मोहन गद्रे

gadrekaka@gmail.com

alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
exam burden on children marathi news
सांदीत सापडलेले… : खरी परीक्षा!
how to take Care of indoor plants
घरातल्या झाडांची निगा
Learn How To Cook instant rava kurdai At Home
रवा न भिजवता, चीक न पाडता बनवा झटपट चौपट फुलणारी रवा कुरडई; जाणून घ्या कृती

राजू आणि प्रज्ञा दोघेही अभ्यास करत बसले होते, इतक्यात स्वयंपाकघरातून छान खमंग गोड वास येऊ लागला. आई स्वयंपाकघरात होती. आई काहीतरी छान खायला बनवत असणार हे दोघांनाही कळलं. दोघेही स्वयंपाकघरात धावले. आई खोबरे, तीळ, भाजत होती, आणि बाजूला पिवळा धम्मक गुळाचा खडा दिसत होता. बाजूला थोडेसे वेलदोडे ठेवलेले दिसत होते.

राजू म्हणाला, ‘‘आई, काय भाजतेस गं? काय खमंग वास सुटलाय!’’

प्रज्ञा म्हणाली, ‘‘अरे, दिसत नाही का तुला? तीळ, खोबरे आणि गूळ म्हणजे तिळगूळ, हो की नाही आई? तू तिळगुळाचे लाडू बनवते आहेस ना? अरे, संक्रांत आली ना जवळ, त्यासाठी तिळगुळाचे लाडू आई बनवत असणार.’’

आई म्हणाली, ‘‘प्रज्ञाने बरोबर ओळखलं. अरे, आता संक्रांत जवळ आली ना, त्यासाठी तिळगुळाचे लाडू हवेत ना!’’

राजू आणि प्रज्ञा म्हणाले, ‘‘अगं आई, एक सांग, वर्षभर आपले कुठले ना कुठले सण असतात, तेव्हा का नाही गं तिळगुळाचे लाडू बनवत? तिळगुळाचे लाडूसुद्धा इतर मिठाईसारखे मस्त गोड लागतात की. मग हे लाडू अन्य सणांच्या दिवशी का बनवायचे नाहीत?’’

आई म्हणाली, ‘‘मला एक सांगा, तुम्ही दोघांनी आत्ता अंगात स्वेटर का घातलेत? आजोबांनी तर स्वेटर घातलाय शिवाय डोक्याला मफलरसुद्धा बांधलाय. हे कपडे आपण इतर दिवसांत घालतो का? या मोसमामध्येच लोकरीचे कपडे घालतो, कारण आता थंडीचे दिवस सुरू झालेत. थंडीपासून शरीराचं संरक्षण व्हावं म्हणून ना! तुमच्याशी बोलत बसले तर खोबरं करपेल.

स्वेटर घालून, डोक्याला मफलर गुंडाळून बसलेले आजोबा हे सर्व संभाषण ऐकत होते. त्यांनी राजू आणि प्रज्ञाला हाक मारून बोलवून घेतलं. ‘‘आईला आत्ता त्रास देऊ नका, ती कामात आहे ना! मी सांगतो तुम्हाला संक्रांतीतच तिळगुळाचे लाडू का बनवतात. नुसते करतच नाही, तर स्वत: खातात आणि इतरांनाही का वाटतात ते! तिळगुळाचे लाडू करताना तुम्ही पाहिलेच आहे, त्यासाठी काय काय जिन्नस लागतात ते.’’

प्रज्ञा म्हणाली, ‘‘हो आजोबा, तिथे आईनं तीळ घेतलेत. शिवाय, सुकं खोबरं आणि गूळसुद्धा आहे.’’

आजोबांनी म्हणाले, ‘‘एक सांगा, आपण स्वेटर, मफलर, शाल किंवा रग असे लोकरीचे कपडे का आणि कधी वापरतो?’’

दोघांनीही उत्तर दिलं, ‘‘थंडीच्या दिवसात, आपल्याला थंडी लागू नये म्हणून.’’

आजोबा म्हणाले, ‘‘थंडीच्या दिवसात आपले थंडी-वाऱ्यापासून रक्षण व्हावे म्हणून आपण लोकरीचे गरम कपडे वापरतो. पण ज्याप्रमाणे थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला बाहेरून ऊब देण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आतूनही उष्णता मिळेल याची खबरदारी घ्यावी लागते. ऋ तुमानाप्रमाणे आपल्या आहारातसुद्धा बदल करून शरीरातील उष्णता नियंत्रित करावी लागते. उन्हाळ्यात आपण काय खातो-पितो?

दोघंही एकदम ओरडले, ‘‘आइस्क्रीम!’’

आजोबा म्हणाले, ‘‘तुम्हाला पटकन आइस्क्रीम आठवलं, पण तो काही आपला रोजचा आहार आहे का? रोजच्या आहारात आपण लिंबू सरबत, कैरीचं पन्हं, आवळ्याचं सरबत, वाळ्याचं सरबत, किलगड अशी थंड पेयं किंवा इतर थंड पदार्थ खातो. पण उन्हाळ्यात ते ठीक असले तरी हिवाळ्यात मात्र आपल्या शरीराला आतून योग्य ती उष्णता मिळण्यासाठी, तेलजन्य पदार्थ खाल्ल्यास आरोग्याला चांगले असते.’’

प्रज्ञा म्हणाली, ‘‘हो आजोबा. तीळ, खोबरं, शेंगदाणे यांचं तेल असतंच की!’’

आजोबा म्हणाले, ‘‘बरोबर, तेलजन्य पदार्थ पोटात गेले की हिवाळ्यात शरीराला जास्तीची उष्णता निर्माण करतातच. शिवाय हिवाळ्यातील कोरडय़ा हवामानामुळे आपली त्वचा कोरडी पडते आणि काही लोकांना त्वचेला भेगा पडून त्रास होतो. अशा परिस्थितीत तेलजन्य पदार्थ खाल्ले की त्वचा कोरडी शुष्क पडत नाही.

आता मला सांगा, हे सर्व पदार्थ नुसतेच खायला कोणाला मनापासून आवडतील की त्यांचे लाडू किंवा वडय़ा करून खायला आवडतील? अन्न आवडीने खाणे यालासुद्धा महत्त्व आहेच ना? म्हणून मग त्यातच गूळ घालून मस्त लाडू बनवायचे. किंवा त्याच्या वडय़ा करून संक्रांत सणाच्या दिवशी खायच्या. आणि नुसत्या आपणच खायच्या नाहीत, तर आपल्या सगळ्या शेजाऱ्यांना, मित्र-मंडळींना नातेवाईकांनासुद्धा तिळगूळ द्यायचा आणि म्हणायचं, ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला.’ म्हणजेच आपलं काही कारणाने कोणाशी भांडण वगैरे झालं असेल, काही गैरसमज झाले असतील तर ते विसरून जा, असे आपण सर्वाना सांगायचे आणि त्यांच्या हातावर तिळगूळ ठेवायचा.

आजोबांनी विचारलं, ‘‘तुमचं कोणाशी भांडण वगैरे झालं आहे का? आठवून बघा!’’

प्रज्ञा म्हणाली, ‘‘हो आजोबा. ‘बी’ विंगमधली प्रीती आहे ना तिच्याशी माझं काल बागेतल्या झोपाळ्यावर बसण्यावरून भांडण झालं. तिला देते तिळगूळ आणि म्हणते, ‘तिळगूळ घे आणि गोड गोड बोल. रागावू नकोस.’’ राजूसुद्धा आठवू लागला त्याचं कोणा कोणाशी भांडण वगैरे झालं आहे. त्यालाही चार-पाच मित्रांची नावं आठवली.

आजोबा म्हणाले, ‘‘सर्वानी गुण्यागोविंदाने राहावे म्हणूनच तर सर्व सण साजरे करायचे असतात. हाच तर सण साजरे करण्याचा मुख्य हेतू.’’

आईने राजूला हाक मारली आणि एक लाडू देवाजवळ ठेवायला सांगितला आणि दुसरा लाडू आजोबांना देऊन नमस्कार करण्यास सांगितलं.

प्रज्ञा म्हणाली, ‘‘आई, अजून एक लाडू दे, आजोबा आजीला देतील आणि म्हणतील, ‘तिळगूळ घे आणि गोड गोड  बोल. भांडू नकोस.’

प्रज्ञाच्या या वाक्यासरशी घरात एकच हशा पिकला.