बुद्धिबळ तसा खेळायला कठीण आहे. आधी आपल्या खेळीचा विचार करायचा, मग त्यावर समोरचा खेळाडू काय चाल करील याचा अंदाज बांधायचा. असं पुढच्या सहा-सात चालींसाठी करायचं. शिवाय काही गाजलेल्या सामन्यांचे पट लक्षात ठेवायचे, वेगवेगळे ग्रँडमास्टर्स कसे खेळतात यांचा कसून अभ्यास करायचा. निरनिराळे डावपेच समजून, शिकून आपला खेळ सुधारत न्यायचा. थोडक्यात काय, तर पंधराशे वर्षांची परंपरा असलेला बुद्धिबळ हा खेळ खेळणे हे येरागबाळ्याचं काम नाही! त्याला भरपूर एकाग्रता लागते. मेहनत लागते आणि वर्षांनुर्वष सराव तर आहेच. मात्र गूगलच्या अल्फा-झीरोने हे सगळंच्या सगळं ज्ञान अवघ्या चार तासांत कमावून दाखवलं आहे.

आज एक एप्रिल आहे म्हणून ही बातमी एप्रिल फूल समजू नका. हे खरंच आहे. गेल्या डिसेंबरमधली गोष्ट. गूगलचे संगणक संशोधक अल्फा-झीरो या कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटेलिजन्स) प्रणालीवर काम करत होते. त्यांनी अल्फा-झीरोला बुद्धिबळ शिकवायला सुरुवात केली, अगदी शून्यापासून. पहिला धडा झाला, दुसरा, मग तिसरा, पुढचे धडे अल्फा-झीरोने धडाधड शिकून घेतले आणि तो वरच्या वर्गात गेलासुद्धा! मग बघता बघता शाळा पूर्ण झाली आणि पुढचा अभ्यासबिभ्यास करून केवळ चार तासांत तो चक्क जागतिक चॅम्पियन झाला, एकही डाव न हरता.

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीची हीच खास बात असते. एखाद्या बुद्धिमान माणसासारखी ही प्रणाली अनुभव घेता घेता शिकत जाते. सोबत भरपूर मेमरी आणि संगणकाचा वेग! मग का नाही चॅम्पियन होणार? बुद्धिबळाच्या एका सामन्यात सहा हजारापर्यंत खेळी होऊ  शकतात. अर्थात खेळणारी दोन माणसं असतील तर ती थकूनच जातील तेवढय़ात! पण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचं तसं नसतं. अल्फा-झीरो एका सेकंदाला ऐंशी हजार चालींचा विचार करून त्यातली सगळ्यात योग्य चाल निवडून काढू शकतो. आपण माणसं या भरधाव वेगात साहजिकच मागे पडतो. त्यामुळे उद्याचे नवे बुद्धिबळ चॅम्पियन्स कदाचित अल्फा-झीरोसारख्या प्रणालीच असतील!

meghashri@gmail.com