20 February 2019

News Flash

बाराशे दिवस!

अलीकडेच ५ जानेवारीला एका महत्त्वाच्या गोष्टीला बाराशे दिवस पूर्ण झाले.

(सर्व फोटो स्पेस डॉट कॉमच्या सौजन्याने)

अलीकडेच ५ जानेवारीला एका महत्त्वाच्या गोष्टीला बाराशे दिवस पूर्ण झाले. ती कोणती गोष्ट माहीत आहे का? ती आहे आपली मार्स ऑरबिटर मिशन म्हणजे मॉम मोहीम!

मॉमचं मंगलयान ५ नोव्हेंबर २०१३ ला निघून २४ सप्टेंबर २०१४ ला मंगळाच्या कक्षेत पोचलं. गंमत म्हणजे हे यान केवळ सहा महिने काम करील असा अंदाज होता, पण इथेही आपण बाजी मारली. तब्बल सव्वातीन वर्ष आपलं मंगलयान मंगळाभोवती फिरत आहे आणि मंगळाचा अभ्यास करत आहे.

मंगळावर यान पाठवणारा संपूर्ण आशियामधला आपला पहिला देश. पूर्णपणे भारतीय बनावटीच्या या यानामागे इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे परिश्रम आहेत. आपण पहिल्याच प्रयत्नात एवढं घसघशीत यश मिळवलं याचा सार्थ अभिमान सर्वाना आहे.

इस्रोच्या मते, हे यान असंच चांगल्या स्थितीत राहिलं तर ते सुमारे पाच-सहा वर्ष काम करू शकेल. सहा महिन्यांसाठी तयार केलेलं यान सहा वर्ष चालणे म्हणजे आपल्या भारतीय अंतराळशास्त्रज्ञांची मोठीच कामगिरी म्हटली पाहिजे.

इतकं प्रचंड यश मिळाल्यावर साहजिकच सर्वाना मोठ्ठं कुतूहल आहे, की भारताची पुढची अवकाश मोहीम कोणती? तर येत्या दोन-तीन महिन्यांत आपलं चांद्रयान-२ निघणार आहे. २००८ मध्ये आपल्या पहिल्या चांद्रयानाने चंद्रावर पाण्याचा साठा असल्याचा महत्त्वाचा शोध लावला होता. आता दुसरं चांद्रयान २०१८ मध्ये काय करतं ते बघू या!

त्यानंतरची पुढची अवकाश मोहीम असणार आहे मंगलयान २.०; तर त्याच जोडीने शुक्रावर एक यान पाठवण्याच्या मोहिमेचा आराखडा तयार होतो आहे. या दोन्ही योजना २०२० नंतर सुरू होणार आहेत.

मेघश्री दळवी

meghashri@gmail.com

 

First Published on January 21, 2018 2:39 am

Web Title: mars orbiter mission 3