18 October 2019

News Flash

प्रेरणा

रविवारची निवांत सकाळ होती तरी राहुलचे बाबा त्यांच्या स्टडीमध्ये त्यांचं काम करत बसले होते.

|| प्राची मोकाशी

रविवारची निवांत सकाळ होती तरी राहुलचे बाबा त्यांच्या स्टडीमध्ये त्यांचं काम करत बसले होते. एका मोठाल्या पुस्तकातून ते काही नोट्स त्यांच्या वहीमध्ये टिपून ठेवत होते.

‘‘बाबा, कुठलं पुस्तक वाचताय?’’ राहुल बाबांपाशी येत म्हणाला. बाबांनी त्याला पुस्तकाचं कव्हर दाखवलं- ‘द कॉन्स्टिटय़ुशन ऑफ इंडिया.’ लेखक डॉ. बी. आर. आंबेडकर.’’ राहुलला एकदम आठवलं, आज १४ एप्रिल- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती!

‘‘तुम्ही आंबेडकरांना खूप मानता नं?’’ राहुलने बाबांना विचारलं. टेबलावर आंबेडकरांनी लिहिलेली अजून काही पुस्तकं ठेवलेली राहुलला दिसली.

‘‘नक्कीच! आपल्या देशाचं संविधान तयार करण्यात त्यांचा मुख्य सहभाग तर होताच, पण आपल्या स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदा मंत्रीदेखील होते. माझा व्यवसायही कायद्याशी संबंधित असल्याने ते खरं तर माझे आदर्शच आहेत.’’ बाबा थोडा वेळ त्यांचं काम बाजूला ठेवत म्हणाले.

‘‘कॉन्स्टिटय़ुशन म्हणजेच संविधान नं?’’

‘‘करेक्ट! २६ जानेवारी १९५० साली आपले संविधान अंमलात आले. म्हणजे ज्या देशाची सत्ता जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी चालवतात- आपण ज्याला लोकशाही किंवा ‘डेमोक्रसी’ असं म्हणतो. असा देश चालवण्यासाठी ठरवलेले नियम किंवा सिद्धांत म्हणजे आपलं संविधान! जरी २६ जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असलो तरी २६ नोव्हेंबर १९४९ ला बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली निव्वळ २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांत हे संविधान पूर्ण झालं, जी खूप मोठी गोष्ट होती. म्हणून हा दिवस ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.’’

‘‘बाबा, त्यांच्याबद्दल अजून सांगा नं!’’

‘‘आणि अभ्यास? उद्याचा शेवटचा पेपर व्हायचाय अजून!’’

‘‘थोडा वेळ ब्रेक घेतलाय. सांगा नं!’’ राहुलने आग्रह धरला.

‘‘ओक्के! बाबासाहेबांचं खरं आडनाव होतं आंबवडेकर. ‘आंबेडकर’ हे आडनाव त्यांनी त्यांच्या एका आवडत्या शिक्षकाकडून त्यांच्या अनुमतीने स्वीकारलं होतं. बाबासाहेब लहान असताना त्यांचे वडील  ब्रिटिश आर्मीमध्ये होते. त्यांची घरची परिस्थिती तशी चांगली होती. त्या काळी ब्रिटिश आर्मीसाठी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी सरकार आग्रही असायचं. त्यामुळे बाबासाहेबांनासुद्धा चांगलं शिक्षण मिळू शकलं- जे एरवी त्यावेळच्या आपल्या रूढ जातिव्यवस्थेमुळे मिळालं नसतं.’’

‘‘किती चुकीचं आहे हे!’’

‘‘बाबासाहेब नेहमी म्हणायचे की, स्पृश्यता-अस्पृश्यता हा भेद आपण माणसांनी निर्माण केलाय. परमेश्वराने तर सगळ्यांना एकसारखंच बनवलंय!’’

‘‘खरंच आहे की ते!’’

‘‘पण हे प्रत्येकाला समजायला हवं नं! असो. मॅट्रिक म्हणजे त्या काळची एस.एस.सी. झालेले त्यांच्या समाजातले ते पहिले विद्यार्थी होते. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी.ए.पर्यंतचं शिक्षण घेऊन त्यांनी बडोद्याला सरकारी खात्यात नोकरी धरली. तिथे त्यांची हुशारी, कर्तबगारी बडोद्याचे राजा सयाजीराव गायकवाडांनी हेरली. त्यांनीच मग बाबासाहेबांच्या परदेशातील पुढील शिक्षणाचा सर्व खर्च उचलला. अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सटिी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनमिक्स अशा दर्जेदार शिक्षण संस्थांमधून बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. यापूर्वी जोतिबा फुले यांचं समाजकार्य पाहून गायकवाडांनी त्यांनाही मदत केली होती. ‘महात्मा’ ही उपाधी त्यांनीच जोतिबा फुलेंना दिली होती,’’ बाबा कपाटातून ‘वेटिंग फॉर अ व्हिसा’ हे पुस्तक काढत म्हणाले. त्यांनी ते राहुलला दिलं.

‘‘राहुल, आज हे पुस्तक कोलंबिया युनिव्हर्सटिीमध्ये ‘टेक्स्टबुक’ म्हणून वापरतात.’’ राहुल पुस्तक चाळू लागला.

‘‘गायकवाडांनी केलेली ही मदत बाबासाहेब कधीच विसरले नाहीत. त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध त्यांनी गायकवाडांना समíपत केला.’’

इतक्यात आई बाबांसाठी पाणी घेऊन स्टडीमध्ये आली.

‘‘काय चर्चा चाललीये?’’ आईने उत्सुकतेने विचारलं.

‘‘बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही गोष्टी सांगतोय राहुलला.’’ बाबा पाण्याचा ग्लास आईच्या हातातून घेत म्हणाले. मग त्यांनी आईला त्यांच्यात झालेलं संभाषण थोडक्यात सांगितलं.

‘‘आई, तू नेहमी म्हणतेस नं, एकवेळ कृतज्ञ नाही झालात तरी चालेल, पण कधी कृतघ्न होऊ नका!’’

‘‘ऑफकोर्स! आणि इथे तर चक्क बाबासाहेबांसारखी व्यक्ती हे विसरली नव्हती. ही तर त्यांनी आपल्याला दिलेली केवढी मोठी शिकवण आहे!’’

‘‘बाबासाहेबांनी अनेक पदव्या मिळवल्या. पुस्तकं लिहिली. प्रबंध सादर केले. कोलंबिया युनिव्हर्सटिीमध्ये शिकत असताना बाबासाहेब त्यांचे गुरू प्रोफेसर जॉन डय़ुई यांच्या विचारांनी खूप प्रभावित झाले. डय़ुई एक तत्त्वज्ञ होते. स्वातंत्र्य, मानवतावाद, सर्वाना समान हक्क.. असे अनेक विचार बाबासाहेबांना डय़ुई यांच्याकडून शिकायला मिळाले. बाबासाहेबांच्या सामाजिक कार्यात किंवा संविधान घडवतानादेखील डय़ुई यांच्या विचारांचा त्यांना खूप उपयोग झाला.’’ -इति बाबा.

‘‘बाबासाहेब द्रष्टे होते. त्यांचा विश्वास होता की, उपेक्षित समाजातील प्रत्येकाला शिक्षणच एक चांगलं आयुष्य देऊ शकतं. दलित समाजातील लोकांप्रमाणे स्त्रियांनादेखील त्या काळी शिक्षण मिळत नव्हतं. बाबासाहेबांचा स्त्रीशिक्षणावर विशेष भर होता. स्त्रिया जोपर्यंत शिकत नाहीत तोपर्यंत समाज पुढे जाऊ शकत नाही, असं त्यांचं ठाम मत होतं. म्हणूनच ते पत्नी रमाबाई यांनासुद्धा शिकण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन द्यायचे.’’ हे सांगत असतानाच दारावरची बेल वाजली म्हणून आई स्टडीबाहेर गेली.

‘‘ते म्हणायचे की ‘फक्त वही-पेन हे शिक्षण नव्हे. बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण!’’’ बाबांनी त्यांच्या वहीत काढलेल्या नोट्सपकी बाबासाहेबांचा एक विचार वाचून दाखवला.

‘‘बाबा, कितीतरी लोकांना शिक्षण मिळतच नाही किंवा ते मिळण्यासाठी खूप झटावं लागतं. आणि ज्यांना सहज मिळतं त्यांना त्याची किंमत नसते!’’

‘‘तरी हल्ली परिस्थिती भरपूर सुधारलीये. आपण माणसाला- मग तो पुरुष असो किंवा स्त्री- निदान एक माणूस म्हणून तरी वागवू लागलोय! याचं मोठं श्रेय जातं ते बाबासाहेबांकडे. ते स्वत: त्यांच्या आयुष्यात अनेक वाईट अनुभवांतून गेल्यामुळे त्यांना उपेक्षित समाजाचं दु:ख ठाऊक होतं. मुंबईच्या सिडनॅहम कॉलेजमध्ये प्रोफेसर असताना त्यांनी ‘मूकनायक’ नावाचं पाक्षिक सुरू केलं. उद्देश हाच की दलित, गरीब आणि उपेक्षित समाजाची दु:खं सरकार आणि इतर जनतेपर्यंत पोहोचावीत. पाक्षिकाच्या पहिल्या अंकातील अग्रलेख स्वत: बाबासाहेबांनी लिहिला होता. हळूहळू या उपेक्षित समाजाचा ते आवाज बनले, त्यांची दु:खं समजणारे एक वडीलधारी व्यक्ती बनले. म्हणूनच त्यांना प्रेमाने, आदराने लोक ‘बाबासाहेब’ म्हणू लागले.’’

‘‘एकदा शाळेच्या लायब्ररीमध्ये मला त्यांनी केलेल्या संघर्षांबद्दल माहिती देणारं पुस्तक वाचायला मिळालं होतं. कसले ग्रेट होते ते!’’

‘‘बाबासाहेब एक उत्कृष्ट अर्थतज्ञ होते, राजनीतिज्ञ होते, राज्यघटनेचे शिल्पकार होते, कायदा मंत्री होते, समाजसुधारक होते, उपेक्षित समाजाचा आवाज होते. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे नं- ‘डोिनग मेनी हेट्स’! अशा असंख्य ‘हेट्स’ त्यांनी एकाच वेळी समर्थपणे पेलल्या होत्या!’’

‘‘ते खूप वाचायचे नं?’’ राहुलला एकदम आठवलं.

‘‘अरे, पुस्तकं म्हणजे त्यांचा जीव की प्राण! असं म्हणतात की त्यांच्या घरात तब्बल ५,००० पुस्तकांनी भरलेली मोठी लायब्ररी होती. त्यांच्याबद्दल एक गमतीशीर किस्सा वाचला होता. अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सटिीमध्ये शिकत असताना त्यांच्या कॉलेजच्या लायब्ररियन म्हणाल्या होत्या की, बाबासाहेब लायब्ररीमध्ये येणारे पहिले आणि लायब्ररीतून बाहेर पडणारे नेहमी शेवटचे विद्यार्थी असायचे. कधी कधी तर त्या लायब्ररियनला लायब्ररी बंद करण्याआधी  बाबासाहेबांना हुडकून काढावे लागत असे, इतके ते पुस्तकांच्या सहवासात रमत. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की, जर तुम्हाला एक सन्माननीय आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही आधी स्वत:ला मदत करा. तीच सर्वात मोठी मदत असेल..’’

आई पुन्हा स्टडीमध्ये आली. ‘‘राहुल, गप्पा छान रंगल्या आहेत तुमच्या, पण उद्या पेपर आहे म्हटलं! ब्रेक संपला की नाही अजून?’’ आई घडय़ाळाकडे बोट दाखवत म्हणाली.

‘‘चला, पळा आता अभ्यासाला! मीपण माझं काम संपवतो.’’ -इति बाबा.

‘‘बाबा, आज तुम्ही मला आंबेडकरांबद्दल जी माहिती सांगितलीत ती मी सगळी व्यवस्थित लिहून काढणार आहे. शाळा सुरू झाली की शाळेच्या पुस्तिकेत लेख देण्याकरिता!’’

‘‘कल्पना उत्तम आहे!’’

‘‘आणि लेखाला नाव देणार- ‘प्रेरणा’! कारण बाबासाहेबांचे विचार, त्यांचं कार्य हे सगळ्यांनाच प्रेरणा देणारं आहे!’’

mokashiprachi@gmail.com

First Published on April 14, 2019 12:03 am

Web Title: marathi article in loksatta lokrang by prachi mokashi