छोटय़ा दोस्तांनो, अभ्यासाचा ससेमिरा संपला म्हणून हायसं वाटतंय ना! मग चेहरा का पडलाय? नक्की आई-बाबांनी कशाला तरी ‘नाही’ म्हटलेलं दिसतंय. एक काम करा नं, सोसायटीच्या गेटमध्ये उभं राहून रति, गौरांगी, गंधार, आर्यमान, वेदांग, वैभव, ओंकार, अद्वय, आराध्य, ध्रुती कोणाची वाट बघताहेत ते बघा बरं.
सगळ्यांच्या काहीतरी कानगोष्टी चालल्या आहेत. रतीची केतकीताई कॉलेजच्या कामासाठी आलीय राहायला. ती बाहेर गेलीय म्हणून तिच्या येण्याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. ती आल्यानंतर आकाशकंदील करणार आहे, बरं का? इतक्यात ती येताना दिसल्यामुळे सगळे तिच्यामागे धावले. तिच्या हातातल्या पिशवीत बरेच सामान दिसत होते. रतीने पुढे होत तिच्या हातातली पिशवी घेतली. रंगीत कागदाची भेंडोळी, बांबूच्या जोड काडय़ांचा गठ्ठा असे बरेच काही दिसत होते. सगळी वानरसेना रतीच्या घरात घुसली.
‘‘आता आकाशकंदील करू या, पण नंतर मी अभ्यासाला बसले की, मेंदी काढ म्हणून त्रास द्यायचा नाही बरं का.’’ रती, गौरांगीने ‘होऽऽहो’ करीत जोरजोरात माना हलविल्या. काहीतरी आठवल्यामुळे रती पटकन आत जाऊन दोऱ्याचे राडगुंडे घेऊन आली. ‘शाबास’ केतकीताईने शाबासकी दिली. एका हातात खडू आणि दुसऱ्या हातात फूटपट्टी नाचवत गंधार उडय़ा मारीतच आला.
मस्तीखोर ओंकारने मधेमधे लुडबूड करीत रतीच्या हातातली पिशवी हिसकावून घेत खाली टाकली. वैभवदादाने त्याला दणका दिल्यामुळे वाजंत्री सुरू झाली, पण कोणी लक्ष न दिल्यामुळे आपोआप थांबली. केतकीताईने गावातून बांबूच्या बेताच्या जाडीच्या जवळपास दोन फूट लांबीच्या २०/२५ काडय़ा आणल्या होत्या. साधारण दहा इंचाचे चार तुकडे घेऊन तिने त्याचा चौकोन बांधण्याचे काम दोघादोघांना वाटून दिले. एकाने दोन काडय़ांची टोके एकत्र धरायची आणि दुसऱ्याने त्यावर दोरा गुंडाळायचा. कधी टोकं हलायची तर कधी दोऱ्याचा गुंडा घसरगुंडी खेळत धावायचा, पण सगळी बालचमू चार चौकोन करण्यात रंगून गेली. मोठी दोन फुटी काडी घेऊन चौकोनाच्या कर्णाच्या जागी वरती-खालती सारखे अंतर ठेवून ते चौकोन काडीला बांधून टाकले गेले. खाली बसायची सवय गेल्यामुळे चुळबूळ करीत काम चालले होते. हे चार चौकोन पुन्हा एकमेकांना जोडले गेले. आता आकाशकंदिलाचा सांगाडा दिसू लागल्यामुळे सगळ्यांचे चेहरे खुलले होते. आता वरच्या आणि खालच्या बाजूला आडव्या दोन-दोन काडय़ांनी चौकोनाचे शेंडे जुळवत एकावर एक दोन चौकोन तयार झाले. केतकीताईच्या सूचनेबरहुकूम एकचित्ताने काम चालले होते. रतीच्या आईने कुरमुऱ्याच्या चिवडय़ाचे कागद प्रत्येकाच्या हातात दिल्यामुळे श्रमपरिहार करण्यासाठी मंडळी चांगलीच सैलावली. ओंकार आणि आराध्य या लिंबू-टिंबूनी तर फरशीवर लोळणच घेतली.
आता साधे रंगीत कागद पिशवीतून बाहेर आले. ‘ए मला हा रंग आवडला’ म्हणत प्रत्येकाने त्याच्यावर हळुवारपणे हात फिरविला. ‘ए मी जांभळा कागद कापणार’ कोणीतरी जाहीर करताच ‘भांडू नका’ म्हणत केतकीताईने डोळे मोठे केले. सगळ्यांनी गुपचूप तिने दिलेला कागद घेतला. आता ती सांगेल तसा चौरस, त्रिकोण आणि आयताकृती पट्टय़ा कापण्यात सगळे गढून गेले. ‘अय्या माझं चुकलं’,ध्रुती ओरडली. ‘असू दे, मी जास्त कागद आणून ठेवले आहेत,’ असे केतकीताईने सांगताच सगळ्यांचेच जीव भांडय़ात पडले.
आता खळ करायचे काम रतीवर सोपविण्यात आले. तिला गॅससुद्धा पेटविता येत होता. कणकेत पाणी घालून, ढवळून, गॅसवर शिजवून खळ तयार झाली. चिमटय़ात खळीचं पातेलं धरून आणताना रतीच्या चेहऱ्यावर विजयी भाव तरळत होता. वर्तमानपत्र पसरून खळ लावून कागद चिकटविण्याचे चिकट काम सगळ्यांना फार आवडले. हात पुसायला फडके होते तरी फरशी चिकट झाली होती. कोणाचे तरी काहीतरी फरशीला चिकटत होतं आणि हास्याची कारंजी उडत होती.
केतकीताईने साधारण एक इंचाच्या सोनेरी चांदीच्या पट्टय़ा कापून मध्ये घडी घालून दोन्ही बाजूंना डोंगर कापण्याची ‘सही’ कल्पना सांगताच सगळे कात्री घेऊन कामाला लागले. डोंगर कापण्याचं नाजूक काम करताना सगळ्यांची दमछाक झाली. या पट्टय़ा आकाशकंदिलाच्या सर्व कडांवर चिकटविण्यात आल्या. त्या सारख्या बोटालाच चिकटत होत्या आणि मग दुसऱ्याची मदत घ्यावी लागत होती. आता साधारण दोन इंचाचे रंगीत कागदाचे चौरस कापून त्याची समोरासमोरची दोन टोके चिकटवून रंगीत करंज्या तयार झाल्या. सगळ्या करंज्या ठरावीक रंगाच्या क्रमाने कंदिलाच्या वरच्या आणि खालच्या पट्टीवर लावण्यात आल्या. झिरमिळ्यांसाठी पण लांब एक-दीड फुटी, अर्धा इंच रुंदीच्या सगळ्या रंगांच्या पट्टय़ा झरझर कात्रीने कापण्यात आल्या. कंदिलाच्या खालच्या बाजूला लावता लावता अद्वयने आराध्य आणि ओंकारचं लक्ष नाहीसं बघून त्यांच्या पँटच्या मागच्या बाजूला रंगीत शेपटय़ा हळूच चिकटविल्या. ‘माकड माकड’ म्हणून फिरकी घेत सगळे खो-खो हसू लागले.
आता फक्त चार कोपऱ्यांना काहीतरी सुशोभित करायचे बाकी होते. गौरांगीने जांभळ्या रंगाचे गोलाकार फूल कापले. रतीने पिवळ्या रंगाचे त्याच आकाराचे पण जांभळ्यापेक्षा थोडे लहान फूल कापले. वैभव आणि आर्यमानने पण हिरवी, लाल लहान होत जाणारी फुले कापली. जांभळ्यावर पिवळं, हिरवं, लाल फूल व सोनेरी टिकली चिकटवून मस्त कार्यकर्त्यांच्या बिल्ल्यासारखं फूल तयार झालं. आकाशकंदिलावर चिकटविल्यावर कंदील एकदम मस्त दिसायला लागला. सगळ्यांनी उडय़ा मारीत, गिरकी घेत आनंद व्यक्त केला. केतकीताईने सुतळी बांधून गॅलरीत तो टांगला. रतीने धावत जाऊन वायर व बल्ब आणला. अंधार पडायला लागलाच होता. दिवा लागल्यावर रंगीबेरंगी प्रकाशात सगळ्यांचे चेहरे कसे अभिमानाने उजळून निघाले. चिल्लरपार्टीला खूप गंमत वाटली.
दोस्तांनो, रंगीत कागद बरेच शिल्लक आहेत. तुम्ही पण ‘ट्राय’ करा आणि आई-बाबांना सरप्राइज द्या, कंटाळा कुठल्या कुठे पळून जाईल. कशी वाटते कल्पना?