23 February 2019

News Flash

गोऽऽऽल!

फुटबॉल वर्ल्डकप ‘फीव्हर’ने अख्ख्या जगाला व्यापलेलं असताना नंदनवन या ज्वरातून निसटणं अगदी अशक्यच होतं.

|| प्राची मोकाशी

फुटबॉल वर्ल्डकप ‘फीव्हर’ने अख्ख्या जगाला व्यापलेलं असताना नंदनवन या ज्वरातून निसटणं अगदी अशक्यच होतं. आपल्या जंगलामध्येही अशी फुटबॉल मॅच होणार असल्याची खबर जेव्हा जंगलभर पसरली तेव्हा सर्वत्र एकच उत्सुकता निर्माण झाली. त्यामुळे जंगलाच्या मध्यभागी असलेल्या हिरव्यागार गवतावर सगळे ‘जंगली’ आज फुटबॉल मॅच खेळण्याच्या तयारीसाठी जमले होते.

‘‘मला वाटतं, या हिरवळीवरच मॅच खेळावी. हेच आपलं फुटबॉल ग्राउंड! मी संपूर्ण जंगलभर फिरले, पण इतकी चांगली जागा मला कुठेच सापडेना. इथे आजूबाजूला बरेच खडक-दगडधोंडे असल्यामुळे प्रेक्षकांना मॅच मस्तपकी बसून पाहता येईल. आणि जागा छान नदीच्या किनारी आहे! त्यामुळे आपल्या जलचर मित्रांनाही त्याचा आनंद घेता येईल.’’ घारूताई एका झाडावर विसावत म्हणाली.

‘‘तुम्हा जमिनीवरच्या प्राण्यांचं नेहमी असंच असतं. आम्ही तुमच्या खेळांत कधीच सामील नसतो!’’ नदीतून उंच उसळी मारत एक डॉल्फिन कुरकुरला.

‘‘असे रागावू नका रे! पुढच्या वेळी तुमच्या होम-ग्राउंडवर म्हणजेच नदीत ‘स्विमिंग कॉम्पिटिशन’ फिक्स! पण आज चर्चा आहे आपल्या फुटबॉल मॅचबद्दल.’’ घारूताई मूळ विषयाकडे वळत म्हणाली. यावर डॉल्फिन मिश्कीलपणे हसला आणि पुन्हा उसळी मारत पाण्यात शिरला. तसं घारूताईच्या अंगावर पाण्याचे शिंतोडे उडाले. हा खेळ बघून जमलेले सगळे मनमुराद हसले.

‘‘पण फुटबॉल? तो कुठाय आपल्याकडे?’’ हरणाचा मुद्दय़ाचा प्रश्न.

‘‘मी मधे माणसांच्या वस्तीत गेलो असताना मला त्यांचा एक जुना फुटबॉल मिळालाय. बहुतेक त्यांनी तो टाकून दिला असावा. पण आपल्याला चालेल!’’ झाडावरून उडय़ा मारत वानरदादा तिथे येत म्हणाले. त्यांच्या एका हातामध्ये फुटबॉल होता. सर्वाना पाहण्यासाठी त्यांनी तो हरणाच्या दिशेने फेकला.

‘‘तेव्हाच तर मी माणसांना फुटबॉल खेळताना पाहिलं. आम्ही आमच्या-आमच्यात नेहमी खेळतो हा खेळ. सॉल्लीड धम्माल येते!’’ असं म्हणत त्यांनी जमिनीवर टुणकन् उडी मारली आणि एक काठी हुडकून काढली. मग मातीत फुटबॉल पिचचं चित्र रेखाटलं. गोल, सेंटर, पेनल्टी वगरे काढून व्यवस्थित हा खेळ समजावला. सगळे मन लावून ऐकत होते.

‘‘समजलं. पण खेळाडू कसे ठरवायचे?’’ एका गव्याने विचारलं.

‘‘दोन्ही बाजूंना प्रत्येकी ११-११ खेळाडू असतील. त्यांच्यापकी प्रत्येक बाजूचा एक-एक कर्णधार असेल. ३-३ राखीव खेळाडू असतील. कर्णधाराने आपापल्या टीमचे गोलकीपर, स्ट्रायकर, डिफेंडर, सेंटर फॉरवर्ड, मिड-फिल्डर वगरे ठरवावेत. आमची सगळी वानरांची टीम तुम्हाला ‘कोचिंग’ देईल. आणि हो! आपल्याला ग्राउंडही मापून घ्यायला लागेल..’’ वानरदादा विचार करत म्हणाले.

‘‘इतकं ‘टेक्निकल’ नकोय आपल्याला! आपण गंमत म्हणून हा खेळ खेळणार आहोत. त्यामुळे नियम वगरे फारसे ठरवायला नकोत.’’ हत्तीकाकांनी वानरदादांना आवरतं घेत सल्ला दिला. वानरदादांनी त्यांनादेखील हा खेळ समजावला होता. हत्तीकाकांनीच हा खेळ खेळण्याची कल्पना उचलून धरत सगळ्या प्राण्यांची सभा बोलावली होती. त्यांना नंदनवनात खूप आदर होता.

‘‘येत्या पौर्णिमेला रात्री उशिराने मॅच खेळूया म्हणजे सगळ्यांची दिवसाची कामंही उरकतील आणि आम्हा निशाचर प्राण्यांनाही सहभागी होता येईल. पौर्णिमा असल्यामुळे चंद्रप्रकाश भरपूर असेल.’’ घुबडरावांनी सुचवलं.

‘‘चालेल. खेळाडूंनाही प्रॅक्टिस करायला वेळ मिळेल.’’ झेब्राभाऊने मत मांडलं.

‘‘पण एवढासा प्रकाश नाही पुरायचा.’’ जिराफाची शंका.

‘‘आम्ही आहोत की तुमचे ‘फ्लड-लाइट’!’’ एवढय़ात काजव्यांचे थवेच्या थवे तिथल्या झाडांमधून एकदम लुकलुकायला लागले. आजची सभाही संध्याकाळच्या वेळीच भरली असल्यामुळे त्या काजव्यांच्या रोषणाईने ती संपूर्ण जागा एकदम उजळून निघाली. आणि ‘वॉव!’ असा कोरस ऐकू आला.

‘‘आम्ही हे गवत कुरतडून मस्त ‘लेव्हल’ करून देऊ!’’ ससा जागेचं परीक्षण करत म्हणाला.

‘‘ग्राउंडच्या या दोन बाजूंच्या प्रत्येकी दोन-दोन झाडांमध्ये ‘गोल’ नेमूया.’’ अस्वल गोलच्या जागा ठरवत म्हणालं.

‘‘आम्ही कांगारू बनतो दोन्ही टीमचे गोलकीपर.’’ कांगारू उंच उडी मारत आपलं म्हणणं सार्थ करू पाहत होतं. सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला.

अजून काही वेळ ही चर्चा अशीच रंगली आणि पुढची सगळी ठरवाठरवी करून सभा बरखास्त झाली. सगळ्यांनाच आता फुटबॉल ‘फीव्हर’ चढलं होतं.

******

पौर्णिमेला जेव्हा सगळे जमले तेव्हा मॅचची संपूर्ण तयारी झाली होती. हरीण, अस्वल, वानरं, झेब्रे, गवे यांपकी प्रत्येक टीममध्ये २-२ मेम्बर, याप्रमाणे ‘मँगो’ आणि ‘स्ट्रॉबेरी’ अशा दोन टीम तयार झाल्या. राखीव खेळाडूही ठरले. कांगारू हे गोलकीपर ठरले होतेच. ‘मँगो’ टीमचा कर्णधार अस्वल होतं, तर ‘स्ट्रॉबेरी’ टीमचा झेब्राभाऊ. सगळ्या खेळाडूंची प्रॅक्टिसही दणक्यात झाली होती.

ससेमंडळींनी ग्राउंड तयार करण्याचं काम एकदम चोख बजावलं होतं. मॅचच्या दिवशी सकाळीच पावसाची जोरदार सर होऊन गेल्यामुळे मातीही थोडी ओलसर होती. अस्वल आणि वानरांनी ग्राउंडची सुरेख सजावट केली होती. नारळाच्या झाडाच्या झावळ्यांनी गोल बांधून तयार होते. खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी पक्षीमंडळींनी विविधरंगी रानफुलं वेचून ठेवली. विजेत्याला चषक म्हणून एक मोठा पुष्पगुच्छ आणि फळांचा करंडा तयार होता. काजवे झाडांमधून लुकलुकायला सज्ज होते. दोन काकाकुआ आणि दोन ससाणे ‘रेफ्री’ म्हणून नेमले गेले. कॉमेंट्रीची धुरा हत्तींनी सांभाळली.

खाण्यापिण्याचीही उत्तम व्यवस्था होती. ग्राउंडच्या एका कोपऱ्यात अस्वलांनी रानमेव्याचा ‘स्टॉल’ लावला होता. पानांचे द्रोण करून त्यामध्ये त्यांनी रानमेवा सुबक सजवला होता. रानफळांचे विविधरंगी ज्यूस वानरांनी तयार करून नारळाच्या करवंटय़ांमधून मांडले होते. मॅचच्या दिवशी दुपारपासूनच प्राणी-प्रेक्षकांचा ओघ ग्राउंडच्या दिशेने सुरू झाला. मॅचमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचं समर्थन करायला त्यांच्या कळपातली मंडळी तर होतीच; त्याचबरोबर जिराफ, सांबर, शहामृग अशा इतर अनेक प्राण्यांनी हजेरी लावून ग्राउंडभोवतालच्या खडक-दगडांवर आपापल्या आवडीच्या जागा ‘बुक’ केल्या. कुणी झाडांवर जागा निवडल्या. कासव, बेडूक, गेंडे, मगर नदीच्या काठाशी येऊन बसले. तिथेच बगळे, करकोचेही उभे होते. मासे थोडय़ा थोडय़ा वेळाने डोकावून पुन्हा पाण्यात जात होते.

थोडक्यात, मॅचचा झक्कास ‘माहौल’ बनला होता. दोन्ही टीमचे कर्णधार आणि इतर खेळाडू ग्राउंडवर आल्यावर पक्ष्यांनी फुलांचा वर्षांव करून त्यांचं स्वागत केलं. इतक्यात  एक मोठी डरकाळी सगळ्यांच्या कानावर पडली आणि एकच शांतता पसरली. सगळे जागच्या जागी स्तब्ध झाले. काही क्षणांतच वाघोबा तिथे अवतरले. पाठोपाठ कोल्हा, लांडगा, तरस ही त्यांची सेनाही होती. वाघोबांनी ग्राउंडला ऐटीत एक चक्कर मारली. एक उंच खडक निवडून त्यावर ते विराजमान झाले आणि जोरजोरात टाळ्या वाजवून खेळाडूंना प्रोत्साहन देऊ लागले. त्यांची सेनादेखील आजूबाजूला स्थानापन्न झाली.

हत्तीकाकांनी वाघोबांकडेच मॅच ‘किक्-ऑफ’ करण्याचा आग्रह धरला. त्यांनी पुन्हा एक डरकाळी फोडली आणि ग्राउंडवर येऊन एक जोरदार किक् दिली. सगळे खेळाडू एकमेकांना भिडले. टीम ‘मँगो’च्या कर्णधार अस्वलाने सुरुवातीलाच हरणाने केलेल्या पासला ‘हेड’ करत सुरेख गोल केला. प्रेक्षकांमधून चीत्कार-आरोळ्यांचे आवाज घुमले..

इकडे ग्राउंडवर सगळे खेळाडू भिडलेले असताना हत्तीकाका मात्र सगळ्या प्रेक्षकांच्या मागे उभे राहून शांतपणे मॅच पाहत होते. त्यांच्यावर वानरदादा स्वार होते.

‘‘वानरदादा, आजचा दिवस पाहायला मिळेल असं स्वप्नात तरी वाटलं होतं का?’’

‘‘छय़ा! पलीकडच्या जंगलातून तो क्रूर राजा सिंह काय आला आणि आपल्या नंदनवनात काही काळ अक्षरश: दहशत माजली होती. थोडय़ा दिवसांपूर्वी प्राणिसंग्रहालयातले लोक त्याला जायबंदी करून घेऊन गेले तेव्हा कुठे सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आपल्या सगळ्यांमधला एकोपाच ढळला होता त्याच्यामुळे! आणि आज पाहा. सगळे किती आनंदात आहेत. एकत्र आहेत.’’

‘‘हा एकोपाच तर पुन्हा परत आणण्याचा माझा ‘गोल’- म्हणजे ध्येय आहे, वानरदादा!’’ दोघे दिलखुलास हसले.

एवढय़ात ‘स्ट्रॉबेरी’ टीमचाही गोल झाला. आणि सगळे एकदम ओरडले.. ‘गोऽऽऽऽल’..

mokashiprachi@gmail.com

First Published on July 8, 2018 5:33 am

Web Title: loksatta lokrang marathi articles 27