30 May 2020

News Flash

गजाली विज्ञानाच्या : आलिया भोगासी, असावे सादर!

सीरॅटिडी (Ceratiidae) या कुलातील. आम्ही खोल समुद्रात राहतो. आमच्या मादी वैशिष्टय़पूर्ण असतात.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. नंदा हरम

माझ्या बालमित्र-मैत्रिणींनो, तुम्हाला थोडा वेळ देता येईल का माझी व्यथा ऐकण्याकरिता? तयार आहात का? ऐका मग. मी आहे एक नर अँग्लर फिश. सीरॅटिडी (Ceratiidae) या कुलातील. आम्ही खोल समुद्रात राहतो. आमच्या मादी वैशिष्टय़पूर्ण असतात. त्यांच्या डोक्यावर मांसल वाढ झालेला एक अवयव असतो, ज्याला ‘एस्का’(Esca) म्हणतात. या एस्कात जैविक प्रकाश देणारे जिवाणू असतात. आता कल्पना करा, अंधारात मादी पाण्यात फिरत असताना हे जिवाणू प्रकाशमान होतात तेव्हा नैसर्गिकपणे पाण्यातले छोटे जिवाणू, सजीव, मासे त्याकडे आकर्षित होतात. बरोब्बर ओळखलंत! अन्न मिळविण्याकरिता या प्रकाशाचा फायदा होतो. आणि अर्थातच आपल्या जोडीदाराला आकर्षित करायलाही हा प्रकाश उपयोगी पडतो.

आमच्या कुलातील मादी आकाराने मोठय़ा व निमुळत्या असतात. आतापर्यंत माहीत असलेली सर्वात मोठी मादी जवळ जवळ चार फूट लांबीची आहे. त्यामानाने आम्ही नर आकाराने खूप लहान, जेमतेम १४ सेंमी लांबीचे असतो. किशोरवयात जेव्हा मुक्त वावरतो तेव्हा तर १.३ सेंमी लांबीचे असतो. आम्हाला तेव्हा एक अणकुचीदार चोचीसारखा दंतविरहित जबडा असतो.

तुम्ही म्हणाल की, अजूनपर्यंत तुझं दु:ख काय ते कळलंच नाही. थांबा, सांगतो. जन्मापासून आम्हाला अतिशय विकसित घ्राणेंद्रियं लाभलेली असतात. पाण्यातील कोणताही गंध आम्ही ओळखू शकतो. आमच्या काही जातीच्या नरांचे डोळेही मोठ्ठे आणि वैशिष्टय़पूर्ण असतात. अगदी अंधारातही आपल्या जोडीदाराला ओळखू शकतात. आमच्या जीवनाचा एकमेव हेतू म्हणजे ‘जोडीदार शोधणे’ हा होय. आम्ही मादीपेक्षा आकाराने खूपच लहान असल्यामुळे अन्न मिळवणं कठीण होऊन बसतं. पुढचं ऐका. काही जातीच्या नरांमध्ये अन्ननलिकेची वाढ एवढी खुरटते की अन्नग्रहण करणं शक्यच होत नाही. काही नरांचे जबडे भक्ष्य पकडण्यायोग्य नसतात. आता येतंय लक्षात? एखाद्या मादीशी जोडले गेलो नाही तर आमच्या नशिबी मरणच येतं.

मादीने पाण्यात सोडलेली फेरोमोन्स (संकेती रसायनं) आम्हाला आमच्या संवेदनशील घ्राणेंद्रियांमुळे समजतात. जवळपास असलेली मादी मिळताच

आम्ही तिचा चावा घेतो आणि एक विकर त्यावर सोडतो. स्रवलेल्या विकरामुळे आमच्या तोंडातील आणि तिच्या अंगावरची त्वचा पचवली जाते. त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या थरापर्यंत जाऊन आम्ही मादीला जोडले जातो. यापुढे आमचं जीवन मादीवर अवलंबून असतं. तिच्या रक्तवाहिन्यांतून मिळणाऱ्या पोषक द्रव्यांवर आम्ही गुजराण करतो, अन् त्या बदल्यात आम्ही तिला पुनरुत्पादन होण्याकरिता शुक्राणू देतो. काही प्रजातींमध्ये एकच नर मादीला जोडला जातो, तर काहींमध्ये यांची संख्या आठपर्यंत जाते. अशा प्रकारचं ‘लैंगिक सहजीवन’ आमच्या कुलात आढळून येतं. म्हणूनच मला वाटतं- ‘आलिया भोगासी, असावे सादर!’ आणखी काय?

nandaharam2012@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2019 1:58 am

Web Title: male angler fish ceratiidae abn 97
Next Stories
1 तू सुखकर्ता..
2 एकच वाघ!
3 असा कसा हा ‘दगड’!
Just Now!
X