|| तारा अकोलकर

‘‘हे काय शेखर, तू आज खेळायला नाही गेलास?’’ शेखरच्या आईने- सुजाताने शेखरला विचारले.

‘‘मी नाही खेळायला जाणार त्यांच्यात.’’ शेखर चिडून म्हणाला.

‘‘ते का म्हणून?’’ सुजाताने विचारले.

‘‘माझं आणि पक्याचं भांडण झालंय. त्याने मला सगळ्यांच्या देखत रडय़ा म्हणून चिडवलं!!’’

‘‘मग त्यात काय झालं? तू त्याला समजावून सांगायचंस ना, की असं बोलत जाऊ नकोस म्हणून.’

‘‘मी त्याच्याशी बोलणारच नाही. तो वाईट आहे. तो माझ्याशी नेहमीच भांडतो आणि चिडवतो.’’

‘‘शेखर, खेळातली भांडणं खेळातच ठेवायची असतात बरं का. मुकाटय़ाने तू भांडण विसर आणि त्यांच्यात खेळायला जा.’’ सुजाता म्हणाली.

सुजाताने इतकं समजावल्यावरही शेखर त्या दिवशी एकटाच घरी बसून होता.  मित्रांशी खेळायला न गेल्या कारणाने त्याचा चेहरा कोमेजून गेला होता. खिडकीच्या समोरच मैदान होते आणि शेखरच्या मित्रांचा खेळ अगदी मस्त रंगात आला होता. अधूनमधून ते शेखरकडे पहात होते. क्षणभर भांडण विसरून त्यांच्यात खेळायला जावं असंही शेखरला वाटत होतं, पण त्याचे भांडकुदळ मन म्हणे, ‘नको. नको. ते तुला चिडवतील, तुझी टिंगल करतील, तुला हसतील.’’ तर दुसरे प्रेमळ मन म्हणे, ‘आई म्हणते तेच बरोबर आहे बरं का. खेळातली भांडणं खेळातच ठेवायची असतात.’

पण त्या दिवशी सगळ्यांनी रडय़ा, रडय़ा म्हणून टिंगल का केली? आणि वर फिदीफिदी हसलेदेखील. छे! छे! मी मुळीच नाही जाणार त्यांच्यात खेळायला, कधीच नाही. शेखरच्या मनात समोर मुलांचा खेळ पाहता पाहता द्वंद्व चालू होतं. त्या दिवसापासून शेखर मात्र एकटा पडला. तेव्हापासून तो घरात एकटाच बसून राही. या खोलीत जा, त्या खोलीत जा, मध्येच कोपऱ्यात पडलेल्या बॉलला किक मार, तर मध्येच गॅलरीत उभं राहून समोरचा खेळ बघत बस.. असे रिकामटेकडे उद्योग  चालू होते. आज कधी नव्हे ते शेखरच्या बाबांच्याही हे लक्षात आलं आणि त्यांनी शेखरला विचारलं, ‘‘हे काय शेखर, तू आजकाल संध्याकाळचा घरी का असतोस? ग्राऊंडवर खेळायला का जात नाहीस?’’ तेव्हा हसत हसत सुजाता म्हणाली, ‘‘त्याचं आणि त्याच्या मित्राचं भांडण झालंय. ते सगळे त्याला रडय़ा, रडय़ा म्हणून चिडवतात.’’

‘‘एवढंच ना? आणि खेळायचं सोडून भांडायचं कशाला? शेखर, मुकाटय़ाने खेळायला जायचं. उगीच भांडत बसायचं नाही.’’ बाबा शेखरला रागावून म्हणाले, पण शेखर तसाच गप्प उभा होता.

शेखर खेळायला येत नसल्यामुळे त्याच्या मित्रमंडळींनादेखील चैन पडत नव्हते. एके दिवशी सर्व मुलं शेखरकडे आली आणि त्याची समजूत काढू लागली.

पक्या म्हणाला, ‘‘इतकं काय झालं रागवायला! चल ना खेळायला.’’

‘‘मी येणार नाही. मी तुझ्याशी तर अजिबात बोलणार नाही,’’ असं म्हणून शेखरने पक्याला जोरात ढकलून दिले. शेखरचं हे वागणं कुणालाच आवडलं नाही. बिचारी मुलं खाली मान घालून निघून गेली. शेखरचं हे वागणं घरामध्ये कुणालाच पसंत नव्हतं.

आई म्हणायची, ‘‘शेखर, हा तुझा वाईट स्वभाव सोडून दे. त्यामुळे तुझं नुकसान होतंय. तू कोणाशी बोलत नाहीस हे चांगलं नाही. अशामुळे तुझ्याशी कुणीही खेळणार नाही बरं!’’ पण शेखरमध्ये कोणतीच सुधारणा होत नव्हती. शेखरचे मित्र आणि शेखर एकाच शाळेतले; पण तिथेही शेखर असाच तुसडेपणाने वागे. सगळ्यांशी त्याने अबोला धरला होता. आता मात्र शेखरचा नाद सगळ्यांनी सोडून दिला होता. शेखरलासुद्धा एकटं एकटं वाटत होतं, पण शेखर बदलायला तयार नव्हता. खिडकीत बघून खेळ पाहाणं हा त्याच्या सवयीचा भाग झाला होता.

पण त्या दिवशी संध्याकाळी समोरच्या मैदानावर शुकशुकाट होता. कुणीच खेळावयास आले नव्हते. शेखरच्या हे ताबडतोब लक्षात आले. दुरून का होईना तो इतके दिवस सगळ्यांना पाहू शकत होता; पण आज मैदानावर कुणीच कसं नव्हतं, हे पाहून शेखरचा विरस झाला. दुरून का होईना, शेखरला मित्रांचा सहवास हवाहवासा वाटत होता. तो आपल्या मित्रांपासून शरीराने दूर होता, पण मनाने नव्हता. त्याचे त्याच्या मित्रांवर खरे प्रेम होते, पण ते त्याला उमगले नव्हते.

त्याच दिवशी रात्री जेवताना अचानक सुजाताची मैत्रीण ऊर्मिलाचा फोन आला. ती सांगू लागली, ‘‘अगं सुजाता, रजनीच्या पक्याला अ‍ॅक्सिडेंट झालाय. त्याचा पाय मोडलाय म्हणे.’’

‘‘काय सांगतेस काय? कधी आणि कसा झाला?’’

‘‘संध्याकाळी मैदानावरून खेळ आटोपून तो सायकलवरून घरी येत असताना, त्याला कारने उडवलं. हॉस्पिटलमध्ये आहे तो.’’

‘‘बाप रे, बातमी ऐकून मी बेचैन झालेय गं?’’ सुजाता घाबरून म्हणाली.

फोन खाली ठेवताच सगळ्यांनी विचारलं, ‘‘कुणाला काय झालं?’’

‘‘पक्याचा अ‍ॅक्सिडेंट झाला आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे.’’

शेखरने ही बातमी ऐकली मात्र आणि तो ढसाढसा रडू लागला आणि आईला म्हणाला, ‘‘आई, पक्या बरा होईल ना गं? आत्ताच्या आत्ता आपण त्याला बघायला जायचं?’’

‘‘शेखर, धीर धर जरा. मी त्याच्या घरी फोन करून चौकशी करते आणि मग आपण काय ते ठरवू!’’ आई म्हणाली.

तरीसुद्धा शेखर मुसमुसून रडत होता. खरं म्हणजे अंतर्यामी पक्याबद्दल वाटणारं प्रेम आता अश्रूंवाटे बाहेर पडत होते. पक्या फार मोठय़ा संकटातून वाचला होता; पण पूर्ण बरा होण्यास काही काळ जावा लागणार होता. आपण पक्याच्या घरी गेलो की वाईट वागल्याबद्दल पक्याची माफी मागायची, असे शेखरने कधीच ठरवून टाकले होते. शेखर लगेचच आईबरोबर पक्याला भेटावयास गेला. शेखरला पहाताच पक्याच्या चेहरा आनंदाने उजळून निघाला; पण शेखरला मात्र रडूच कोसळले. रडता रडता तो पक्याला म्हणाला, ‘‘कसा आहेस तू? रागावलास माझ्यावर मी तुझ्याशी वाईट वागलो म्हणून?’’ आणि शेखर पुन्हा रडू लागला.

‘‘नाही रे. मी तुझ्यावर कधीच रागावलो नव्हतो.’’

‘‘मी बरा झालो ना की आपण क्रिकेट खेळायचं बरं का?’’ पक्या क्षीण आवाजात बोलत होता. शेखर पक्याला भेटून आला त्या दिवसापासून शेखर मात्र पूर्ण बदलला. आपणच निर्माण केलेल्या एका मोठय़ा समस्येतून सुखरूप बाहेर पडल्यासारखे त्याला वाटले. भांडणामुळे गुंतलेले धागे आज तटातट तुटून पडले.

‘‘आई, पक्या बरा होईपर्यंत मी दररोज त्याला भेटायला जाईन. जाऊ ना आई?’’ शेखर आनंदाने म्हणाला.

‘‘जरूर जा, त्यालाही बरं वाटेल.’’ आणि शेखरला प्रेमाने जवळ घेत सुजाता म्हणाली, ‘‘शेखर, मी तुला एक जादूचा मंत्र देते. तो तुझ्याजवळ जपून ठेव. अल्लाउद्दीनच्या दिव्याप्रमाणे तो मंत्र तुला नेहमीच मार्गदर्शन करील.’’

‘‘तो कोणता आई?’’ शेखरने उत्सुकतेने विचारले.

‘‘‘गोड बोलुनि सकलां आपुले करावे!’ हाच तो मंत्र.’’ आणि आई म्हणाली, ‘‘जो भांडतो तो दुरावतो, पण प्रेमाने वागणाऱ्याला जग नेहमीच जवळ करते. शेखर, होशील ना तू सगळ्यांचा चांगला मित्र? वागशील ना सगळ्यांशी प्रेमाने?’’ आईचे ते प्रेमळ हृदयस्पशी शब्द अंत:करणात साठवत शेखर आईला आणखीनच बिलगला आणि न बोलताच होकार दिला.

त्या दिवसापासून शेखर सगळ्यांचा खराखुरा मित्र झाला.