खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. राजा चंद्रसेनाच्या महिकावती नगरीमध्ये एक मोठ्ठी पाठशाळा होती. आजूबाजूला गावातले सारे विद्यार्थी या शाळेत शिकायला यायचे. त्यांच्यातच गौरांग नावाचा एक गरीब मुलगा होता. lok18स्वभावाने अतिशय साधा व सरळ असलेला गौरांग बुद्धीने अगदीच सामान्य होता. ‘आज पाठ तर उद्या सपाट’ अशी त्याची अवस्था होती. ट, ठ, ड व ढ या अक्षरांमध्ये तर तो नेहमी घोळ करायचा. बाटलीला ‘बाढली’, गाढवाला ‘गाठव’, तर ठमाबाईला ‘डमाबाई’ असा त्याचा विचित्र प्रकार होता. सारे त्याला हसायचे, चेष्टा करायचे. शाळेत गुरुजींनी व घरी वडील माणसांनी कितीही समजावलं तरी गौरांगच्या मठ्ठ डोक्यात काही प्रकाश पडत नसे. एक दिवस त्याने गुरुजींना ‘गुडुजी’ अशी हाक मारली आणि साऱ्या मुलांनी वर्ग डोक्यावर घेतला. ‘गौडांग, गौरू, मारू, नांगराला जोडू’ असं म्हणत सारी मुलं त्याच्या पाठी लागली. बिचारा गौरांग रडतररडतच घरी गेला.
हळूहळू गौरांग उदास राहू लागला. खाली मान घालून यायचं, वर्गातल्या मित्रांची चिडवाचिडवी ऐकायची, गुरुजींची बोलणी खायची आणि खाली मान घालून उदास मनाने घरी जायचं, असा त्याचा रोजचा दिनक्रम झाला. मात्र त्याची एक गोष्ट कौतुकास्पद होती. आणि ती म्हणजे त्याचं हस्ताक्षर! गौरांगचं हस्ताक्षर त्याच्या नावाप्रमाणे अतिशय सुंदर व वळणदार होतं. मोत्यांची माळच जणू! शाळेतले गुरुजन व शेजारी मात्र त्याच्या सुंदर अक्षराची नेहमी प्रशंसा करायचे. वर्गातली मुलं मात्र तुमच्यासारखी महावात्रट व खटय़ाळ होती. सारेजण ‘गौडोबा, गधोबा, परीक्षेत भोपळोबा,’ असं म्हणत त्याची चेष्टा करायची. दररोज चालणाऱ्या या कटकटीला गौरांग वैतागला आणि एक दिवस त्याने चिडून शाळेमध्ये जाणं सोडून दिलं. आई-वडिलांनी, नातेवाईकांनी समजावलं, धमकावलं; पण पालथ्या घडय़ावर पाणी! काही केल्या गौरांग शाळेत जायला तयार होईना. आता झालं असं, की आजूबाजूचे शेजारीही त्याची चेष्टा करू लागले. शाळेत जायच्या वयात गौरांग गडी-नोकरांबरोबर शेतावर जाऊ लागला अन् ‘बैलोबा, शंखोबा’ अशा शब्दांत त्याची चेष्टा होऊ लागली. बिच्चारा गौरांग!
या घटनेनंतर काही महिन्यांनी एक गम्मत झाली. राजा चंद्रसेनाने एक भव्य असं ग्रंथालय बांधायला सुरुवात केली. आता ग्रंथालय म्हटलं की पुस्तकं आलीच. त्याकाळी आतासारखे झटपट, फटाफट छापणारे छापखाने नव्हते की क्लिक करताच तुरूतुरू चालणारे संगणक  नव्हते. त्याकाळी लोक मोरपिसाने किंवा बोरूने लिहायचे. घोटूनघोटून शाई तयार करायची आणि बोरूने लिहायचं, असा सारा कष्टाचा मामला होता. राजाच्या सेवकांनी गावोगावी जाऊन दवंडी पिटली- ‘‘ऐका हो ऐका, ज्या कुणाचं अक्षर चंद्रासारखं सुंदर व मोत्यासारखं वळणदार असेल त्याने राजदरबारी हजर व्हावं होऽऽ ढुम ढुम ढुमाक, ढुम ढुम ढुमाक!’’ गौरांगने दवंडी ऐकली मात्र, त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्याने लागलीच आई-वडिलांची परवानगी घेतली व तो राजधानीच्या दिशेने निघाला.
ग्रंथालयात लेखनिक म्हणून काम करण्यासाठी पंचक्रोशीतले बरेच तरुण आले होते. राजाच्याप्रधानाने सर्व तरुणांचं स्वागत केलं व परीक्षेचा दिवस जाहीर केला. ठरलेल्या दिवशी हस्ताक्षराची परीक्षा घेण्यात आली. एकसाथ साऱ्यांचे बोरू कुरूकुरू, तुरूतुरू चालू लागले अन् काय आश्चर्य! सर्व तरुणांमध्ये आमच्या ढगोबा, गौडोबाचं अक्षरं सर्वात सुंदर ठरलं. राजा चंद्रसेनही त्याच्या हस्ताक्षरावर अतिशय प्रसन्न झाला. गौरांगला ग्रंथालयाच्या प्रमुख लेखनिकाचं पद मिळालंच. शिवाय त्याचा सत्कारही करण्यात आला. त्याचं सर्वत्र कौतुक होऊ लागलं.
मुलांनो, परमेश्वर प्रत्येकाला काही ना काही गुण व कला देत असतो. आतापर्यंत सर्वाच्या कुचेष्टेचा विषय ठरलेल्या गौरांगने केवळ आपल्या हस्ताक्षराच्या बळावर राजदरबारात मानाचं स्थान मिळवलं व तो सुखासमाधानाने राहू लागला.