|| सुचित्रा साठे

‘‘अगदी दगड आहेस हं तू राहुल,’’ असं म्हणत ओंकारने चिडून सोंगटय़ा गोळा करत कॅरम उचलला. त्याने ‘हात’चलाखी दाखवण्याआधीच राहुलने सूर लावला.

PM Narendra Modi Singing Kisi Ke Muskarahto Me
“यारो हम अमिर है”, म्हणत नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? इतर AI Videos पेक्षा ही क्लिप व्हायरल होण्याचं कारण असं की..
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Mayank reveals Ishant and Navdeep advised for IPL 2024
IPL 2024 : ‘वेगाशी तडजोड नाही…’, इशांत-नवदीपने मयंक यादवला दिला महत्त्वाचा सल्ला, वेगवान गोलंदाजाने केला खुलासा
pune crime news, son beats mother pune marathi news,
मुलाकडून आईला बेदम मारहाण… घर नावावर करून देत नसल्याने डोक्यात मारली खूर्ची

‘‘आजी, हा बघ ना मला दगड म्हणतो.’’

‘‘अरे म्हणू दे ना, दगडही चांगला असतो.’’ आजीने असं म्हणताच राहुलचे डोळे चमकले. त्यांच्या डोळ्यात बघत आजीनं विचारलं.

‘‘तू काल कुठली गोष्ट सांगितलीस? त्यात काय होतं आठव बरं.’’

गोष्ट म्हणताच राहुलचा चेहरा उजळला. डोळे पुसत तो म्हणाला, ‘‘तहानलेल्या कावळ्याची गोष्ट. माठ अर्धवट भरलेला होता. मग कावळेदादाने युक्ती केली. आजूबाजूचे दगड उचलून पाण्यात टाकले. पाणी वर आले आणि ते पिऊन त्याची तहान भागली.’’ दगड किती उपयोगी हे राहुलला तंतोतंत पटले. एव्हाना तिथे जमलेल्या सगळ्याच मित्रमंडळींच्या मनात ‘दगड’ शब्द घुसला.

‘‘दगड काय टणक असतो नाही?’’ मुक्ताने पटकन् गुणधर्म सांगून टाकला.

‘‘आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग असा घट्ट, टणक आहे म्हणून आपण त्यावर स्थिर उभे राहू शकतो. यामध्ये दागडांचा मोठा वाटा आहे. सर्वसाधारणपणे काळसर रंगाचा नैसर्गिक स्वरूपात सगळीकडे आढळणारा घनपदार्थ म्हणजे दगड. बरोबर ना!’’ असं विचारत आजीने पुस्ती जोडली. ‘‘आपण म्हणतो ना, कणखर देशा, पवित्र देशा, दगडांच्या देशा. ज्याच्याविषयी आपल्याला अभिमान वाटतो तो काळ्या दगडांनी बनलेला, ताठ मानेने उभा असलेला सह्य़ाद्री आपल्याजवळ आहे. शिवाय अनेक गिरिदुर्ग आहेत. त्याच्याविषयी भूगोलात वाचलंत ना मुक्ता?’’

‘‘हो ना आजी, अशाच पर्वतांमध्ये वळणावळणाचे रस्ते तयार केले जातात. डोंगर पोखरून बोगदा केला जातो. तेव्हा त्या बोगद्यातून आपण पलीकडे जाऊ शकतो. अशा घाटातून जाताना एकीकडे उंच दगडी पर्वताचा कडा आणि दुसरीकडे खोल दरी दिसते. या दगडांची झीज होत असते. त्यामुळे ते घसरून पडू शकतात. तसे अपघात होऊ नयेत म्हणून या दगडांवर भक्कम लोखंडी जाळी ठोकलेली असते. पुण्याला जाताना मी नेहमी बघते. खरं तर घाट संपेपर्यंत मला खूप भीती वाटते. अवघड वळण आलं की मी चक्क डोळे मिटून घेते.’’ मुक्ताने या क्षणीही डोळे मिटून घेतले.

ओंकारने ‘भित्री भागुबाई’ म्हणत चिडविण्याची संधी साधली. त्याचबरोबर महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं.

‘‘आजी, महामार्गावर रस्त्याच्या कडेला ठरावीक अंतरावर पिवळ्या काळ्या रंगात रंगवलेले साधारण एक दीड फूट उंचीचे दगड असतात. त्यावर ‘अंतर’ दाखवणारे आकडे असतात. माझं सगळं लक्ष तिथे शून्य कि. मी. केव्हा होईल याकडे लागलेलं असतं. आता किती अंतर राहील, अजून किती वेळ लागेल याचं गणित मी मनात सतत सोडवत राहतो. प्रवास संपल्यावर ‘दगडा’ला धन्यवादसुद्धा देतो’’ ओंकारच्या मनातला भाव कळल्यामुळे सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू उमटले.

‘‘या दगडांचा रस्ते, घरं, पूल अशा बांधकामांत खूप उपयोग होतो. रामायणात असाच दगडांचा सेतू बांधून त्यावरून सगळी वानरसेना श्रीलंकेत गेली होती ना गं,’’ वैभवने भावी इंजिनीअरने शब्दांचा पूल बांधला.

‘‘याच दगडातून देवदेवतांच्या सुंदर मूर्ती, शिल्प तयार केली जातात. अजिंठा वेरुळची लेणी मी पाहिली आहेत. काळोखात कसं काम केलं असेल याचा मला प्रश्नच पडतो. वर्तमानपत्रात भग्न मूर्ती सापडल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. त्या दगडांच्या होत्या म्हणूनच टिकल्या असतील, नाही का गं?’’ रतीनेही थोडी लुडबुड केली.

‘‘जेव्हा छपाईच्या कलेचा शोध लागला नव्हता, तेव्हा दगडावरच माहिती कोरून ठेवली जात असे. असे शिलालेख संग्रहालयात बघायला मिळतात.  कन्याकुमारीला समुद्रात चार एकर दगडावर विवेकानंद स्मारक उभे आहे. रस्त्यात एखाद्या झाडाखाली दगडाला शेंदूर फासून ‘देव’ म्हणून पूजा केलेली आढळते. रत्नागिरीत कोतवडय़ाला श्रीदेव धामणेश्वर मंदिर आहे. हे पायापासून घुमटापर्यंत जांभ्या रंगाच्या विशाल दगडांच्या चिरा एकावर एक रचून बांधण्यात आले आहे. चारशे-साडेचारचे वर्षांपूर्वी रस्ते, वाहतुकीची कोणतीही साधनं नसताना दहा-बारा माणसांनी उचलण्याजोग्या वजनदार चिरा उचलून बांधलेले हे मंदिर म्हणजे पेशव्यांच्या समृद्ध इतिहासाच्या पाऊलखुणाच आहेत.’’

‘‘आजी, आपण बेळगावला गेलो होतो तेव्हा तिथे कपडे धुवायला बादलीच्या ऐवजी अंडाकृती दगडी टब होता ना गं आणि बाजूला चौकोनी दगड. त्या दगडी टबाला भोक होतं. त्यात कपडय़ाचा बोळा कोंबून पाणी साठवलं जायचं. मजाच वाटली मला.’’ रतीला आठवल्याचा आनंद झाला.

‘‘हो, त्याला ‘डोण’ म्हटलं जायचं. शिवाय बाजूला दगडांनीच बांधलेली विहीर होती. नाणेघाटातील घाटघर येथे संपूर्ण दगडात कोरलेला भला मोठा रांजण अजूनही अस्तित्वात आहे. अवघड घाट चढून आल्यावर या घाटाचे शुल्क म्हणून त्या रांजणात नाणी टाकत असत. म्हणूनच तब्बल २२२४ वर्षांपूर्वीचा आद्य शिलालेख इथेच आहे. मिक्सर येण्यापूर्वी आपल्या घरातसुद्धा पाटा वरवंटा, खलबत्ता, जातं अशा दगडी वस्तूंचा वापर केला जात असे. खास करून मिठासाठी दगडी सटही असायचे.’’ छोटय़ा राहुलला ‘दगड’ प्रकरण मोठं आहे हे जाणंवलं. म्हणून त्याला छोटे दगड आठवले. ‘‘‘गौरी’ म्हणून सात छोटय़ा दगडांचीच पूजा आपण करतो ना गं,’’ असं सांगताना त्याला जरा हायसं वाटलं. त्यातच गुरफटून तो पुढं म्हणाला, ‘‘आजी आम्ही खेळतो ना तेव्हा छोटे दगड गोळा करतो. मग वजन म्हणून किंवा नाणी म्हणून त्याचा उपयोग करतो. शिवाय ‘दगड का माती’ हा खेळही खेळतो.’’ रोजच्या संपर्कातला हा दगड त्याला ओळखीचा वाटला.

‘‘आणि एक गंमत सांगू का? मनुष्य रांगत, सरपटत किंवा जेमतेम उभा राहून आतमध्ये जाऊ शकेल अशा डोंगरातील नैसर्गिक फटीला किंवा बोगद्यासारख्या मोठय़ा भोकाला विवर, घळ किंवा गुंफा म्हणतात. दारं-खिडक्या काही नाहीत फक्त सगळीकडे दगड. अशा अनेक घळींपैकी शिवथर घळीत समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ लिहिला. कसा लिहिला असेल नुसती कल्पना तरी करून बघा. दोन मिनिटं दिवे गेले तर तुम्ही बेचैन होता. खरं ना!’’ सर्वानी हळूच माना हलवल्या. शिवथर घळीत आजीने नेलं तर कसं व्हायचं, हे प्रश्नचिन्हं त्यांच्या नजरेत उमटलं.

विषयाला धरून ठेवत मुक्ता म्हणाली, ‘‘आजी, इथल्या समोरच्या बागेत मुद्दाम चालण्यासाठी म्हणून गोल दगडांचा मार्ग तयार केला आहे. सहजपणे पायाच्या तळव्यावर दाब पडून बरं वाटतं, असे बरेचजण म्हणत असतात.’’

‘‘लोखंडाचं सोनं करणारा परीस किंवा सोन्याचा कस बघणारा एक दगडच असतो. शेतकरी पिकांवर बसणाऱ्या पक्ष्यांना उडवून लावण्यासाठी गोफण फिरवतात ना त्यात दगडच असतो. शिवाय झाडावरच्या कैऱ्या, चिंचा पाडायला तोच दगड हातात घ्यावा लागतो. कधी कधी कुत्री ओरडत बसतात, नाहीतर अंगावर येतात तेव्हा नाइलाजाने दगड मारावा लागतो.’’ वैभवने दगडाचा चांगला शोध घेतला.

‘‘‘खायला कोंडा आणि निजायला धोंडा’ अशी म्हण आहे. शिवाय एका दगडात दोन पक्षी, काळ्या दगडावरची रेघ असे वाक् प्रचार आपण सर्रास वापरतो. एखादी लक्षणीय घटना किंवा कृती ‘मैलाचा दगड’ म्हणून नोंदवली जाते. सूडबुद्धीने मारलेला एखादा दगड जीवही घेऊ शकतो. ठिकऱ्या, लगोरी असे अंगणातले खेळ आता मागं पडत चालले आहेत. दगड हा मोठा विषय आहे आणि त्याचा अभ्यास तुम्ही सर्वानी पुढे करायचाय. तसं नाही केलं तर दगडं फोडत बसावं लागेल बरं का.’’

सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव उमटले. राहुलला मात्र आपण ‘दगड’ म्हणजे खूप मोठं काहीतरी असल्यासारखं वाटलं. ‘खरंच दगड रे बाबा तू’ म्हणत आजीने त्याचा गालगुच्चा घेतला.

suchitrasathe52@gmail.com