18 October 2019

News Flash

उंदराला मांजर साक्ष!

कार्टूनगाथा

|| श्रीनिवास बाळकृष्णन

१९४० साली कार्टून विश्वातल्या सर्वात प्रसिद्ध अशा मांजर व उंदराचा जन्म झाला. याआधीच्या मिकीला तगडी टक्कर देणारा जेरी हा दुसरा उंदीर, पण कपडे वगरे न घालणारा, न बोलणारा, बिनधास्त असा पिटुकला!

तर फेलिक्स बोक्यानंतर टॉम हा दुसरा प्रसिद्ध गरीबगाय बोका. तोही कपडे घालत नाही. बोका दूध पितो, उंदीर चीज खातो, तसेच हेही!

खऱ्या उंदीर-मांजरासारखं हेही आपल्याशी.. माणसाशी बोलत नाहीत. मात्र मोठी माणसं जे बोलतात ते त्यांना नीट कळतं, खऱ्या पाळीव प्राण्यासारखं! त्यांची भाषा फक्त त्यांच्या आजूबाजूच्या मित्र प्राण्यांना व आपल्यालाच कळू शकते. पण यांच्यात मोठय़ा माणसांसारख्या काहीच सवयी नाहीत का? तर आहेत. मित्रहो, याआधी आपण पाहिलेच असेल की एखाद्या वस्तू, प्राण्यांचे कार्टून निर्माण करताना त्यात अनेक बदल होत असतात. जसं वास्तवात (खरं) दिसतं तसंच कार्टून नसतं. चित्रकार त्यात अनेक बदल घडवण्याचे स्वातंत्र्य घेतो. उदा. एखादा हत्ती लाल रंगाचा, उडणाराही दाखवू शकतो. आता वरील फोटोतील बोका पाहा, चॉकलेटी उंदीर पाहा.. किती फरक आहे.

जेरीचे केस गायब, शेपूट आखूड, कान जामच मोठाले असले तरीही चित्रकाराला माहीत असतं, की माणसांसारखी एकतरी गोष्ट कार्टूनजवळ असली पाहिजे. म्हणूनच हॉलीवुडच्या ‘मेट्रो गोल्डविन मेयर’च्या जोसेफ बाब्रेरा आणि विलियम हन्ना या जोडगोळीनं ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी’ला माणसांसारखे दोन पायावर सतत उभं ठेवलं. त्यांच्या चेहऱ्यावर माणसांसारख्या भावभावना दिल्या आणि एकमेकांवर कुरघोडी करणारी, समोरच्याला त्रास द्यायचं प्लॅनिंग करणारी, स्वत:ला वाचविणारी, तल्लख बुद्धी या दोघांना दिली. आणि यामुळेच ही जोडी आपल्या सर्वाना आवडून गेली.

शोले सिनेमातील जय-विरूदेखील घट्ट मित्र असले तरी दिवसभर एकमेकांच्या खोडय़ा काढत, मस्करी करत असतात, तसे हेही. परंतु टॉम अ‍ॅण्ड जेरी हे कार्टूनमधले असल्याने जरा जीवघेणी मस्करी करतात. कारण कार्टून कधीच मरत नसतात हे त्यांना पक्कं ठाऊक आहे. बॉम्ब, बंदुका, तोफा, खाजखुजली पावडर, आग, बॅट, इस्त्री, भांडी यांपकी काहीही वापरून ते दुसऱ्यावर हल्ला चढवतात. तेही कमी पडल्यास भाडोत्री गुंडांनादेखील बोलवायला कमी करत नाहीत. आता कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल की, अशी कार्टून्स पाहून आम्ही हिंसक होऊ अशी भीती वाटणाऱ्या आमच्या पालकांनी मात्र त्यांच्या लहानपणी हीच हिंसक कार्टून्स पाहिली आणि तरीदेखील हिंसक झाले नाहीत! असे कसे? तर त्याचे उत्तर माझ्याकडे नाही. तुमच्या पालकांना विचारा. या कार्टूनचे वैशिष्ट्य म्हणजे, यांनी गंगा उलटय़ा दिशेला वाहवली. बघा कसे ते..

टॉम तसा साधा, आळसप्रिय, पाळीव बोका. दूध पिणं, भरपूर झोपणं, झाडावरची चिमणी, कोंबडीचे पिलू, फिशटॅंक मधला मासा दिसला की तोंडाला पाणी सुटणं, मांजरीण दिसली की हा तिला इंप्रेस करण्यासाठी सिगार पिणं, गिटार वाजवणे करणार. मस्तमौला घरकोंबडा बोका. जेरीही तसाच. जेरीच्या मागे तो क्वचितच लागेल. मालकिणीने सांगितल्यावर, मस्त झोप झाल्यावर विरंगुळा म्हणून वगरे इतका आळशी. आणि जेरी सतत दूध, चीज खाण्याच्या मागे. तर जगभरात मांजराने उंदराला खावं अशी रीत असताना इथं मात्र इवलासा उंदीर मोठय़ा मांजराला जेरीस आणतो. (म्हणून त्याचे नाव ‘जेरी’ पडलं असावं) हा जेरी कधीकधी कुत्र्याला, शार्क माशाला आपल्या ‘थॉमस टॉम’शी भिडवून द्यायचा.. म्हणजे काहीही!

आणि हीच गोष्ट हे कार्टून कॉमिक, फिल्म पाहणाऱ्या आबालवृद्धांना अचाट चमत्कारिक वाटली, आवडून गेली. त्यात ही दोघे आपण माणसं करणार नाहीत तेवढं प्लॅिनग करणार. एकमेकांचे आणि घरचे नुकसान करणार, कधीतरी बट्टी करणार तर आयुष्यभर कट्टी करणार! हीच ती उलटी गंगा. या साऱ्या फिल्ममध्ये एकही संवाद नाही. त्यामुळे रागावल्यावर वा भांडताना एकमेकांना येतात तसे अपशब्द नाहीत. असं मी तरी कोणाशी भांडू शकत नाही. तुमचं काय?

१९४२ ला ‘अवर गँग’ (आपली टोळी) या नावाने कॉमिक पुस्तकापासून सुरू झालेली ही पकडापकडी लोकांना कायमची स्मरणात राहिली. आठवलं तरी हसू येईल. पुढे याच कॉमिकचे नाव बदलून ‘द टॉम अँड जेरी’ ठेवण्यात आलं. त्यांच्या सहा फिल्म्सना अकादमी अ‍ॅवॉर्डने गौरविल गेलं. आणि कित्येकांना नामांकनं मिळाली. टॉम अँड जेरीवर व्हिडीओ देखील निघाले. अगदी नुकत्याच आलेल्या प्ले स्टेशन २, एक्सबॉक्स, निन्टेडो गेमटय़ुबमध्ये देखील या पात्रांचा वापर करण्यात आला.

जगभरातल्या १०० चांगल्या कार्टूनमध्ये ६६व्या स्थानावर हे कार्टून आहे. आजही आपल्या वस्तूंवर बॅग, पाणी बॉटल, कंपासपेटी, रेनकोट, छत्र्यांवर हे दोघे असतात. महाराष्ट्रातल्या एका गावातील दुकानात दिसणारी वरील फोटोतील काडेपेटी तुम्हाला या जेरीची लोकप्रियता समजायला पुरेशी आहे.

टॉम अ‍ॅण्ड जेरी आपल्या आयुष्याचा भागच झालेले आहेत. आपल्या शाळेत, घरात जेव्हा आई-वडील, काका-काका, भाऊ-भाऊ, भाऊ-बहिण, सख्खे मित्र लुटुपुटूचे भांडत असल्यास एक कमेंट आपसूक करतात- ‘काय टॉम अ‍ॅण्ड जेरीसारखं भांडताय रे’

chitrapatang@gmail.com

First Published on April 14, 2019 12:02 am

Web Title: marathi article in loksatta lokrang by srinivas balkrishnan