इंग्रजी विषयाची आवड निर्माण होण्यासाठी आणि भाषेचा पाया पक्का होण्यासाठी जर एखादी इंटरअ‍ॅक्टिव्ह साइट मिळाली, तर तुम्हाला हसत खेळत अभ्यास करायला मजा येईल ना? ब्रिटिश कौन्सिलच्या http://learnenglishkids.britishcouncil.org/en/ या साइटवर असे अनेक खेळ आणि कोडी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. उदाहरणादाखल आपण त्यातील काही पाहू या. घरातील खोली किंवा शाळेतील वर्ग याचे चित्र दाखवून त्यात दिसणाऱ्या वस्तूंची इंग्रजी नावे तुम्हाला ओळखायची आहेत. ड्रॅग आणि ड्रॉप पद्धतीने त्यांच्या जोडय़ा लावायच्या आहेत.

दुसऱ्या खेळात वाक्यातील शब्दांची सरमिसळ करून दिलेली असते. ते शब्द वाचून आपण त्यांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य बनवायचे असते. येथे ‘वर्डसर्च’ची अनेक कोडी आहेत. हे शब्द शोधण्यासाठी सूचक अर्थ दिलेले असतात. उदाहरणार्थ  A Person who checks your teeth   या सूचक अर्थासाठी Dentist हा शब्द शोधायचा आहे.

येथे काही ट्रिकी वर्डस्चे खेळ आहेत. ‘वर्ड शेक’हा गेम- ज्यात काही अक्षरे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात. ज्या अक्षरांचा उपयोग करून तुम्हाला जास्तीत जास्त अर्थपूर्ण शब्द बनवायचे असतात. मेसेज एनकोडर या गेममध्ये प्रत्येक इंग्रजी अक्षराला एक चित्र दिलेले आहे. त्या चित्रांचा उपयोग करून काही इंग्रजी वाक्ये लिहिलेली आहेत. ते इंग्रजी वाक्य काय आहे ते तुम्हाला ओळखायचे असते.

तसेच येथे व्याकरणाचा पाया पक्का करून घेणारे खेळही आहेत. उदाहरणार्थ साधा व चालू वर्तमानकाळ या विषयावर दोन प्रकारचे खेळ खेळता येतील. एका खेळात तुम्हाला एखाद्या वाक्यातील सर्व शब्द कुठल्याही क्रमाने दिलेले असतात. जास्तीत जास्त वेगात शब्दांची जुळवणी करून ते अर्थपूर्ण बनवायचे असते. तर दुसरा खेळ हा गाळलेल्या जागा भरण्याचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला योग्य क्रियापद निवडायचे आहे.

अशा प्रकारचे खेळ आणि कोडय़ांच्या साहाय्याने इंग्रजी विषयाशी तुम्हाला गट्टी करता येईल.

-मनाली रानडे
manaliranade84@gmail.com