर, पट्टय़ाही इतस्तत: विखुरलेली असतात.’’ राहुलने ओशाळून मान खाली घातली.
हे ऐकून भूगोलाच्या पुस्तकाशेजारी पडलेली पेन्सिल धिटाईने उभी राहिली आणि म्हणाली, ‘‘राहुल, घरातले सगळे तुला सांगून, रागावून दमले आता, पण तुझ्यात काहीच बदल होताना दिसत नाही रे! म्हणून मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की तुला चांगली अद्दल घडवायची. आम्ही आमच्या विद्याताईची म्हणजेच सरस्वतीदेवीची भेट घेतली. तिला हे सगळं सविस्तर सांगितलं. तेव्हा तिनेच ही युक्ती शोधून काढली. त्यामुळे आजच्या परीक्षेत तुला ती चार गणितं येत असूनदेखील, कशी सोडवायची ते ऐन वेळी आठवलंच नाही. कारण सरस्वतीदेवी तुझ्यावर रागावली होती आणि म्हणून तिने तुला परीक्षेत मुद्दामच मदत केली नाही.’’
आता इंग्रजीचं पुस्तक पुढे सरसावत म्हणालं, ‘‘हे बघ राहुल, तुझे आई-बाबा तुला काही कमी पडू नये यासाठी सतत प्रयत्न करत असतात. त्यांची एवढीच इच्छा असते, की तुझ्या वस्तू तू नीट वापराव्यास. अरे, कितीतरी मुलांना इतकं मिळतसुद्धा नाही रे! विचार कर यावर.’
भूगोलाचं पुस्तकं पुन्हा बोलू लागलं, ‘‘आता हेच बघ नं! इतका अभ्यास केल्यानंतरही आज तुला गणितं आली नाहीत तर किती वाईट वाटलं तुला. पुस्तकांअभावी काही मुलांनाही तसंच वाईट वाटतं. आमचा तुला उपदेश करण्याचा हेतू नव्हता मित्रा. पण आम्हाला आमच्या मनातलं हे सगळं तुझ्यापर्यंत पोहोचवायचं होतं. म्हणून मग आम्ही मुद्दाम आज असं केलं. सॉरी दोस्ता!’’
राहुलला एकदम जाणवलं आपलं काय चुकतंय ते! तो त्यांना म्हणाला, ‘‘अरे, मीच सॉरी आहे मित्रांनो. इथून पुढे मी असं कध्धी कध्धी म्हणून करणार नाही. तुमची नीट काळजी घेईन. एवढंच नाही तर माझी पट्टी, पेन्सिल, खोडरबर, अगदी सगळं-सगळं व्यवस्थित जपून वापरीन. घरच्या कोणालाच या गोष्टींवरून रागवायची संधी देणार नाही. आणि हो, मला याची जाणीव करून दिल्याबद्दल मनापासून आभार!’’ राहुलचं हे बोलणं ऐकून पुस्तकांनी आपली पानं आनंदानं फडफडवली.
इतक्यात दाराची बेल ऐकू येऊन राहुल दचकून जागा झाला. पाहतो तर, आजूबाजूला पडलेली पुस्तकं शांत होती. पेन्सिलही गप्प होती. तो एकदम भानावर आला. ‘‘ओह, हे स्वप्न होतं तर!’’ तो स्वत:शी पुटपुटला. त्याच्या लक्षात आलं की इतके दिवस मनात असलेला अपराधी भाव आज नकळत त्याच्या स्वप्नांत अशाप्रकारे समोर आला. डोळे चोळत त्याने दरवाजा उघडला. दारात पिशव्या घेऊन आई उभी होती.
‘‘काय रे! किती वेळ बेल वाजवतेय मी! दार का नाही उघडलंस? तू आतून कडी लावल्यामुळे किल्लीही लागेना!’’ आई जरा कुरकुरत म्हणाली. राहुलने आईच्या हातातल्या पिशव्या घेतल्या. आईला जरा नवलच वाटलं.
‘‘आई, आज का गं इतका उशीर केलास?’’ राहुलने आईला घट्ट मिठी मारत विचारलं.
‘‘अरे, बँकेत जरा जास्त काम होतं. मला वाटलंच तुला काकूंकडून किल्ली घ्यावी लागेल. सॉरी बेटा.’’
‘‘आई, आज शाळेत गणिताची सरप्राईज टेस्ट झाली.’’
‘‘मग कशी गेली?’’ आईने उत्सुकतेनं विचारलं. सगळी हकीगत राहुलनं आईला धडाधड सांगितली.
‘‘पण आपली ती गणितं झाली होती की रे!’’
‘‘हो ना! तरी नाही जमली.’’ राहुल ओठांचा चंबू करत म्हणाला.
‘‘ठीक आहे. पुढच्या टेस्टसाठी अजून चांगला अभ्यास करू आपण.’’ आई राहुलच्या पाठीवर थोपटत म्हणाली.
‘‘आई, तुम्ही मला माझ्या वस्तू नीट वापर म्हणून सारखे रागावत असता नं! आता बघच, मी सगळी वह्या-पुस्तकं नीट करून, कपाट आणि ड्रॉवर्स स्वच्छ करून, ती सगळी अगदी व्यवस्थित लावून ठेवणार आहे. पेन, पेन्सिल्स, रबर, पट्टय़ा सगळं इथून पुढे अगदी निगुतीनं वापरणार आहे.’’ राहुलमध्ये हा अचानक इतका झालेला बदल आईच्या काहीच लक्षात येईना. राहुलने मग त्याला पडलेलं स्वप्न तिला सविस्तर सांगितलं आणि पुढे म्हणाला, ‘‘आई, असं वागून मी विद्येचा अपमान केला ना?’
‘‘पण आता समजतंय नं तुला!’’
‘‘आई, आपण दर वर्षी दसऱ्याला सरस्वतीची, म्हणजेच आपल्या वह्या, पुस्तकं, वर्कबुक्स वगैरेची पूजा करतो ना. आतापर्यंत मी ती नुसतीच उरकायचो. पण या वर्षीपासून मी ती मनापासून करणार आहे.’’
‘‘अरे झक्कास!’’ असं म्हणत आईने राहुलचा पापा घेतला.

प्राची बोकील
prachibokil@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2015 1:24 am

Web Title: loksatta child story
Next Stories
1 शिका जर्मन फ्रेंच इटालियन
2 गंमत कोडी
3 नका तोडू कळ्या..
Just Now!
X