02 December 2020

News Flash

चित्रांगण : बनवा स्वत:चं चित्ररूप

आपण स्वत:ला एक चित्ररूप देऊ शकतो.

आपण नेहमीच स्वत:ला आरशात पाहतो. म्हणजे आपण जे स्वत:ला दिसतो ती आपली प्रतिमा असते. आणि प्रत्येकाला आरशात पाहायला आवडतं.

शुभांगी चेतन – shubhachetan@gmail.com

‘‘काय मग, कसं वाटतंय घरात, सक्तीच्या सुट्टीत?’’ हा प्रश्न मी गमतीने विचारतेय खरी, पण मला पूर्ण कल्पना आहे की तुम्हा लहानांनाच काय, पण आम्हा मोठय़ांनाही हे आवडत नाहीए. कसं असतं ना, जेव्हा आपल्याला कुणी बाहेर जायला सांगतं तेव्हा आपल्याला घरातच बसायचं असतं आणि आता जेव्हा घरी बसायला सांगितलंय तेव्हा नेमकं बाहेर जावंसं वाटणार. झोप येणार नाही, लवकरच जाग येणार, शाळेतच जावंसं वाटणार, क्लासचीच आठवण येणार, असं खूप काही वाटत असणार. पण सध्या आपण घरात राहिलो तरच नंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. म्हणून घरात राहा, कधी नाही ते आई-बाबांनापण मोठी सुट्टी मिळाली आहे. तेव्हा हा वेळ त्यांच्या सोबत छान छान उपक्रम करण्यात घालवा. अगदी काहीच नाही तर फक्त गप्पांचाच फड जमवा. पालकांना जसं सांगायला आवडतं, तसंच या दिवसांमधे मुलांचं पण ऐकू या. खूप काही असतं त्यांना सांगायचं.

हं, तुमच्या गप्पांसोबतच मस्त गमतीदार उपक्रमही करता येतील. आपण नेहमीच स्वत:ला आरशात पाहतो. म्हणजे आपण जे स्वत:ला दिसतो ती आपली प्रतिमा असते. आणि प्रत्येकाला आरशात पाहायला आवडतं. आवडावंच ते. रसिक असण्याचं लक्षण आहे ते. केस, चेहरा, त्यावरचे बारकावे, रंगीत कपडे, हात-पाय यांनी मिळून आपलं बाह्यंग तयार होतं. मी लहान होते तेव्हा आरशासमोर उभी राहून स्वत:शीच बोलायचे, हसायचे, गोष्टी सांगायचे; ज्यांच्यासोबत भांडण व्हायचं त्यांना ओरडा द्यायचे. तो आरसा मित्र होता माझा. तशी मी आजही स्वत:शी बोलते. आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी बरेच जण स्वत:शी बोलत असणार. तर आता आपले मित्रही भेटत नाहीत आपल्याला. मग काय करायचं, तर आपण स्वत:शीच मैत्री करायची. आणि ते करताना आपण स्वत:ला एक चित्ररूप देऊ शकतो.

यासाठी तुम्हाला मोठे कागद लागतील. ते प्रत्येकाकडे नसतील याची मला कल्पना आहे. तर मग काय करायचं! .. तर आपल्याकडे वर्तमानपत्र असतं. त्याची पानं एकमेकांना जोडायची आणि मोठा कागद घरच्या घरी तयार करायचा. आता हा कागद चिकटवायला जर फेव्हिकॉल नसेल तर काय करायचं, ते मी नाही तुमचे आई-बाबा सांगतील तुम्हाला. पालकहो, आपण केलेलं आहे हे लहान असताना. पूर्ण कॉलनीला एकसारखे कंदील करताना खळ म्हणून काय वापरत होतात, ते सांगा मुलांना.

तर हा कागद तयार झाला की त्यावर झोपायचं. हो, तुम्ही योग्यच वाचताय- झोपायचं. आणि घरातल्या इतर कुणाला तुमच्या शरीराची बारेषा पेन्सिलने त्या कागदावर काढायला सांगायची. बरं, कसंही झोपलं तरी चालेल. आपण झोपेत कसेही झोपतो, त्यामुळे इथे नियम नको. त्यांनी ती रेषा काढली की तुमचाच कागदावरचा आकार कात्रीने कापायचा आणि मग तो तुमच्याकडे असलेल्या रंगाच्या साहित्याने रंगवायचा. विविध रंगांचे पेन्स वापरून नक्षीकामही करू शकता त्यावर. स्वत:च्याच आकाराला रंगीत कसं करायचं ते तुम्ही ठरवा.

सध्या आपले मित्र सोबत नाहीत. पण तुम्ही फोनवर असलेल्या विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून त्यांच्याशी गप्पा मारू शकता. हा उपक्रमही त्यांच्यासोबत शेअर करू शकता. स्वत:चंच हे कागदीरूप थोडय़ा काळासाठी का असेना तुमच्यासाठी मैत्री करेल. हे सध्याचे दिवस तुमच्याचसारखे आम्हीही प्रथमच अनुभवत आहोत. जसं तुम्हाला कळत नाहीए की कसा जाणार हा वेळ, तसंच हे दिवस छान जाण्यासाठी तुम्हीही आई-बाबांना मदत करू शकता. त्यांच्या सोबत हे उपक्रम करून पाहा. त्यांच्यातही लहान मूल दडलेलं असतं, फक्त कामाच्या ताणांत त्याचा विसर पडतो. याच उपक्रमातून मला पालकांनाही हे सांगावंसं वाटतं, की आपल्या मुलांसोबत मैत्री करण्यासाठी इतका छान वेळ मिळणार नाही. जबाबदाऱ्या तर या दिवसांनंतर दुपटीने समोर येणार आहेत, तोपर्यंतचा काळ मुलांसोबतच स्वत:लाही आनंदी ठेवा. मोठं होणं तर नैसर्गिक आहे, लहान होण्याची संधी मिळेलच असं नाही! म्हणून मुलांसोबत पुन्हा लहान होऊ या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2020 12:18 am

Web Title: make own cutouts chitrangan dd70
Next Stories
1 करोना आणि मासे
2 जा ना रे करोना
3 सोडु घर न आम्ही बहु प्रयासी।
Just Now!
X