28 November 2020

News Flash

व्यासांची पर्यावरण शिकवण

सध्या सर्वत्र पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मंगळवार, १९ जुलै रोजी व्यासपौर्णिमा आहे. व्यास महर्षीना वंदन करण्याचा हा दिवस. त्यांनी दिलेला पर्यावरणाचा संदेश ध्यानी घेऊन आणि तशी कृती करून साजरा करू या.
सध्या सर्वत्र पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महर्षी व्यासांनी सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले आहे. आपल्या साहित्यातून निसर्गाला जपण्याचा संदेश दिला आहे.
महाभारतामध्ये त्यांनी वृक्ष हे सजीव आहेत. त्यांना सुख-दु:खादी भावनासुद्धा असतात, असे सांगितले आहे. ‘वृक्षा: ते पुत्रा:’ असे म्हणून वृक्ष तुमचे पुत्र आहेत, म्हणून पित्याच्या ममतेने वृक्षांचे संवर्धन करावे असा पर्यावरणवादी विचार त्यांनी मांडला आहे. पुढे १८९७ मध्ये नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बसू यांनी ‘वनस्पती सचेतन आहेत’ हा सिद्धांत आधुनिक प्रयोगाद्वारे सिद्ध करून दाखविला.
व्यासमहर्षीनी महाभारतातील शांतीपर्वात वृक्षांना रस, रूप, गंध, स्पर्श आणि आलाप या पाच संवेदना असतात हे उदाहरणाद्वारे स्पष्ट सांगितले आहे. वृक्ष मुळाद्वारे पाणी पितात (रससंवेदना), वेली झाडावर चढतात (रूप संवेदना), धूप-सुगंध वगैरेंनी झाडे निरोगी राहतात (गंध संवेदना), खूप उन्हाने तसेच खूप थंडीने झाडे म्लान होतात (स्पर्श संवेदना) अति मोठय़ा ध्वनीने पाने-फुले गळून पडतात (आलाप संवेदना) असे व्यास महर्षीनी महाभारतात म्हटले आहे.
महाभारतातील उद्योगपर्वात व्यासमहर्षी म्हणतात, ‘‘वनस्पतींची कोवळी फळे जो काढतो त्याला फळांपासून रस तर मिळत नाहीच शिवाय त्यातील बीसुद्धा नष्ट होते.’’ पुढे व्यासमहर्षी म्हणतात, ‘‘पण काही दिवस गेल्यानंतर जो झाडांवरची तयार झालेली (पिकलेली) फळे घेतो, त्याला त्या फळांमधला रस तर मिळतोच शिवाय त्या फळातील तयार झालेल्या बीपासून पुन्हा (झाड उगवून) फळेही मिळतात.
महाभारतातील उद्योगपर्वात फुले काढण्याच्या मानवीवृत्तीवर व्यासमहर्षीनी प्रकाश टाकला आहे. व्यासमहर्षी एका श्लोकात म्हणतात- ‘‘भुंगे ज्याप्रमाणे फुलांना दुखापत न करता फुलांमधील रस चोखून घेतात, त्याप्रमाणे माणसांनी झाडाची फुले तोडताना झाडाला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावयास हवी.’’
अनेक लोक फुले काढताना बेफिकीरपणे वागतात. कधी झाडाची फांदी तोडतात तर कधी झाडे मुळासकट उपटली जातात. म्हणून व्यासमहर्षी एका श्लोकात म्हणतात – ‘‘फुले गोळा करावीत, परंतु झाडाची मुळे तोडू नयेत. बागेमध्ये माळी जसा झाडांची काळजी घेतो त्याप्रमाणे झाडांची काळजी घ्यावी. कारण मुळांचा नाश हा सहन करण्यास कठीण आहे.’’
झाडांच्या रक्षणाबद्दल व्यासमहर्षीनी किती कळकळीने आपली मतं सामान्य माणसांपर्यंत पोहोचवली आहेत आणि तीही पाच हजारवर्षांपूर्वी!
वराहपुराणातील चार ओळी सर्वानी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत.
यावत् भूमंडलात् धत्ते, सशैलवनकाननम्।
तावत् तिष्ठन्ति मेदिन्या, संतति: पुत्र पौतृकी॥
‘‘ जोपर्यंत या जगात या धरतीवर पर्वत, वन, उद्यान, (स्वच्छ) सरोवर आहेत, तोपर्यंत तुम्ही, तुमची मुले व नातवंडे सुखाने जगतील.’’
पर्यावरणाची-निसर्गाची-झाडांची काळजी न घेतल्याने किती समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, हे आपण रोज अनुभवत आहोत. दुष्काळ, पाणीटंचाई, अपुरा धान्यसाठा, वाढती महागाई यांना आपण माणसेच जबाबदार आहोत. म्हणूनच पर्यावरणाकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. आज जी गोष्ट आपण महत्त्वाची समजतो तीच गोष्ट पाच हजार वर्षांपूर्वी व्यास महर्षीनी सांगितली आहे. आपण निसर्गाचे रक्षण केले तरच निसर्ग आपले रक्षण करणार आहे.
मेधा सोमण – lokrang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 1:02 am

Web Title: maharshi vyas environmental teaching
Next Stories
1 डोकॅलिटी
2 इथे तिथे पाणी
3 आर्ट कॉर्नर : फेस वेट
Just Now!
X