News Flash

तू सुखकर्ता..

‘‘यंदा गणपतीचा काय प्लॅन?’’ राहुल छत्री बंद करत म्हणाला.

|| प्राची मोकाशी

साधारण महिन्याभरापूर्वीची गोष्ट..

‘‘यंदा गणपतीचा काय प्लॅन?’’ राहुल छत्री बंद करत म्हणाला.

‘वरद वसाहती’मधल्या मुलांच्या कल्चरल कमिटीचे छोटे सदस्य गणपतीच्या तयारीचा प्लॅन करण्यासाठी भेटले होते. दहाएक बिल्डिंगची सोसायटी. इथली सर्व वयोगटांतील मुलं दरवर्षी अगदी उत्साहाने गणेशोत्सव साजरी करायची. सगळी मुलं सोसायटीच्या ‘कम्युनिटी हॉल’मध्ये जमली होती, जिथे अनेक लहान-मोठे सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा व्हायच्या. सोसायटीच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठाही तिथेच व्हायची.

निशा आणि रिया आधीच आल्या होत्या. सर्वाना वृषालीताईने भेटायला बोलावलं होतं. तीही कॉलेजमधून आली. पण त्यांच्या म्होरक्याचा- ओंकारचा अजून काही पत्ता नव्हता. थोडय़ा वेळाने हॉलच्या दिशेने त्यांना ओंकार येताना दिसला.

‘‘इतक्या उशिरा स्वारी कुठून येतेय? तेही सायकलवरून? एवढय़ा पावसाची?’’ वृषालीताईने विचारलं.

‘‘तबल्याचा क्लास. आज जरा जास्तच वेळ होता. आमचा कार्यक्रम आहे नं गणपतीत!’’ ओंकारने सायकल स्टँडला लावली. डोक्यावरून रेनकोटची टोपी मागे केली. रुमालाने चेहरा पुसला आणि भिजायला नको म्हणून रेनकोटमध्ये ठेवलेली पिशवी बाहेर काढली.

‘‘पण आपल्या गणपतीचं काय? ओंकार, काय ठरलं काल मुख्य कमिटीच्या मीटिंगमध्ये?’’ रियाने उत्सुकतेने विचारलं.

‘‘बातमी चांगली नाहीये! या वर्षी ‘नो गणपती’असं मुख्य कमिटीमध्ये ठरलंय.’’ हे सांगताना ओंकारचा चेहरा पडला होता.

‘‘पण का?’’ निशा कुरकुरली.

‘‘आठवतोय नं गेल्या वर्षीचा प्रकार? गणपती विसर्जनाच्या वेळी रात्री खूप उशीर झाला (अर्थात तो त्यांच्यामुळेच झाला) म्हणून यशदादा अँड कंपनीने सोसायटीबाहेरच्या वडापाववाल्याकडे वडापाव आणि चहा घेतला आणि त्याचं बिल गणपतीच्या खर्चात लावलं. सोसायटीतल्या बऱ्याच लोकांना ते खटकलं आणि जाम मोठा वाद झाला होता, विसरलात? सक्र्युलर फिरलं, पत्रव्यवहार झाले, भांडणं झाली. आता गट पडलेत सोसायटीमध्ये. मग कसा करायचा गणेशोत्सव?’’ ओंकारने आठवण करून दिली.

‘‘असं कितीसं बिल असेल ते? एवढय़ाशा कारणावरून इतकं कसलं भांडण?’’ रियाचा प्रश्न.

‘‘कारण त्यांचं खरोखरच चुकलं! प्रश्न तत्त्वाचा आहे. मी यशला तसं म्हणालेही होते, पण तोही मान्य करायला तयार नव्हता पठ्ठय़ा! फोन केला तरी आलाय कुठे आज?’’ वृषालीताई चिडून म्हणाली.

‘‘बरोबर की चूक हा मुद्दाच नाहीये. वाद होतात म्हणून तेव्हापासून नवरात्रामधला दांडिया, कोजागिरीचं एकत्रित जेवण, न्यू ईयरची फन-फेअर काहीच झालं नाहीये. पण या वेळी नाही. गणपती उत्सव झालाच पाहिजे!’’

ओंकार ठाम होता. त्याच्या म्हणण्याला सगळ्यांनी दुजोरा दिला. ओंकारने लगेच त्याच्या तबल्याची वही आणि पेन पिशवीतून काढलं आणि वहीचं शेवटचं पान उघडलं. ओंकारच्या डोक्यात नेहमीप्रमाणे काहीतरी शिजतंय हे सर्वानीच ओळखलं.

‘‘कल्चरल कमिटीच्या फंडातून गणपती करायचा तर.. दरवर्षी गणपतीची मूर्ती कालेलकरकाकांच्या देणगीतून येते. पण त्यांनीच तर पहिला विरोध दर्शवला होता गेल्या वर्षीच्या प्रकाराला! त्यामुळे यंदा त्यांच्याकडून मूर्तीची देणगी आणि वर्गणी- दोन्हीची काहीच शक्यता नाहीये. तसंच या वेळी प्रत्येक घरातून वर्गणी मिळण्याचीही खात्री नाहीये. फार तर फार कल्चरल कमिटी फंडाच्या शिल्लक पशांमधून आरास, लायटिंग होऊ शकतं.’’ ओंकार पटापट लिहीत होता.

‘‘मग मूर्ती?’’ निशाचा प्रश्न.

‘‘आपण आपापसात काँट्रिब्युशन काढलं तर?’’ वृषालीताईने एक मार्ग सुचवला. सगळ्यांना तो लगेचच पटला आणि त्याबद्दल घरी बोलून घ्यायचं ठरलं.

‘‘आणि आरास? दरवर्षी काका किती सुंदर आणि वेगळी आरास करतात. एकदा त्याचा फोटोही आला होता पेपरात!’’ रिया म्हणाली.

‘‘यंदा आपणच मॅनेज करू या! राहुल, तू तर ड्रॉइंग-क्राफ्टचा एक्स्पर्ट आहेस, यंदाची आरास तू कर! आम्ही मदतीला आहोतच.’’- इति ओंकार. राहुलने होकारार्थी मान डोलावली.

‘‘पण मग बस, मिरवणूक?’’ राहुलचा प्रश्न.

‘‘ते महत्त्वाचं नाहीये. यंदा कुणाच्या तरी गाडीतूनच जमवू या.’’ ओंकारने सुचवलं.

‘‘हे काय रे! गणपती आणायचा आणि मिरवणूक नाही?’’ निशा कुरकुरली.

‘‘टिळकांनी सार्वजनिक गणपती हा काही मिरवणूक किंवा डीजेकरिता सुरू केला नव्हता. सगळ्या भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र यावं हा त्यांचा हेतू होता. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने निदान आपली सोसायटी जरी पुन्हा एकत्र आली तरी गणराया पावला म्हणायचा!’’ ओंकार हॉलच्या एका भिंतीवर लावलेल्या गणपतीच्या तसबिरीकडे बघत म्हणाला. एवढय़ात जोराने वीज चमकली.

‘‘ओंकार, गणपतीलाही पटलं तुझं म्हणणं!’’  राहुल आकाशाकडे बोट दाखवत म्हणाला. यावर सगळे हसले.

‘‘पण मग दरवर्षीच्या स्पर्धा, कार्यक्रम?’’ रियाचा प्रश्न.

‘‘यंदा त्यांना..’’ ओंकार बोलू लागला.

तेवढय़ात निशा म्हणाली, ‘‘ए ओंकार, ते तरी करू या.. नाहीतर काय मजा?’’

‘‘ओक्के! किती पसे उरतात त्यावर ठरवू. सध्या प्लॅिनग तर करून ठेवू या..’’ ओंकार म्हणाला.

‘‘गणपती पाच दिवस आहेत. पहिल्या दिवशी महाआरती आणि महाप्रसाद.’’ वृषालीताईने सुचवलं.

‘‘दुसऱ्या दिवशी वक्तृत्व, रांगोळी आणि पाककला स्पर्धा. तिसऱ्या दिवशी गायन, हस्ताक्षर आणि चित्रकला स्पर्धा..’’ रिया सुचवत होती आणि ओंकार पटापट वहीत मुद्दे लिहीत होता.

‘‘पाचव्या दिवशी विसर्जनच आहे! तरी चौथा दिवस अजून मोकळा आहे. तिथे काय कार्यक्रम ठेवावा?’’ ओंकार विचार करत होता.

‘‘आपणच मिळून काहीतरी ‘रंगारंग’ कार्यक्रम सादर करू.’’ वृषालीताई म्हणाली.

‘‘खरं तर दरवर्षी आपण बाहेरून कलाकार बोलवून क्लासिकल, नाटय़संगीत, ऑर्केस्ट्रा वगरेचा एखादा कार्यक्रमपण करतो. यंदा आपण सोसायटीतल्या मुलांना घेऊनच कार्यक्रम करू, आपल्याला जमेल तसा. आपल्या सोसायटीत अनेक छुपे कलाकार आहेतच की! म्हणजे खर्चाचाही प्रश्न नाही.

‘‘रिया, सोसायटीमधल्या अशा वातावरणात आणि वर्गणीच्या अभावी आपण ठरवलं एवढं झालं तरी खूप आहे. हा विषय पुन्हा एकदा आपल्याला मुख्य कमिटीकडेही मांडला पाहिजे! त्यांना आधी पटायला हवं. मग गणेशोत्सवाची नोटीस लागल्यावर पाहू पुढे कसं होतंय. पण गणपती उत्सव साजरा करायचा हे मात्र नक्कीये नं?’’ ओंकारच्या या प्रश्नावर सगळ्यांच्या ‘येस्सऽऽऽ’च्या आरोळ्यांनी शिक्कामोर्तब झाले. सगळे हॉलमधून बाहेर पडले तेव्हा पावसाने चांगलाच जोर धरला होता.

पुढचे पंधरा दिवस कुणी कुणाला भेटू शकलं नाही की गणपतीसाठीची कसलीच ठरवाठरवी करू शकलं नाही. कारण पावसाने संपूर्ण शहराला झोडपून काढलं होतं. संततधार पावसामुळे वरद सोसायटीमध्येही भरपूर पाणी साचलं. गाडय़ा, टू-व्हीलर, सायकली पाण्याखाली गेल्या. कम्युनिटी हॉलमध्येही पाणी शिरलं. काही दिवस वीज नव्हती, कारण मीटर पाण्यात बुडाले होते. टाक्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे पिण्याचं स्वच्छ पाणीही मिळेना. तळमजल्यावरच्या घरांतून पाणी गेल्यामुळे तिथे राहणाऱ्या बिऱ्हाडांनी वरच्या मजल्यांवर राहणाऱ्या लोकांकडे आश्रय घेतला. सगळेच एकमेकांना समजून घेत होते, मदत करत होते..

आता वरद सोसायटी खऱ्या अर्थाने एकत्र आली होती. पाणी ओसरल्यानंतर सगळ्यांनी कंबर कसली. पाण्याबरोबर आलेल्या कचऱ्यामुळे रया गेलेली सोसायटी स्वच्छ केली. कम्युनिटी हॉल साफ केला. टाक्या धुतल्या. आता वीज आली, पाणी मिळालं. सोसायटी हळूहळू पूर्ववत झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांची मनंदेखील पूर्ववत झाली. हेवेदावे मिटले. मनातल्या विचारांचं डबकं वाहतं झालं..

गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी..

‘‘ओंकार, बसवाल्या काकांचा फोन झालाय. तो बरोब्बर सकाळी आठ वाजता गेटपाशी येईल. हॉलच्या नोटीस बोर्डावर आजच लिहून ठेवतो, म्हणजे ज्यांना गणपती आणायला यायचं असेल ते वेळीच हजर असतील.’’ – इति राहुल. ओंकारने एकीकडे पसे मोजत राहुलला ‘थम्स-अप’ केलं.

‘‘काय मज्जा येते नं असं एकत्र गणपती उत्सव साजरा करायला!’’ रिया निशाला म्हणाली. दोघी जवळच तयार झालेल्या हिमालयाच्या प्रतिकृतीला ‘टच-अप’ करत होत्या. यंदाची आरास एकदम झक्क जमली होती. कालेलकरकाकांनी हिमालय तयार केला होता- जो राहुलने सुबकपणे रंगवला होता. बाकीच्यांनीही लागेल तशी मदत केली होती. लायटिंग, पताकांनी कम्युनिटी हॉल सुरेख सजला होता.

एवढय़ात वृषालीताई, यशदादा आणि कालेलकरकाका तिथे आले.

‘‘काका, फायनली सगळ्यांकडून वर्गणी आलीये.’’ ओंकार हातातली शेवटची नोट मोजून डब्यात व्यवस्थित ठेवत म्हणाला. मग त्याने एक पाकीट कालेलकरकाकांना दिलं. काकांनी ते यशदादाच्या हातात दिलं.

‘‘यश, गेले काही दिवस आपण पूर आलेल्या ठिकाणच्या बातम्या सतत पाहतोय, ऐकतोय. पंधरा-वीस दिवसांमध्ये झालेल्या आपल्या अवस्थेवरून कल्पना येते की तिथे काय परिस्थिती असेल त्याची. आणि म्हणूनच सर्वाच्या संमतीने आपल्या गणेशोत्सवासाठी जमलेल्या वर्गणीतली अर्धी रक्कम सोसायटीने तुझ्या कॉलेजच्या युथक्लबला पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यायचं ठरवलंय. तिचा योग्य पद्धतीने उपयोग होईल हा आमचा विश्वास आहे.’’ कालेलकरकाका यशदादाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.

‘‘काका, डोंट वरी. गेल्या वर्षीच्या गणपतीत झालेली चूक आमच्या लक्षात आलीये. मोठय़ांचं अनुकरण लहान करत असतात हे आम्ही विसरलो. पुन्हा तसं कधीच होणार नाही. आमच्यावर इतका विश्वास दाखवल्याबद्दल ‘थँक यू’!’’ यशदादाने विनम्रपणे पाकीट घेतलं.

‘‘खरं ‘थँक यू’ ओंकार आणि त्याच्या टीमला म्हणायला हवं. गणेशोत्सव साजरा करायचा त्यांचा इरादा एकदम पक्का होता. सगळे जबाबदारीने वागले. म्हणून खंड न पडता या वर्षीचा गणपतीही होऊ शकतोय. आणि देणगी देण्याची कल्पनाही त्यांचीच होती. आधी तर गणपतीच आणणार नव्हते, पण आता वर्गणी जमली तरी कुठलाही मोठा कार्यक्रम न करता पूरग्रस्तांना देणगी देण्याचा तुमचा विचार अगदी स्तुत्य होता मुलांनो! ‘वुई आर प्राउड ऑफ यू!’’ काका कौतुकाने म्हणाले.

एवढय़ात साउंड सिस्टीम टेस्ट करताना ओंकारकडून गाणं लागलं..

‘तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता, तूच कर्ता आणि करविता, मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया..’

mokashiprachi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 12:02 am

Web Title: loksatta moral story for kids prachi mokashi mpg 94
Next Stories
1 एकच वाघ!
2 असा कसा हा ‘दगड’!
3 शिर सलामत तर पगडी पचास!
Just Now!
X