12 December 2018

News Flash

झटपट वरणभात

माझ्या छोटय़ा वाचक दोस्तांनो, सध्या तुमच्या घरातही परीक्षेचं वातावरण असेल..

माझ्या छोटय़ा वाचक दोस्तांनो, सध्या तुमच्या घरातही परीक्षेचं वातावरण असेल.. अभ्यास, टेन्शन आणि तहानभूक विसरून चाललेली परीक्षेची तयारी. पण खरं सांगू का, अगदी परीक्षेच्या काळातही पोटभर, पोषक आणि चविष्ट खायला मिळायलाच हवं. हं, कमीत कमी वेळात अधिकाधिक स्वादिष्ट जेवण मिळालं तर बहारच, नाही का?

या झटपट वरणभाताची कल्पना याच विचारातून आली. माझ्या महाविद्यालयीन काळामध्ये मी स्वतंत्र राहत असे. परीक्षेच्या काळामध्ये किंवा इतर वेळी गडबड-गोंधळ असला म्हणजे जेवण करायला पुरेसा वेळच मिळायचा नाही. कधी कधी तर अगदी सोपी खिचडी करायलाही जीवावर यायचं. मग अशा वेळी परिपूर्ण आहाराची काळजी कशी घ्यायची, असं मनात यायचं. खासकरून महाविद्यालयातून अभ्यास आणि दिवसभराचे उद्योग आटोपून घरी आलो म्हणजे तर सायंकाळच्या जेवणाकरिता काय, हा प्रश्न या झटपट वरणभाताने अगदी चुटकीसरशी सोडवला जायचा. तुम्ही अभ्यासाच्या धबडग्यामधून सुटका म्हणून, आपल्या ताई-दादाला मदत म्हणून किंवा अगदी स्वत:च्या पाचवी-सहावीच्या अभ्यासातून थोडा विरंगुळा म्हणूनही आई-बाबांना, आजी-आजोबांना हाताशी घेऊन हा झटपट वरणभात करून पाहाच. धम्माल येईल.

चार जणांकरिता साहित्य : पाऊण वाटी रोजच्या वापरातला तांदूळ, एक ते सव्वा वाटी तूर, मूग, मसुर किंवा तूर-मूग, तूर-मसुर डाळ, दोन चिमूट हिंग, तीन ते चार चिमूट हळद, चवीनुसार मीठ आणि सोबत वाढताना प्रत्येक व्यक्तीमागे चमचाभर तूप. वरणभाताकरिता चार ते साडेपाच-सहा वाटय़ा पाणी.

उपकरणं : मापाकरिता एक वाटी, वरणभाताकरिता एक गंज किंवा उभं भांडं आणि प्रेशर कुकर, गॅस किंवा इंडक्शन शेगडी.

सर्वप्रथम तुम्हाला तुमचा वरणभात कसा आवडतो ते आठवा.. म्हणजे गुलगुलीत आणि मऊ, की भरपूर भात आणि थोडंसंच वरण असा कोरडा? त्याप्रमाणे हा वरणभात करतानाच तुम्हाला प्रमाणाशी खेळावं लागेल. मला वरण थोडंच आवडतं, त्यामुळे मी वर सांगितल्या प्रमाणात तांदूळ आणि डाळ घेतो. साधारणपणे तूरडाळीचं वरण छान होतं, मात्र काही घरांत तूर-मूग, तूर-मसूर अशा डाळींचं मिश्रणदेखील वापरतात. तुम्हाला जे आवडेल, रुचेल त्याप्रमाणे एक किंवा दोन डाळींचं मिश्रण एक किंवा सव्वा वाटी घ्या. दोन्हींचा ऐवज दोन वाटय़ा होईल. आता हे डाळ-तांदूळ एकत्र स्वच्छ धुऊन घ्या. चांगलं दोन-तीन पाण्यामधून तांदळाला लावलेली बोरीक पावडर वगैरे निघून जाईपर्यंत धुवा. मग प्रेशर कुकरमध्ये बसेल अशा उभ्या भांडय़ामध्ये हे धुतलेल्या डाळ-तांदळाचं मिश्रण घाला. आता प्रेशर कुकर शेगडीवर ठेवून त्यात खाली वाटीभर पाणी घाला. प्रेशर कुकरमध्ये हे डाळ तांदळाचं भांडं ठेवा. त्यात साडेचार वाटय़ा पाणी घाला. वरणभात मऊ, गुलगुलीत आवडत असेल तर पाच किंवा जास्तीत जास्त सहा वाटय़ा पाणी घातलंत तरी चालेल. आता त्यात हिंग, हळद आणि मीठ घालून चमच्याने एक- दोनदा ढवळा. आता प्रेशर कुकरचं झाकण लावून शेगडी चालू करा. आई-बाबांना किंवा घरच्या मोठय़ांना तुमच्यासोबत लक्ष ठेवायला घ्या बरं का! कुकरच्या शिट्टीच्या तोटीमधून वाफ यायला लागली म्हणजे त्यावर शिट्टी ठेवा आणि आच मध्यम किंवा मंद करा. दहा ते बारा मिनिटं किंवा दीड शिट्टीपर्यंत, म्हणजेच पहिली शिट्टी होऊ  द्या, दुसरी व्हायला आली की लागलीच आच बंद करा. प्रेशर कुकरमधली वाफ बसेल. कुकर कोमट होईतोवर थंड झाला की झाकण उघडून छान वरणभात खाण्याकरिता पानात वाढून घ्या. त्यावर तुपाची धार आणि सोबत लिंबाच्या किंवा आंब्याच्या लोणच्याची फोड चव लावण्यापुरती घ्या. गरम गरम वाफाळता वरणभात तुमची भूक तर भागवेलच, पण झटपट झाल्याने कमीत कमी वेळात तुम्हाला अभ्यासाला लागता येईल.

‘‘भूक लागली म्हणजे भात शिजेपर्यंत कळ निघते, निवेपर्यंत नाही,’’ असं माझी आजी नेहमी म्हणायची. माझ्या या स्वभावाला साजेसाच हा झटपट वरणभात आहे. मला स्वत:च्या हाताने केलेलं शिजवून खायला, खाऊ  घालायला आवडतं. त्याची लज्जत काही और असते. पण चवीचं खायचं तर चवीचं करायला वेळही हवा. मात्र काही थोडय़ा युक्त्या वापरल्या तर चवीचं खाणाऱ्यांना चवीचं आणि झटपट करताही येतं, ही या वरणभाताची खरी मज्जा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातल्या चिमुकल्या, अगदी दीड-दोन वर्षांच्या बाळांनाही हा भात थेट मोठय़ांसारखा भांडय़ातून पानात वाढता येतो. कालवावा लागत नाही. आहे की नाही मज्जा! तेव्हा हा झटपट वरणभात करून पाहा. मटामट खाऊन तुम्हाला तो कसा काय आवडला ते चटकन् कळवा. मी वाट पाहतो.

– श्रीपाद

contact@ascharya.co.in

First Published on March 11, 2018 1:01 am

Web Title: maharashtrian varan bhat recipe by shripad