|| डॉ. नंदा हरम
मला वाटतं, तुम्हीही कधी ना कधी याचा अवलंब केला असेल ना? याच धोरणाचा वापर करतो- अकॅथेफायरा पोरपोरिआ नावाचा कोळंबी मासा- जो खोल समुद्रात आढळतो. खोल म्हणजे किती तर समुद्रात १००० मीटर खोल. या कोळंबीवर हल्ला करतो व्हायपर फिश. गंमत म्हणजे हे दोघेही जैविक प्रकाश उत्पन्न करतात. आता म्हणाल, जैविक प्रकाश म्हणजे काय? तुम्हाला काजवा माहीत असेल. काजवा जो प्रकाश देतो, तोही जैविक प्रकाशच. जैविक प्रकाशाकरिता लागणारी रसायनं या प्राण्यांजवळ असतात. थोडक्यात, ही रासायनिक अभिक्रिया आहे, ज्यात प्रकाश उत्पन्न होतो. हे प्राणी हा प्रकाश का उत्पन्न करतात? तर अन्न मिळविण्यासाठी, स्वत:चं संरक्षण करण्यासाठी, प्रजोत्पादन करण्याकरिता, जोडीदार शोधण्याकरिता, एकमेकांमध्ये संदेशांची देवाणघेवाण करण्याकरिता.
व्हायपर फिश तासन् तास पाण्यात हालचालीशिवाय राहू शकतो. हे नाटक कशाकरिता? तर भक्ष्य मिळविण्याकरिता. समोर भक्ष्य आलं की त्याच्या मोठय़ा दातांतून त्याची सुटका होणेच कठीण! तर असाच हल्ला तो या विशिष्ट कोळंबीवर करतो. त्याच्यापुढे याची काय डाळ शिजणार? म्हणूनच तो प्रकाशाची उलटीच करतो म्हणाना! जैविक प्रकाश देणारी रसायनं तो त्याच्या समोर पाण्यात टाकतो, ज्यातून प्रकाशाचा लोळ उत्पन्न होतो. त्याच्यामुळे व्हायपर फिश गोंधळून जातो आणि ही कोळंबी मात्र मागच्या मागे पळ काढते. काही जणांचं म्हणणं आहे की, या प्रकाशामुळे दुसरे मोठे भक्षक तिथे आकर्षति होतात, जे व्हायपर फिशवर हल्ला करू शकतात. सिद्धांत काहीही असो, कोळंबी मात्र जीव घेऊन सुखरूप पसार होतो. अगदी म्हणीमध्ये सांगितल्यासारखा!
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 7, 2019 12:02 am