20 November 2017

News Flash

तेरडा

आपली विशिष्ट प्रतिभा जपून ठेवणारे एक फुलझाड म्हणजे तेरडा.

भरत गोडांबे | Updated: September 10, 2017 12:34 AM

पावसाळा म्हटला की काही वर्षांयू फुलझाडे डोळ्यासमोर उभी राहतात. त्या प्रत्येकाला स्वत:चं विशिष्ट रूप, रंग निसर्गाने प्रदान केलेला आहे. असाच आपल्या रंग-रूपाने पावसाळी फुलझाडांमध्ये आपली विशिष्ट प्रतिभा जपून ठेवणारे एक फुलझाड म्हणजे तेरडा.

पावसाळ्यात अगदी सहज कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये उगवणारी भारतीय वंशाची वर्षांयू (जिचे आयुष्य साधारण एक वर्ष असू शकते अशी वनस्पती) वनस्पती म्हणजे तेरडा. तेरडय़ाचं शास्त्रीय नाव Impatiens balsamina (इंपाटिन्स बाल्सामिना).

आपल्याकडे साधारण तण म्हणून वाढणारी ही एक औषधी वनस्पती मोठय़ा प्रमाणात कुठेही उगवते. त्यामुळे तिला तण म्हणूनच वागवले जाते. तेरडा हा क्षुप (Herb) वर्गीय वनस्पती असून, त्याची उंची जास्तीत जास्त दोन ते तीन फूट असू शकते. तेरडय़ाला भाद्रपदा दरम्यान फुले येतात.

गडद गुलाबी, फिकट गुलाबी, सफेद, फिकट जांभळा, लाल अशा रंगांमध्ये तेरडा उपलब्ध आहे. त्याच्या फुलांचे रंग खूप भडक असतात. फूल एकदा उमलले की साधारण चार ते पाच दिवस ताजे राहते. नंतर त्याच्या पाकळ्या गळून पडतात. तेरडय़ाच्या पाकळ्यांचा रंग नंतर नंतर फिटक होत जातो म्हणूनच की काय ‘तेरडय़ाचा रंग तीन दिवस’ अशी मराठीत एक गमतीशीर म्हण आहे. गडद हिरव्या पानांमध्ये ही फुले उठून दिसतात. त्यामुळेच त्याची शोभेची वनस्पती म्हणूनदेखील लागवड करतात. फुले अत्यंत औषधी असून त्यांचा  वेगवेगळ्या औषधात वापर होतो. फुले थंड प्रकृतीची असल्यामुळे जळून झालेल्या जखमेवर  ती गुणकारी आहेत. फुले वाळवून त्यापासून नैसर्गिक रंगदेखील तयार करता येतो. फुले खूप नाजूक असतात.

तेरडय़ाचे रोप सरळसोट वाढते, त्या रोपाचा वापर गणपतीमध्ये माटोळीसाठी देखील केला जातो. काही ठिकाणी तेरडय़ाच्या रोपाची गौरी म्हणून पूजा केली जाते. तेरडय़ाच्या कोवळ्या पानांची भाजीदेखील करतात. पानांच्या कडा कातरलेल्या असतात आणि ती आकाराने लहान असतात. पानांपासून रंगदेखील तयार केला जातो. पानांचादेखील औषधात वापर करतात.

फुले गळून पडली की त्या ठिकाणी छोटी छोटी फळे लागतात. ही फळे कॅप्सूलसारखी दिसतात. गंमत म्हणजे आपण या फळांना हात लावला की ती फुटतात आणि छोटासा फटाका फुटल्यासारखा आवाज होतो. फळ फुटले की त्यातील बिया खाली पडतात. याच बियांपासून पुढील पावसाळ्यात नवीन रोपे तयार होतात. फळांच्या याच गुणामुळे बिया जमा करणे कठीण जाते. या बिया अत्यंत औषधी असून वेगवेगळ्या रोग-व्याधीमध्ये त्यांचा वापर केला जातो.

तेरडय़ाच्या सुंदर रंगीत फुलांमुळे त्याचा शोभेची वनस्पती म्हणून वापर केला जातो. मंदिराच्या आवारात, उद्याने, शाळा परिसर या ठिकाणी आपण त्याची लागवड करू शकतो. तेरडय़ाची शेतीदेखील  केली जाते. लाल रंगांच्या तेरडय़ाला बाजारात मागणी असते. कमी पाण्यात आणि कोणत्याही प्रकारच्या जमिनीत होत असल्यामुळे शेतकरी याच्या शेतीचा विचार करू शकतात.

तेरडय़ाच्या रोपात क्षारांचे प्रमाण जासत असते. याच्या अतिसेवनाने अपाय होऊ शकतो त्यामुळे जाणकारांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर टाळावा. तेरडय़ाला फुले आली की सगळीकडे एकाच वेळी  फुले येतात त्या वेळी तो बहर पाहणे म्हणजे स्वर्गीय आनंदच! साताऱ्याच्या कास पठारावर असेच फुललेल्या तेरडय़ाचे कार्पेट पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. मुंबईमध्ये रेल्वे रुळाच्या आसपास तेरडा फुललेला दिसतो.

आपल्या घराच्या आवारात, शाळा परिसरात तेरडय़ाचा बहर पाहायचा असेल तर या वर्षी त्याच्या बिया जमा करा नि पुढच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला त्या रुजवा. बघा तेरडय़ाने परिसराला किती सुंदरता प्राप्त होईल ते..

भरत गोडांबे

bharatgodambe@gmail.com

 

First Published on September 10, 2017 12:34 am

Web Title: marathi articles on terada flower