21 February 2019

News Flash

‘मला वाटलं’

‘मला वाटलं’, हा अनेक लहान-मोठय़ांचा हितशत्रू.

‘मला वाटलं’, हा अनेक लहान-मोठय़ांचा हितशत्रू. अनेकदा कोणीतरी आपल्याला तळमळीने काहीतरी सांगत असतं; पण ते आपण व्यवस्थितपणे ऐकत नाही. कोणी वाचायला दिलेलं काळजीपूर्वक वाचत नाही आणि त्यावर आपल्या विचाराने किंवा मनानेच काहीतरी वेगळाच निर्णय घेतो वा भलतीच कृती करतो. अशा वेळी त्याचं समर्थन करताना आपण सहजरित्या म्हणून जातो, ‘तुम्हाला हे असं म्हणायचं होतं का? ‘मला वाटलं’ ते तसं आहे’.. आणि पुन्हा चूक करण्यासाठी तयार होतो. मित्रांनो, तुम्ही स्वतंत्ररीत्या विचार करताना ‘मला हे असं वाटलं’ म्हणणं नक्कीच स्वागतार्ह आहे. पण इतरांचं मार्गदर्शन घेताना तुम्ही जर या विचाराचा आधार घेत असाल तर ते तुमच्या प्रगतीसाठी हानीकारक आहे. तुमचे पालक, शिक्षक, मार्गदर्शक तुमच्याहून सुज्ञ, अनुभवी आणि  प्रगल्भ असतात, म्हणूनच तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यांचं व्यवस्थितपणे न ऐकता किंवा न वाचता तुम्ही स्वत:च्या मनाने ‘मला असं वाटलं’ म्हणून काहीतरी वेगळीच कृती करता, म्हणजे अनवधानाने त्यांचा अपमानच करता. आणि हे असं घडतंय हे एक-दोनदा लक्षात आलं की मग त्यांचाही तुमच्याबाबतचा विचार फारसा सकारात्मक उरणार नाही, हे नैसर्गिक आहे. मग तुम्हीच चांगल्या मार्गदर्शकाला मुकाल. त्यातून तुमचाच तोटा आहे. त्यामुळे ‘मला वाटलं..’ हा खोटा वर्ख लावण्याआधी कुणी काय सांगतंय ते काळजीपूर्वक ऐका, कोण काय म्हणतंय ते जाणून घ्या. लिहिलेल्या शब्दाचा वा वाक्यांचा अचूक अर्थ समजून घ्या. त्यात जर कोणती शंका असेल तर तिचं निरसन होईपर्यंत प्रश्न विचारा, माहिती करून घ्या आणि मग त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढे सरका. अशाने काय होईल, तर तुम्ही जी कृती कराल ती आकर्षक, सुंदर, बिनचूक असेल; आणि त्यामुळे तुमची नक्कीच वाहवा होईल. याबरोबरच तुमच्या मार्गदर्शकाचा विश्वासही दृढ होईल.

मेघना जोशी

joshimeghana231@yahoo.in

First Published on February 4, 2018 12:52 am

Web Title: meghana joshi story for kids